लातूर/प्रतिनिधी ः-
महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरास होणारा पाणीपुरवठा गत महिन्याभरापासून दुषित आणि पिवळ्या रंगाचा होत आहे. याबाबत भाजपाच्या सर्व नगरसेवकांनी दि. 21 एप्रिल रोजी मनपा आयुक्तांना निवेदन दिले होते. यानंतर 28 एप्रिल रोजी भाजयुमोच्या वतीने मनपा परिसरात आंदोलनही करण्यात आले होते. तरीही शुद्ध पाणीपुरवठा होत नसल्याने शहर जिल्हा भाजपाच्या वतीने माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर व खा. सुधाकर श्रृंगारे यांच्या नेतृत्वात दि. 6 मे रोजी भव्य आंदोलन करण्यात आले. या सर्व आंदोलनाच्या नंतरही मनपाच्या वतीने अद्यापही शुद्ध पाणी पुरवठा होत नसल्याने शहर जिल्हा भाजपाच्या वतीने आज दि. 10 मे रोजी दुषित पाणीपुरवठ्याबाबत उचीत प्राधिकरणाकडे दादा मागणार असल्याची नोटीस वजा विनंतीपत्र शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांच्या स्वाक्षरीने आयुक्तांना दिले आहे.

स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करणे ही मनपाची सर्वस्वी जबाबदारी आहे. मात्र गत महिन्याभरापासून लातूर शहरास मनपाच्या माध्यमातून दुषित आणि पिवळा पाणीपुरवठा होऊ लागलेला आहे. या दुषित पाणीपुरवठ्यामुळे लातूरकरांचे आरोग्य धोक्यात येऊ लागलेले असून अनेकांना या पाण्यामुळे झालेल्या व्याधीने उपचार घ्यावे लागलेले आहेत. मात्र मनपा सत्ताधारी व प्रशासनाकडून हे पाणी पिण्यास योग्य असल्याचा दावा सातत्याने करण्यात येत आहे. दुषित पाणीपुरवठ्यामुळे लातूरकरांचे जीव धोक्यात येऊ लागल्याने भाजपा नगरसेवकांच्या वतीने दि. 21 एप्रिल रोजी मनपा आयुक्तांना निवेदन देऊन शहरास शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी केलेली होती. यानंतर दि. 28 एप्रिल रोजी शहर जिल्हा भाजयुमोच्या वतीने मनपा परिसरात दुषित पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले होते.
नगरसेवकांचे निवेदन आणि भाजयुमोचे आंदोलन याची दखल न घेता शहरास दुषित पाणीपुरवठा सुरुच असल्याने दि. 6 मे रोजी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर व खा. सुधाकर श्रृंगारे यांच्या नेतृत्वात शहर जिल्हा भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाच्या माध्यमातून शहरास शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. या आंदोलनास चार दिवस लोटलेले असले तरी अजूनही लातूर मनपाच्या वतीने शहरास दुषित आणि पिवळाच पाणीपुरवठा होऊ लागलेला आहे. मनपा अद्यापही हे पाणी पिण्यास योग्य असल्याचा दावा करीत आहे. मात्र लातूरकरांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येऊ लागलेल्या असून लातूरकरांचे आरोग्य आणखीन धोक्यात घालण्याचे काम मनपाच्या माध्यमातून होऊ लागलेले आहे. परिणाम आज दि. 10 मे रोजी शहर जिल्हा भाजपाच्या वतीने मनपा आयुक्तांना नोटीस वजा विनंती पत्र देऊन शहरास शुद्ध पाणी पुरवठा नाही केल्यास उचीत प्राधिकरणात दाद मागण्यात येईल असा इशारा शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांच्या स्वाक्षरीने देण्यात आला आहे.











