तेजस्वी पत्रकार निळूभाऊ
मी जेंव्हा वृत्तपत्रविद्येचा अभ्यासक्रम करीत होते त्यावेळी अग्रलेख हा एक माझ्या अभ्यासाचा विषय होता. अनंतराव भालेराव, माधव गडकरी, गोविंद तळववळकर आणि नीलकंठ खाडिलकर यांच्या अग्रलेखाचा मी अभ्यास केला होता. अनंतराव भालेराव उर्फ आमचे अण्णा ओरंगाबादेत असल्याने त्यांचा आणि माझा लहानपणापासून परिचय होता. काही कार्यक्रमाच्या निमित्ताने तळवळकर आणि माधव गडकरी यांचीही भेट झाली होती. पण नीलकंठ खाडिलकर यांची कधीही भेट झालेली नव्हती. त्यावेळी त्यांनी विकसित केलेली त्यांची ‘प्रॅक्टिकल सोशालीझम’ ही थियरी खूप गाजत होती. त्यांच्या भाषणाचे वृतांत फार गाजत होते. मी नियमित त्यांच्या पेपर वाचत असे. पुढे नोकरीच्या निमित्ताने मुंबईला जाणे झाले. माझी नोकरी माहिती खात्यात असल्याने विविध पत्रकारांना भेटण्याचा योग रोजच येई. पण खाडीलकरांची भेट होत नव्हती. तो काळ १९९५चा होता. महाराष्ट्रात युतीचे सरकार आले होते. मी त्यावेळचे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांची जनसंपर्क अधिकारी होते. तर माझे पती राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी होते. एकदोन वेळ काही कार्यक्रमात त्यांना ऐकले होते पण भेट झाली नव्हती.
ते खूप स्पष्टवक्ते आहेत. त्याना फारसे कुणी भेटायला गेलेलं आवडत नाही अशा अनेक वदंता त्यांच्याबद्दल ऐकल्या होत्या. श्रीनिवास राजभवनमधील कालावधी पूर्ण करून जेंव्हा १९९९ला मुख्यमंत्री ना. नारायण राणे यांच्या कार्यालयात आला आणि आमची एकदा भाऊशी प्रत्यक्ष भेट झाली. गोरापान वर्ण, वामनमूर्ती, भेदक घारे डोळे, लांब वाढवलेले केस चेह-यावर विद्वत्तेचे तेज आणि एक बेफिकीर भाव असे त्यांचे पहिले दर्शन होते. मी तर प्रथम भारावूनच गेले होते. माझ्या नकळत मी त्याना खाली वाकून नमस्कार केला. ते एकदम कडाडले. म्हणाले, “छे ! मला कुणी पाया पडलेले आवडत नाही.’ मी म्हटले, ‘पण भाऊ मला मोठ्या माणसांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घ्यायला आवडते.’ त्या क्षणी आमची छोटी चकमक होता होता वाचली. मग मात्र आमचे त्यांच्याकडे नित्यनेमाने जाणे सुरु झाले. त्यांची कन्या आणि नवाकाळची संपादिका जयश्री तर माझी जिवाभावाची मैत्रीण झाली.
भाउंचे वैशिष्ट म्हणजे ते लेखनात आणि बोलण्यातही कुणाचा मुलाहिजा ठेवत नसत. आपले म्हणणे ते ठामपणे आणि निर्भीडपणे मांडत. कोट्यावधीची गुंतवणूक असलेली भांडवली वृत्तपत्रांच्या राज्यात ‘मालक-संपादक’ असलेले नवाकाळ हे वृत्तपत्र त्यांनी सर्वाधिक खपाचे वृत्तपत्र करून दाखवले! हा एक विक्रम होता! मुंबईतील गिरणी कामगारांच्या संपामुळे राज्याच्या राजधानीतील कामगारवर्गच देशोधडीला लागला याचे फार मोठे शल्य निळूभाऊंच्या मनात होते. त्यांच्या नवाकाळमधून कामगारांचे प्रश्न ते धडाडीने मांडत. अनेक वृत्तपत्रे विविध कारणासाठी विकली जातात पण भाउंचा पेपर मात्र त्यांच्या अग्रलेखामुळे विकला जायचा हा एक वेगळाच इतिहास आहे. आपल्या वाचकांवर त्यांचे जीवापाड प्रेम होते. वाचकांनी केलेला प्रत्येक फोन निळूभाऊ स्वत: घेत. एका अगदी सामन्य वाचकांने त्यांना ‘अग्रलेखाचा बादशहा’ असा किताब दिला. पत्रकारीतेतील अनेक मानसन्मान त्यांना मिळाले. पद्मश्री पुरस्कारही मिळाला, तो त्यांनी कधी मिरवला नाही. पण एका वाचकाने दिलेला ‘अग्रलेखाचा बादशहा’ हा किताब मात्र भाऊनी आयुष्यभर अभिमानाने मिरवला.
ते सतत कामात असत. पेपरच्या व्यापातून जेंव्हा वेळ मिळे तेंव्हा ते छोटी छोटी पुस्तके लिहित. अशाच एका पुस्तकाच्या प्रकाशनाला शिवाजी मंदिर मध्ये राज ठाकरे आले होते. तेंव्हा त्यांनी नुकताच शिवसेनेतून बाहेर पडून वेगळा पक्ष काढला होता. भाऊनी आपल्या भाषणात त्यांना सांगितले “तुम्ही राजकीय नेते आहात. मी पत्रकार आहे मी राज्य करू शकत नाही पण चाणक्यासारखा तुम्हाला सल्ला देवू शकतो. एकीची शक्ती समजून घ्या आणि उद्धव ठाकरे तुमचे मोठे बंधू आहेत तेंव्हा उद्या सकाळी हातात एक गुलाबाचे फुल घेऊन त्यांना भेटायला जा! बघा काय चमत्कार घडेल तो. तुम्ही दोघे भाऊ एकत्र आलात तर महाराष्ट्रावर राज्य कराल” असा स्पष्ट सल्ला त्यांनी दिला. त्या दिवशीचे त्यांचे चाणक्यनीतीचे भाषण फार उदबोधक होते.
जसे आर.के. लक्ष्मण आपल्या ब्रशच्या एका फटका-याने त्यांचे व्यंगचित्र जिवंत करत तसे भाऊ मोजक्या शब्दात एखाद्या व्यक्तीचे व्यक्तीचित्रण करीत. ‘गोंद्याम्हाद्याची जोडी’ ‘तेल लावलेला पहेलवान’ ‘मैद्याचे पोते’ अशी अनेक उदाहरणे देता येतील.
महाराष्ट्र शासनाने पत्रकारितेचा पुरस्कार त्यांना द्यायचे ठरवले. भाऊंचा स्वभाव बघता ते तो स्वीकारतील की नाही याबद्दल आमच्या मनात साशंकता होती. तेंव्हाचे मुख्यमंत्री स्व. ना. विलासराव देशमुख यांनी ही जबाबदारी माझ्यावर टाकली. मी जयश्रीला विश्वासात घेतले. ती म्हणाली मी बाबांबद्दल काही खात्री देवू शकत नाही. तू स्वत: भेटून त्यांना सांग. मी आमच्या वरिष्ठ अधिका-यांसह त्यांना भेटायला गेले. आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. आम्ही जेंव्हा विषयाकडे वळायचा प्रयत्न करायचो तेंव्हा भाऊ तो विषय टाळायचे. शेवटी चहा पिवून आम्ही परत आलो. पुन्हा दुस-या दिवशी मी एकटी गेले आणि ते काही बोलायच्या आधीच सगळे धडाधडा सांगून टाकले! भाऊनी चष्म्यातून तीक्ष्ण नजरेने माझ्याकडे पाहीले आणि ते म्हणाले, “श्रद्धाताई, आपल्याला असे पुरस्कार नकोत. त्यावर मी म्हणाले, ‘भाऊ, पत्रकारितेतील पुढच्या पिढीला दीपस्तंभ वाटावेत असे काही मोजके लोक आहेत. त्यात तुम्ही आहात. तुम्हाला पुरस्काराचे काही वाटणार नाही पण महाराष्ट्र सरकारला आणि मराठी वाचकांना त्याचा किती आनंद होईल याचा विचार करा. सर्वाच्या आनंदासाठी तुम्ही हा पुरस्कार स्वीकारावा असा माझा हट्ट आहे! बरीच चर्चा झाल्यावर ते म्हणाले, ‘याआधी कुणाकुणाला हा पुरस्कार दिला आहे त्यांची नावे सांगा. त्यावर मी म्हणाले, भाऊ या वर्षीपासूनच जीवनगौरव पुरस्कार सुरु केला आहे आणि तुम्हीच त्याचे पहिले मानकरी आहात. मग भाऊनी पुरस्काराला संमती दर्शवली. सरकारने हा पुरस्कार लगेच जाहीर केला आणि पत्रकारितेतील पहिला जीवनगौरव निळूभाऊ खाडीलकराना देण्यात आला. मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उल्हासदादा पवार, मधुकर भावे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर एक शानदार सोहळा आयोजित झाला होता. सभागृहात जागा पुरणार नाही याचा अंदाज घेऊन त्यादिवशी बाहेर एक खास पडदा लावून त्यावरही सोहळ्याचे प्रक्षेपण करण्यात आले होते.
मला आठवते मुंबई दंगलीबद्दल न्यायमूर्ती श्रीकृष्ण यांनी तयार केलेल्या अहवालावर भाउनी एक अग्रलेख लिहिला होता. शीर्षक अत्यंत प्रक्षोभक होते. “जस्टीस श्रीकृष्ण यांचे डोके ठिकाणावर आहे काय?”! त्या अग्रलेखामुळे सगळीकडे खूप चर्चा रंगली होती. लोकही घाबरले होते. राज्य विधिमंडळाने तर भाऊवर हक्कभंग ठराव आणला. भाऊनी त्यावरही माफी मागण्यास नकार दिला. शेवटी त्यांना कारागृहाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यात भाऊंची तब्ब्येत ठीक नव्हती. मग संपादक या नात्याने सगळी जबाबदारी स्वीकारून त्यांची मुलगी जयश्री हिने ती शिक्षा भोगली आणि आपण त्यांचे खरे वारस आहोत हे लेखणीबरोबरच कृतीनेही सिद्ध केले!
भाऊ म्हणजे जनसामान्यांचे कैवारी, प्रॅक्टिकल सोशालीझमचे प्रणेते होते. त्यांची स्मरणशक्ती विलक्षण होती. कोणत्याही कार्यक्रमाचे वृत्तांकन करताना ते कागद पेनचा वापर करत नसत. कार्यक्रमाचे सर्व बारकावे, तपशील ते डोक्यात ठेवत. त्यांनी विविध व्यक्तींच्या घेतलेल्या मॅरॅथॉन मुलाखतीही फार गाजल्या. मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रात ‘झाले बहु, होतील बहु, परी या सम हाच’ असाच त्यांना उल्लेख करावा लागेल. पत्रकारितेच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्णअक्षरात लिहिले जाईल.
*******
©श्रद्धा बेलसरे-खारकर
८८८८९ ५९०००