29.5 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeलेख*तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर - तुकाराम महाराज विश्व शांती घुमट अध्यात्मशास्त्राची वैज्ञानिक...

*तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर – तुकाराम महाराज विश्व शांती घुमट अध्यात्मशास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा*

                                                                  – गिरीश दाते 

या पृथ्वीवर अनेक देश आहेत, ज्यामध्ये एक आहे ‘भारत’, जिथे कित्येक  वर्षांपासून  ज्ञानाची पूजा केली गेली, तसेच अंतिम सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला. या भारत देशामध्ये अनेक महान ऋषिमुनी, संत-महात्म्यांनी जन्म घेतला. ज्ञानाच्या तपश्चर्येच्या माध्यमातून त्यांनी विश्वाची अनेक रहस्ये उलगडली. या सर्व संतमहात्म्यांमध्ये एक महत्त्वाचे नाव आहे – तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज, ज्यांचा जन्म सुमारे ७४५ वर्षांपूर्वी झाला आणि ज्यांनी आपल्या २१ वर्षांच्या अल्प आयुष्यामध्ये ज्ञानाचे सत्य स्वरूप लोकांच्यापुढे खर्‍या अर्थाने मांडले.

                महान ग्रंथ श्रीमद् भगवद्गीता हे ज्ञानाचे भांडार मानले जाते. अशा या भगवद्गीतेचे अंतरंग ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या फक्त १६ व्या वर्षी ‘भावार्थ दीपिका’ अर्थात् ‘श्री ज्ञानेश्वरी’च्या रूपात मराठी भाषेत लोकांपुढे मांडलेे. संत ज्ञानेश्वर हे केवळ संतच नव्हते, तर विश्वाच्या अनेक गूढ सिद्धांतांची किंवा विश्वात्मक तत्त्वांची, अभ्यासपूर्ण उकल करून, अखिल मानव जातीला समजावून सांगणारे एक महान तत्त्वज्ञही होते.

मित्रहो! याच महान तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाने अवतरित झाला आहे, जगातील सर्वात मोठा आणि भव्यतम असा घुमट – तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर विश्व शांती प्रार्थना सभागृह आणि विश्व शांती ग्रंथालय – एक अशी वास्तू, अर्थात् ही जणू ज्ञानतत्त्वाचीच प्रतिकृती आहे.

आधुनिक युगातील ज्ञान-विज्ञान

आजच्या आधुनिक युगामध्ये ज्ञानाची भाषा बदलली आहे. आजच्या युगामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशल इंटलिजन्स, माहिती तंत्रज्ञान अर्थात इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, फेसबुक, गुगल अशा माध्यमातून माहितीचा प्रसार होत आहे. परंतु दु:ख याचे होते की, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या ७३० वर्षानंतर देखील खर्‍या अर्थाने ज्ञानतत्त्व, निसर्गतत्त्व यांचा संदेश लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही.

                सृष्टीच्या प्रत्येक जीवाची रचना दोन तत्त्वांनी सिद्ध होते – वैज्ञानिक तत्त्व जे शरीर आणि मेंदू याने तयार होते आणि अध्यात्मिक तत्त्व ज्यामध्ये मन आणि आत्मा यांचा समावेश होतो. या दोन्ही तत्त्वांमधून जीवसृष्टीचे ‘विश्वात्मक’ तत्त्व होते.

                अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की, आजचे तंत्रज्ञान मनुष्याला केवळ भौतिक सुखाचा मार्ग दाखवते, परंतु मानवाला शांती आणि सुख देण्याऐवजी अण्वस्त्र, रासायनिक अस्त्र, जैविक अस्त्र अशा विनाशकारी शस्त्रास्त्रांच्या निर्मितीमध्ये वापरले जात आहे, ज्यामुळे मानव २१ व्या शताब्दीचा अंतदेखील पाहू शकेल की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे.

विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचे अमूल्य योगदान

भारतमातेचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांच्या वचनांवर दृढ विश्वास ठेवणारे, तसेच महान तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि श्री तुकाराम महाराज यांच्यावर अपरंपार श्रद्धा असणारे, डॉ. विश्वनाथ कराड यांच्याच दूरदर्शी संकल्पनेतून आळंदी येथील सुंदर घाट, विश्वरूप दर्शन मंच तसेच गरूड स्तंभ, रामेश्वर (रुई) येथे दोन धर्मांच्या विचारधारांना जोडणारा ‘विश्वधर्मी श्रीराम-रहीम मानवता सेतू’, अत्यंत सुंदर असा तथागत गौतम बुद्ध विहार, तसेच विश्वराजबाग, पुणे येथे भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण देणारी विश्वशांती संगीत कला अकादमी, जगातील एकमेवाद्वितीय असे विश्वदर्शन देवता मंदिर, अशा अनेक अद्भुत वास्तुंचे निर्माण झाले आहे.

सन १८९७ मध्ये स्वामी विवेकानंदांनी असे भाष्य केले होते की, ‘२१ व्या शतकात भारत देश ज्ञानाचे दालन म्हणून उदयास येईल आणि संपूर्ण जगाला ‘विश्वगुरू’ म्हणून सुख, समाधान आणि शांतीचा मार्ग दाखवेल. स्वामीजींचे हे कथन आज सत्यात उतरविण्याची वेळ आली आहे आणि त्यासाठीच या ज्ञानरूपी तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर विश्वशांती प्रार्थना सभागृहाचे निर्माण झाले आहे.

डॉ. कराड सरांनी सुमारे चार दशकांपूर्वी मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षणपध्दतीची रुजवात, त्यांनी स्थापलेल्या एमआयटी या अभियांत्रिकी महाविद्यालयात केली. भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवकानंद यांच्या ‘विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातूनच मानव जातीला सुख, समाधान व शांती लाभेल’  या वचनावर अपार श्रध्दा ठेवून आणि तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांचे अधिष्ठान बाळगून कराड सर हे अव्याहतपणे आज वयाच्या ८१व्या वर्षी देखील काम करत आहेत. त्यांच्या एकूण कामाचा आवाका बघता आपण थक्क होऊन गेल्या शिवाय राहत नाही.

विश्वशांतीचा दीपस्तंभ – जगातील सर्वांत मोठा घुमट

ह्या सर्व संस्थांचा कळसाध्याय म्हणून की काय, ‘तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर – श्री तुकाराम विश्वशांती प्रार्थना सभागृह आणि विश्वशांती ग्रंथालय’ ही जगातील सर्वात मोठा घुमट असलेली वास्तू त्यामधील मानवी कल्याणाचे कार्य करणारे अनेक संत, तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञ यांच्या ५४ भव्य ब्राँझच्या पुतळ्यांच्या माध्यमातून जणू विश्वशांती, मानवता आणि समतेचा संदेश संपूर्ण जगभर पोहचवीत आहे.

या विशाल आणि उत्तुंग विश्व शांती घुमटामध्ये स्थापित आहेत, महात्मा तथागत गौतम बुद्ध ज्यांनी ज्ञानप्राप्तीसाठी कित्येक वर्षांची अखंड तपश्चर्या केली, इथे स्थापित आहेत भगवान येशू ख्रिस्त, ज्यांनी प्रेम आणि करूणेचा संदेश देऊन लोकांना ज्ञानी बनविण्याचा प्रयत्न केला. इथे स्थापित आहेत श्री गुरूनानक देवजी, जे म्हणतात, ‘ज्ञान हे केवळ बोलण्याने नाही प्राप्त होत, त्यासाठी परमेश्वराची कृपा लागते.’ इथे स्थापित आहेत, महात्मा कबीर, बाबा बुल्लेशाह, तत्त्वज्ञसंत श्री तुकाराम महाराज, आद्य शंकराचार्य असे महान ज्ञानी सत्पुरुष, डॉ. अल्बर्ट आईन्स्टाईन, सर आयझॅक न्यूटन, सर मायकेल फॅरडे, डॉ. सी. व्ही. रामन, आर्यभट्ट असे महान ज्ञानी शास्त्रज्ञ, तसे अ‍ॅरिस्टॉटल, सॉक्रेटिस, प्लेटो, कांट असे महान ज्ञानी तत्त्वचिंतक! याच उत्तुंग घुमटामध्ये आहेत, एकवचनी मर्यादापुरुषोत्तम प्रभु श्रीराम आणि ‘धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे’ असे वचन देणारे भगवान श्रीकृष्ण!

                हे सर्व ज्ञानी संतसज्जन, वैज्ञानिक, तत्त्वचिंतक, हे मानवजातीला हेच शिकवत आहेत की, केवळ ज्ञानाची पूजा हीच जगाला सुख, समाधान आणि शांतिचा मार्ग दाखवेल!

या अतिविशाल अशा वास्तूचा केवळ आकडेवारीच्या दृष्टीने विचार केला तरी अचंबित व्हायला होतं. ऐतिहासिक दृष्ट्या पाहिलं तर व्हॅटिकन सिटी येथील सेंट पीटर्स बॅसिलिका या विशाल घुमट असलेल्या वास्तूचे बांधकाम १५व्या शतकात पूर्ण झालं होतं. त्यानंतर मागच्या ६ शतकांच्या कालखंडात संपूर्ण जगात या आकाराचे कोणतेही बांधकाम झालेले नाही! १३६ फूट व्यास असलेल्या या बॅसिलिकापेक्षाही सुमारे २४ फूट अधिक व्यास असलेला हा विश्वशांतीचा घुमट आज २१ व्या शतकात भारतात बांधला गेला आहे, ही या वास्तूची महती आहे आणि ह्याचा आपल्या भारतीयांना सार्थ अभिमान वाटावा अशीच ही बाब आहे.

१६० फूट घुमटाचा व्यास, जमिनीपासून शिखरापर्यंत २६३ फूट उंच, घुमटाखालील सभागृहाचे क्षेत्रफळ २०००० स्क्वे.फूट, खालच्या मजल्यावरील ग्रंथालयाचे क्षेत्र ६२,००० स्क्वे. फूट! सगळी चकित करून टाकणारी आकेडवारी!

विशेष बाब म्हणजे ह्या भव्य वास्तूच्या बांधकामासाठी कोणत्याही आधुनिक स्थापत्य तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला नाही किंवा कोणत्याही नावाजलेल्या बांधकाम कपंनीची देखील मदत घेण्यात आलेली नाही!

आणि ही अशी ऐकमेवाद्वितीय वास्तु निर्माण करणारे स्वतः डॉ. विश्वनाथ कराड सर मात्र, ‘मी केवळ निमित्तमात्र आहे. खरी प्रेरणा ज्ञानेश्वर माऊलींचीच असून, त्यांनीच हे काम करवून घेतले आहे.’ असं विनम्रपणे सांगतात, तेव्हां आपले हात आपोआपच त्यांच्यापुढे जोडले जातात!

विशाल शांती घुमटाचा संदेश

‘एकं सत्, विप्रा बहुधा वदंति’ अर्थात अंतिम सत्य, म्हणजेच ‘परमेश्वर’ हा एकच आहे, विद्वान व ज्ञानी लोक त्याला विविध नावानी ओळखतात, अशा शाश्वत संकल्पनेवर आधारित हे तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर – संत श्री तुकाराम विश्वशांती प्रार्थना सभागृह संपूर्ण जगातील वेगवेगळे धर्म, पंथ, निष्ठा, ज्ञान, संस्कृती या सगळ्यांच्या एकत्रित स्वरूपातून एकमेव अशा अंतिम सत्याचे दर्शन घडवितो, असा आमचा विश्वास आहे.

आमची अशी विनम्र भाा आहे की, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायासह भारतातील समस्त जनतेने अत्यंत अभिमानाने ‘विश्वराजबाग’, लोणी काळभोर, पुणे येथील या असामान्य विश्वशांतीच्या दीपस्तंभाचे प्रत्यक्ष दर्शन घेऊन तिचे सौंदर्य अनुभवावे व ‘भारतीय संस्कृती ज्ञानदर्शन’ या परिसरामधून दिला जाणारा विश्वशांतीचा दिव्य संदेश ग्रहण करून या अद्वितीय कार्याविषयी खात्री करून घ्यावी.

लेखन

      – गिरीश दाते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]