*दूषित पाण्याचा आरोग्यावर दुष्परिणाम*
*हरंगुळ (बु.) वरवंटी ग्रामस्थांना दिलासा*
*डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या पाठपुराव्याला यश*
*लातूर ;दि.४( माध्यम वृत्तसेवा) :-लातूर एमआयडीसी भागातील दूषित पाणी नाल्याद्वारे मौजे हरंगुळ (बुद्रुक) मंदार वस्ती आणि वरवंटी (बसवंतपूर ) येथील वस्तीमध्ये येऊन अशा दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. या संदर्भात भारतीय जनता पार्टीच्या नेत्या डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी वेळोवेळी संबंधिताकडे पाठपुरावा केल्यामुळे या दूषित पाण्यासंदर्भात नुकतीच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे पाण्याची तपासणी करण्यात आली आहे.*

भारतीय जनता पार्टीच्या नेत्या डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी लातूर शहर विधानसभा निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी विविध भागात पदयात्रा देखील काढल्या होत्या. हरंगुळ, वरवंटी( बसवंतपूर ) भागात त्यांनी जेव्हा पदयात्रा काढली होती ; तेव्हा या भागातील नागरिकांनी त्यांना दूषित पाण्यामुळे आमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे हे प्रामुख्याने तक्रारीचा पाढा वाचला होता. हा प्रश्न सोडवण्याबाबत त्यांच्याकडे साकडे घालण्यात आले होते ; याची दखल घेऊन डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजाताई मुंडे आणि लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे पत्रव्यवहार करून मौजे हरंगुळ मंदार वस्ती व वरवंटी येथील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. सदर पाण्याची योग्य विल्हेवाट करून योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी केली होती.

संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी जेव्हा या दोन्ही गावांना भेट देण्यासाठी गेले होते; तेंव्हा तेथील ग्रामस्थांनी लहान बालकांच्या अंगावर पुरळ येणे व त्वचारोगाची समस्या गंभीर होणे , डोक्याचे केस पांढरे होणे ,जनावरांची हानी होणे ,गर्भवती महिला विविध त्रास व अडचणी येणे ,गावातील लोकांना दम्याचा त्रास होणे व लोकांचे आयुष्यमान कमी होणे ,गावातील पशुपक्ष्यांची संख्या कमी होणे ,दूषित पाण्यामुळे जनावरांचा आपत्कालीन गर्भपात होणे , जनावरांच्या अंगावरील केस गळणे ,पशुंना त्वचारोगाची समस्या उद्भवणे, धूळ व दुर्गंधीमुळे गावातील नागरिकांना श्वसन विकाराची लागण होत असल्याच्या अनेक तक्रारीचा पाढा यावेळी वाचला. डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या पत्राची पंकजाताई मुंडे यांनी दखल घेऊन त्यांच्या या मागणीचा प्राधान्याने विचार करून संबंधितांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरण अधिनियम 1986 नुसार कारवाई करण्यात यावी व लातूर औद्योगिक वसाहतीतील दूषित पाण्याची विल्हेवाट करता योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात ,असे संबंधितांना आदेश दिले आहेत.

मंत्री महोदयांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे उपरोल्लिखित दोन्ही गावांमध्ये अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समक्ष दूषित पाण्याचे नमुने घेऊन त्या संदर्भातील पाण्याचे नमुने छत्रपती संभाजीनगर येथे प्रयोगशाळेत तपासणी करता पाठवण्यात आले आहेत. या याबद्दल डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे तसेच लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे आभार मानले आहेत; तसेच पालकमंत्र्यांची लवकरच भेट घेऊन दोन्ही गावाची पाहणी करण्याबाबत आणि सदरील विषयांमध्ये संबंधित विभागाच्या मंत्री महोदयांसोबत बैठक घेण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.





