लातूर ;दि.२(प्रतिनिधी ) –
ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा एक महत्वाचा पण उपेक्षित घटक आहे. एकत्र कुटुंब व्यवस्थेला तडा गेल्यामुळे ज्येष्ठांना कुटुंबात व समाजात सन्मानाची , आपुलकीची वागणूक मिळत नाही . यापुढे ज्येष्ठ नागरिकांना सन्मान व आपुलकीची वागणूक मिळावी , अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक व संत साहित्याचे अभ्यासक रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केली .

ज्येष्ठ नागरिक संघ लातूर शाखेच्या द्विदशक वर्धापन दिनानिमित्त रविवारी पूर्णानंद मंगल कार्यालयात स्नेहमिलन , व्याख्यान आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते , या प्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष अरुण रोडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे उपाध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवकांत चिकुर्ते , महिला आघाडी प्रमुख( फेसकाँम )डॉ.माया कुलकर्णी , ज्येष्ठ नागरिक संघ दक्षिण मराठवाडा विभागीय अध्यक्ष डॉ.बी. आर.पाटील ,ज्येष्ठ नागरिक लातूर शाखेचे जिल्हाध्यक्ष आर. बी. जोशी, सचिव प्रकाश घादगिने इत्यादींची मंचकावर प्रमुख उपस्थिती होती.

रामचंद्र देखणे यांनी आपल्या प्रभावी व्याख्यानात ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, कुटुंबव्यवस्था , बदलती परिस्थिती , शासनाचा व कुटुंबाचा ज्येष्ठांकडे बघण्याचा दृष्टिकोन आदी विषयांवर प्रकाशझोत टाकला व सविस्तर विवेचन केले. आपल्या व्याख्यानात ते पुढे म्हणाले की, ” पूर्वी एकत्र कुटुंब व्यवस्था होती. बदलत्या परिस्थितीमुळे या एकत्र कुटुंब व्यवस्थेला तडा गेला आहे .एकत्र कुटुंब व्यवस्थेत आजी – आजोबा यांना महत्त्वाचे स्थान होते. आजी विविध कथा सांगून नातवंडांवर सुसंस्कार करण्याचे काम करायची. आजी हे विद्यापीठ होते .घरातील वृंदावन हे आसन होते. आता कुटुंबातील संवादच हरपला आहे .धकाधकीच्या जीवनात एकमेकांशी बोलायला वेळ मिळत नाही .त्यामुळे अनेक समस्या उद्भवल्या आहेत .हा हरवलेला संवाद पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी एकत्र कुटुंब व्यवस्था भक्कम करण्यावर भर दिला पाहिजे.

प्रारंभी ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सी. एन. जोशी, संचालक पी .व्ही. देशपांडे, डॉ.मधुकराव कुलकर्णी , डॉ. आर .के. पाटील, देवीकुमार पाठक, डॉ. बी .आर .पाटील ,प्रभाकर कापसे ,रमाकांत ढगे इत्यादींचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . यावेळी पाहुण्यांच्या हस्ते स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले .आर.बी .जोशी यांनी प्रास्ताविक केले . प्रकाश घादगिने यांनी ज्येष्ठ नागरिक संघाचा अहवाल सादर केला. डॉ. माया कुलकर्णी , डॉ. बी .आर .पाटील , डॉ. सी .एन .जोशी यांच्यासह महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे उपाध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांची समयोचित भाषणे झाली. अरुण रोडे यांनी अध्यक्षीय समारोप केला .कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन रामानूज रांदड यांनी केले. डॉ. भास्करराव बोरगावकर यांनी आभार प्रदर्शन केले.





