लातूर:- ४२ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कादंबरीकार आणि शेतकरी संघटनेचे नेते व शेती प्रश्नाचे मूलगामी अभ्यासक डॉ.शेषराव मोहिते यांची निवड झाल्याबद्दल मराठवाडा साहित्य परिषद शाखा लातूर व लातूरातील विविध संघटनांच्या वतीने काल सत्कार करण्यात आला.

मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद ही संस्था निजाम काळापासून मराठवाड्यात भाषा, साहित्य, संस्कृती संवर्धनाचे आणि मराठवाड्याच्या स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभागातून महत्त्वपूर्ण योगदान देणारी साहित्य परिषद आहे.या परिषदेचे ४२ वे मराठवाडा साहित्य संमेलन १० व ११ डिसेंबर २०२२ रोजी जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे होत आहे.
डॉ.शेषराव मोहिते यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड जाहीर झाल्यानंतर मराठवाडा साहित्य परिषद शाखा लातूर व लातूरातील यशवंतराव प्रतिष्ठान विभागीय केंद्र लातूर, कबीर प्रतिष्ठान लातूर, शब्दांकित साहित्य मंच लातूर, नारी प्रबोधन मंच लातूर, मराठी भाषा साहित्य व संशोधन परिषद लातूर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती लातूर, डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी लातूर, ज्येष्ठ नागरिक संघ लातूर, शिवाई प्रतिष्ठान लातूर, मिळून सा-याजनी मंच लातूर, अखिल भारतीय आदिवासी विचार मंच लातूर, परिवर्तन साहित्य मंच लातूर,रत्नापूर रसिक मंच लातूर, आविष्कार प्रतिष्ठान लातूर, डॉ बाबासाहेब परांजपे फाऊंडेशन लातूर या सर्व साहित्य व वैचारिक संघटना एकत्र येऊन डॉ.शेषराव मोहिते सरांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी उपस्थितांनी मनोगत व्यक्त करत डॉ.शेषराव मोहिते यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी मनोगत व्यक्त करताना, डॉ.मोहिते यांची ४२ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड म्हणजे त्यांच्या भूमिकानिष्ठ लेखनाचा, मराठी ग्रामीण साहित्याचा आणि त्यांच्या कणखर भूमिकेचा हा सन्मान आहे. डॉ.मोहिते सरांची साहित्यिक म्हणून जडणघडण १९८० नंतर झाली असून त्यांचे लेखन हे ग्रामीण साहित्यासंबंधीच्या अपुरेपणाच्या जाणिवेतून झाले आहे.ग्रामीणांच्या वास्तव जगण्याला भिडून ते लिहितात. कृषिप्रधान भारतीय संस्कृतीत शेतकऱ्यांचा उदोउदो होतो पण या व्यवस्थेत शेतकरी इतका अडकून पडला आहे की त्यांच्या जगण्यावर राजकीय, सामाजिक व्यवस्था ठप्प आहे.भांडवलदार, सावकारांच्या कचाट्यात सापडून दुरावस्थेला पोहचलेला शेतकरी उद्याच्या आशेवर जगत राहतो आणि पुन्हा स्वतः ला उद्धवस्त करण्याची एक तजबीज तो करत राहतो. डॉ.शेषराव मोहिते यांची शेती- मातीशी घट्ट नाळ जुळलेली आहे.”असं जगणं तोलाचं”, “धूळपेरणी” या कादंब-या, “बरा हाय घरचा गोठा” हा कथासंग्रह, “शेती व्यवसायावरील अरिष्ट” हे वैचारिक ग्रंथ,”बोलिलो जे काही” आणि “अधले मधले दिवस” हे ललित लेखन आणि “ग्रामीण साहित्याचे बदलते संदर्भ” हा समीक्षा ग्रंथ या सर्व लेखनातून डॉ.मोहिते सरांनी शेती मातीशी अखंडपणे जुटलेली नाळ कधी तुटू दिली नाही.ते सतत ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण करत या जीवनाची धग ते साहित्यातून निरलसपणे मांडत राहिले. त्यांनी कधी प्रसिद्धीची किंवा मान सन्मानाची अपेक्षा न ठेवता जे सकस आणि भयंकर वास्तव ते लिहित राहणे हा त्यांचा पिंड आहे.

त्याच्या कथा, कादंब-यांप्रमाणेच ललित लेखनाला ही तितकीच उंची प्राप्त करून दिली आहे.स्वत:च्या वाट्याला आलेलं आणि आपल्या आकलनाच्या कक्षेतील समाज जीवन रेखाटने हीच माझी भूमिका राहिली आहे, असे ही त्यांनी यावेळी सांगितले. डॉ.मोहाते सरांच्या या निवडीबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला.यापुढेही त्यांच्या लेखनाचा सन्मान होत रहावा अशी भावना भारावलेल्या भरात सर्वांनी व्यक्त केली. डॉ.मोहिते सरांच्या निवडीमुळे लातूरच्या मान सन्मानात भर पडली आहे.अशी भावना ही मनोगतातून अनेकांनी व्यक्त केली.
या प्रसंगी मराठवाडा साहित्य परिषद शाखा लातूर अध्यक्ष डॉ जयद्रथ जाधव, सचिव डॉ दुष्यंत कटारे, आविष्कार प्रतिष्ठान व बाबासाहेब परांजपे फाउंडेशनच कवी रमेश चिल्ले, मराठवाडा साहित्य परिषदेचे सदस्य व पहिल्या शिवार जिल्हा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष कवी नरसिंग इंगळे, विद्रोही कवी रामदास कांबळे, समीक्षक डॉ.ज्ञानदेव राऊत, समीक्षक डॉ.संभाजी पाटील, ज्येष्ठ नागरिक संघ व डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमीचे सचिव, व्यंगचित्रकार व मसापचे सदस्य श्री प्रकाश घादगिने, संत कबीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष व समीक्षक डॉ रणजित जाधव,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र लातूर व मराठवाडा साहित्य परिषदेचे सदस्य,रत्नापूर रसिक मंचचे अध्यक्ष व व्याख्याते विवेक सौताडेकर, आदिवासी विकास विचार मंचचे अध्यक्ष व उघडा दरवाजा आत्मकथनकार रामराजे आत्राम, मसापच्या सदस्या व कवयित्री शैलजा कारंडे, शब्दांकित साहित्य मंचच्या व मसापच्या सदस्या लेखिका, कवयित्री प्रा.नयन राजमाने, मिळुन सा-या जणी मंचच्या कवयित्री उषा भोसले, डॉ.किशन भोसले, कवी विश्वंभर इंगोले, संजय मुळे आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.




