लातूर: लातूर जिल्हा डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे दुसरे अधिवेशन लातूरलाच होणार असा शब्द डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी पुस्तकाचे गांव भिलार येथील राज्यस्तरीय पहिल्या अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रामध्ये व्यासपीठावरून जाहीर केले. दुसरे यजमान पद लातूर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार टीमला मिळाल्याने आनंद व्यक्त होत आहे.
लातूर जिल्ह्यातील डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे मराठवाडा विभागीय कार्याध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार संजय जेवरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दिनांक 29 ऑक्टोबर 2022 रोजी अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात श्री माने यांना दुसरे अधिवेशन लातूरला व्हावे यासाठी निमंत्रण पत्र लातूर जिल्हाध्यक्ष के वाय पटवेकर, कोषाध्यक्ष बालाजी उबाळे, बी जी शेख, सलीमखान पठाण, निळकंठेश्वर चव्हाण, एन जी बिराजदार, मुस्तफा सय्यद, राम साळुंखे सह लातूर समूहाच्या वतीने मंचावर देण्यात आले होते.
अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रामध्ये संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी लातूर येथे दुसरे राज्यस्तरीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अधिवेशनाचे यजमानपदाचे विनंती पत्र स्वीकारले असल्याचे सांगत आगामी होणाऱ्या दुसऱ्या अधिवेशनाचे यजमानपद लातूरला दिल्याचे जाहीर केले.
साहित्य संमेलनाच्या परंपरेप्रमाणे डिजिटल मीडिया संघटनेने सुद्धा अधिवेशनातच निमंत्रण स्वीकारून लातूरला हा मान दिल्यामुळे पुढील वर्षी हे अधिवेशन लातुरात ऐतिहासिक होणार असून महाराष्ट्रातील सर्व डिजिटल पत्रकार,संपादकांना पुन्हा शिक्षणाच्या पंढरीत विचारांची देवाणघेवाण करता येणार आहे.लातूरला मान दिल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांचे जाहीर आभार लातूर कार्यकारिणीने मानले आहेत.