आज संक्रांत. सकाळ पासूनच गोड बोलण्या बाबत मेसेज येत आहेत. काय करावं आज ? हा डोक्यात विचार चालू होता. उत्तरायण चालू झाले. नवीन संक्रमण काळ सुरू झाला. सकाळी सगळे आवरून थेट धनगर वस्तीवर गेलो. जाताना गिरी वस्तीवरून संतोष गिरी आणि सचिनला घेतले. धनगर वस्तीवरील प्रत्येक घरात जाऊन सर्वांना तिळगुळ दिला आणि प्रत्येक महिलांच्यासाठी अरुणाताई बनाळेनी दिलेली नवी साडी दिली.
तिथून मग फकीर आणि गिरी वस्तीवरील प्रत्येक घरात जाऊन सर्वांना तिळगुळ दिला. सगळ्यांची विचारपूस केली. सगळेच आनंदात होते. गप्पा झाल्यावर मग शिकलकरी वस्ती गाठली. सर्वांना तिळगुळ दिला. आता निघायचे होते. तो सर्व मुलं माझ्या मागे लागली गाडी घाण झाली आहे आपण ती धुवून टाकू. मला ते अजिबात नको होते. मुलं चांगलीच हट्टाला पेटली होती. त्यात त्यांच्या आया पण त्यांना प्रोत्साहन देत होत्या. शेवटी त्यांनी सर्वांनी गाडीचा ताबा घेतला. सगळेच जण प्रचंड उत्साहाने गाडी धुत होते. बोलताना त्यांचे बोलणे कधी कधी कठोर वाटते. आज त्यांची ही कृती मात्र फारच गोड होती. संक्रांतीच्या दिवशी अशी प्रेमाने ओतप्रोत भरलेली कृती अनुभवताना कमालीचा आनंद होत होता.

गाडी धुवून झाल्यावर प्रत्येक जण स्वच्छ गाडीचे तोंडभरून कौतुक करत होता. शेवटी तुला आमचे ऐकावेच लागले हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड समाधान होते. त्यांनी आज काही तरी त्यांच्या प्रसाददादासाठी केले होते ज्यामुळे त्यांना खूप छान वाटत होते.
तेवढ्यात अंबिका आली तिने माझ्या कपाळाला कुंकू लावलं आणि थेट माझ्या तोंडात तिळगुळ आपल्या हाताने भरवले. अंबिका आता बारावीत गेलीये. मुलांना आता प्रसाददादा त्यांचा खरोखरच मोठा भाऊ वाटतोय हे जाणवत होतं.
ओंकार रापतवारचा लगोलग फोन आला. तो आणि त्याचा मित्र संगीताचे साहित्य घेऊन वस्तीवर आले. मग काय बहारदार मैफिल जमली. एकानंतर एक मधुर गाणी. वस्तीवरील सगळेच लहान थोर यात सहभागी झाली.
शेवटी भारलेल्या मनाने सर्वांचा निरोप घेतला. बा तशी एकल महिला. तिने जाताना परत मला तिळगुळ चक्क भरवला. दादीचे भरपूर आशीर्वाद घेऊन मी घरी निघालो.
ज्ञान प्रबोधिनीचे वस्तीवरील काम सुरू होऊन आता हजार दिवस झाले. वस्तीवरील सर्वांना किती गोड बोलता येईल हे सांगणे कठीण पण त्यांच्या गोड कृतीने मात्र आजची मकरसंक्रांत खासच झाली !! त्यांनी आता आम्हाला आणि ज्ञान प्रबोधिनी अंबाजोगाई ला स्वीकारले याचा आनंद मनात होता !
आपल्याला मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा !!
गोड बोला आणि गोड वागा !!

प्रसाद चिक्षे, अंबाजोगाई