27.9 C
Pune
Saturday, February 14, 2026
Homeलेख*ज्ञानखेळणी: उत्सव ज्ञानाचा - जागर खेळणीचा*

*ज्ञानखेळणी: उत्सव ज्ञानाचा – जागर खेळणीचा*

मातृभूमी भारत देशाचा जेवढा इतिहास आहे, तेवढाच या देशातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील खेळण्यांचा इतिहास आहे. नव्हे तो आपल्या लक्षात येतो. त्यामुळेच भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये अगदी प्राचीन काळापासून खेळणीतून ज्ञान साधना केली जात होती. हे ज्ञान विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पूरक असे. सर्व विषयांचे आणि सर्वस्पर्शी ज्ञान विद्यार्थ्यांना अवगत होत असे. खेळणी मधून ज्ञान ग्रहण करीत असताना विद्यार्थ्यांचे मनोरंजन तर होतच असे, तद्वतच विषयातील संबोध आणि संकल्पना देखील दृढ होत असत. काही वेळेस जेव्हा विद्यार्थी, हीच खेळणी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयार करीत तेव्हा विद्यार्थ्यांच्या सृजनशिलतेस आणि रचनात्मकतेस चालना मिळत असे.

हाच भाव लक्षात घेऊन कार्यालयीन सेवानिवृत्ती नंतर मी या विषयाचा अभ्यास सुरू केला आणि विविध प्रकारची खेळणी गोळा केली. काही खेळणी तयार केली. त्यातून माझ्या लक्षात आले की खेळणी ही सर्व वयोगटातील आणि सर्व विषयातील विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त आहेत. त्यामुळे माझा “खेळणी ही फक्त लहान वयोगटातील बालकांनाच उपयोगी असतात” हा गैरसमज दूर झाला.

या नंतर खेळणी हा विषय मी अनेकांशी बोललो, चर्चा केली. त्यातून काहींनी प्रथम टवाळी केली. परंतु अनेकांनी या अभिनव संकल्पनेची वाहवा केली. त्यातील काहींनी नवीन विचार दिले. यातूनच माझाही विश्वास वाढत गेला. हळुहळु मूर्त स्वरूप आकार घेत गेले. यातूनच स्वर्गीय अटलजींच्या जन्म दिनी पहिला आणि अधिकृत ‘स्टेज शो’ साकारला. केवळ एका तासाचे मर्यादित सादरीकरण आणि तेही इयत्ता १ ली ते १२ वी ला सर्व विषय शिकविणाऱ्या शिक्षकांच्या समोर झाले. सादरीकरण जरी केवळ एक तासाचे होते तरी मला मिळालेली प्रत्यक्ष अनुभूती मात्र खूप काही शिकवून गेली.

यानंतर हळूहळु वार्ता पसरत गेली. देशभरातून बोलावणे येत गेले. या सादरीकरणातून माझा अनुभव समृद्ध होत आहे. यात परवा आलेला अनुभव खूपच उत्साह वर्धक, आनंददायी, प्रेरक आणि हाती घेतलेल्या कार्यास गती देणारा होता. याकरिताच हे शब्दांकन.

महाराष्ट्रात अत्यंत नावाजलेल्या “प्रथम” या सेवाभावी संस्थेने, किल्लारी (केवळ नाव पुरेसे), लातूर येथे लगतच्या असलेल्या २-३ जिल्ह्यातील इयत्ता ६ ते ८ वर्गातील, विविध चाळणी आणि परीक्षेतून निवडलेल्या १०-१२ गावातील ६४ विद्यार्थ्यासाठी दोन दिवसीय शिबिर आयोजित केले होते.

शिबिरात विद्यार्थी स्वतः खेळणी तयार करणार होते. त्यांना खेळणी तयार करण्यासाठीची आवश्यक सामग्री देण्यात आली. ६४ विद्यार्थ्यांचे ११ गट तयार करण्यात आले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या गटाला त्यांना आवडणाऱ्या राज्यांची (प्रदेशांची) नावे दिली. गटातील विद्यार्थ्यांना गटश: एकेक वस्तू देण्यात आली. त्या वस्तू बद्दल प्रथम माहिती विचारली. त्यातून मिळालेल्या माहितीनुसार अधिकची माहिती त्यांना दिली गेली. निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया विषद केली. त्यानुसार विद्यार्थ्यांनी त्यावर कार्य केले. यातून त्यांचे कौशल्य, नेटकेपणा, गुणवत्ता दिसून आली. दिल्या गेलेल्या वस्तू मधून खेळणी विकसित होत गेली.

खेळणी विकसनाच्या या टप्प्यावर विद्यार्थ्यांना उपकरणांची काळजीपूर्वक हाताळणी आणि त्यांची सुरक्षा या बद्दल सूचना देण्यात आली. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यास कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही. या संपूर्ण प्रक्रियेत विद्यार्थ्यामध्ये मला जाणवलेली अध्ययन निष्पत्ती वानगीदाखल पुढीलप्रमाणे.
खेळणी तयार करण्यासाठी आकार आणि शैलीनुसार साहित्य निवडण्यात यशस्वी झाले.■
● चिकित्सक विचार करण्यातून समस्या सोडविण्याच्या कौशल्यांचा विकास झाला.●
■ सर्जनशीलता आणि स्वत:ची अभिव्यक्ती निर्माण झाली.■
◆ खेळणी तयार केल्याने त्यातील शैक्षणिक समज सखोलतेने लक्षात आली.◆
● खेळणीतील जटिलता आणि सौंदर्याची माहिती मिळाली.●
■ गटांमध्ये इतरांशी संवाद साधत असताना सहानुभूती, सहकार्य आणि सामाजिक-भावनिक कौशल्ये विकसित झाली.■
◆ स्व-भाषा विकास व त्यातून भाषेची समृद्धी होत गेली.◆
●सूक्ष्म कारक आणि मनोकायिक कौशल्यांचा उत्तम विकास झाल्याचे समजले.●
◆चाचणी आणि परीक्षण केल्यानंतर खेळणी मध्ये विद्यार्थ्यांनी निरीक्षणातून स्वतः गुणवत्तेसाठी दुरुस्ती अथवा सुधारणा केली.

तात्पर्य, खेळण्यांवर आधारित शिक्षण, विद्यार्थ्यासाठी विविध कौशल्ये शिकण्याचा आणि विकसित करण्याचा एक मजेदार आणि आकर्षक मार्ग असू शकतो, या विषयीचे माझे मत आणि विचार अनुभवातून पक्के झाले. ज्ञानाधिष्ठित शिक्षणाचा जागर खेळणी मधून तर सुरु केला आहे. आता प्रतीक्षा आहे ती याचा कल्लोळ होण्याची. मला खात्री आहे की नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणातून आणि त्याच्या प्रभावी अंमलबजावणी व सर्वांच्या सहकार्यातून हे शक्य होईल.

डॉ अजय महाजन.
राष्ट्रीय संयोजक, शिक्षा शिल्पी, विज्ञान भारती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]