दिलीपकुमार आणि पंडीतजी
काल बुधवारी सकाळी टीव्ही सुरू केल्यानंतर विख्यात अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाची दुःखद बातमी समजली. त्यानंतर विविध क्षेत्रातील लोकांच्या श्रद्धांजली पर प्रतिक्रिया सुरू झाल्या. हा भारतातला असा एक अभिनेता की ज्याने आपल्या मुद्राभिनयाने सर्व रसिकांना जिंकले होते!
मी शाळेत असतानाच दिलीप कुमार यांचे अनेक चित्रपट पाहिले होते. मी, माझे वडील आणि माझा धाकटा भाऊ, आम्हीराम और शाम, गोपी आणि सगीना महातो हे चित्रपट एकत्र बघितल्याचे आठवते. दिलीप कुमार यांचे बहुतेक चित्रपट त्या त्या काळात पुण्यातील चित्रपट गृहात पाहिले होते. मग,गंगा जमुना असेल, संघर्ष असेल, लीडर असेल, त्यांच्या प्रौढावस्थेतील विधाता असेल, सौदागर असेल, हे चित्रपटही चित्र गृहात पाहिले होते. अमिताभ सह दिलीप कुमार यांचा शक्ती, आणि अनिल कपूर सह दिलीप कुमार यांचा मशाल; हे दोन्ही चित्रपट मी पत्रकारितेच्या क्षेत्रात काम सुरू केले तेव्हा पाहिले होते.
हा एक दिग्गज अभिनेता आहे आणि त्याचे अभिनयाचे विविध पैलू वेगवेगळ्या भूमिकेत एक सामान्य प्रेक्षक म्हणून माझ्यासारखे कोट्यावधी लोक अनेक वर्षे पाहत आले आहेत. सहाजिकच काल त्यांच्या निधनाची बातमी आल्यावर धक्का बसला नसला, तरी दुःख झाले.
गेली अनेक वर्ष स्मृतीभ्रंशामुळे दिलीप कुमार यांना सार्वजनिक जीवनात वावरणे अवघड झाले होते. पण दरवर्षी न चुकता त्यांच्या वाढदिवसाला लोक जेव्हा त्यांना शुभेच्छा द्यायचे, तेव्हा त्यांच्या पत्नी सायरा बानू ज्या आपुलकीने, लडिवाळपणे, वत्सलतेने त्यांना बाहेर घेऊन येत असत; ते पाहून अनेकदा डोळ्यात पाणी येत असे.
सायरा बानू यांनी या सगळ्या काळात जणू या महान अभिनेत्याच्या आईची भूमिका बजावली होती. आपण सगळ्यांनी त्यांची वत्सलता काल शेवटच्या क्षणापर्यंत पाहिली होती. त्यांच्या आग्रहामुळेच सायरा बानू यांच्या आग्रहामुळे दिलीप कुमार यांचे आत्मचरित्र प्रकाशित होऊ शकले.
स्क्रीनच्या संपादक असलेल्या उदयतारा नायर यांना घेऊन एके दिवशी सायराबानू दिलीप कुमार यांच्यासमोर गेल्या आणि त्यांनी सांगितले की,
आजपासून तुमच्या आत्मपर पुस्तकाच्या लेखनाची सुरुवात करायची. त्यामुळे दिलीप कुमार यांचे ‘THE SUBSTANCE AND THE SHADOW’,
हे आत्मचरित्र दिल्लीच्या HAY हाऊस इंडिया प्रकाशन संस्थेने 2014 साली प्रकाशित केले.
हे पुस्तक वाचताना दिलीप कुमार यांचा रजत पटावरचा भव्यदिव्य प्रवास आपल्याला समजून येतोच पण त्यापेक्षाही मोठा असलेला त्यांच्यातला माणूस आणि या देशाची त्यांचा असलेला भावबंध, या देशातील सामान्य माणसांबद्दल असलेली चिंता नी काळजी आणि त्यासाठी मदत करण्याची ताबडतोब तयारी; अशा अनेकविध पैलूंचे दर्शन यात घडते.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आणि दिलीपकुमार यांचे खूप प्रेमाचे नाते होते. लंडनमधील विख्यात विद्वान लॉर्ड मेघनाद देसाई यांनी 2004 साली ‘ NEHRU’S HERO : Dilip Kumar in the life of India ‘ या शीर्षकाचे पुस्तक लिहिले होते. मेघनाद देसाई यांनी या पुस्तकात दिलीप कुमार हे नेहरूंचे हिरो आहेत, अशी मांडणी केली होती. उदयतारा नायर यांनी हा संदर्भ देत म्हटले आहे की, नेहरू हे देखील दिलीप कुमार यांचे नायक होते.
आपण सार्वजनिक जीवनात, पडलो पंडितजीमुळे, असे दिलीप कुमार यांनी या पुस्तकात म्हटले आहे. त्यांनी सगळीकडे पंडितजी असा शब्दप्रयोग केला आहे. विशेष म्हणजे नेहरू त्यांना युसुफ या नावाने हाक मारत आणि त्यांच्याशी बोलत.
लोकसभा निवडणुकीत १९६२ साली मुंबई मतदारसंघातून तत्कालीन संरक्षणमंत्री कृष्णमेनन हे निवडणुकीला काँग्रेसतर्फे उभे होते. निवडणुकीत त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचेच पूर्वीचे असलेले ज्येष्ठ नेते पण आता प्रजा समाजवादी पक्षातर्फे निवडणूक लढवणारे आचार्य जे बी कृपलानी हे उभे होते. काँग्रेसच्या प्रचारासाठी आमच्या मुंबईतील काँग्रेस कार्यालयात जाऊन मेनन यांना भेटावे आणि तिथेच रजनी पटेल यांच्याशी बोलावे, असे नेहरूंनी दिलीप कुमार यांना कळवले. आपल्या वडिलांच्या खालोखाल पंडितजींना आदरस्थानी मानत असल्यामुळे त्यांची आज्ञा स्वीकारून ते जुहू येथील काँग्रेसचे कार्यालयात गेले. तिथे रजनी पटेल त्यांना भेटायला आले त्यानंतर मेनन आले. आणि मग या प्रचारामध्ये आपण काय काम केले याची माहिती दिलीप कुमार यांनी दिली आहे. या निवडणुकीत प्रचंड बहुमताने मेनन निवडून आले. दिलीप कुमार यांच्या लोकप्रियतेचा काँग्रेसचे उमेदवार निवडून येण्यात मुंबईतील यशात मोठा वाटा राहिला.
रजनी पटेल आणि दिलीप कुमार यांची दोस्ती वाढत गेली आणि त्यातूनच पुढील काळात शरद पवार मुख्यमंत्री असताना मुंबईचे शेरीफ म्हणून दिलीप कुमार यांना काम करण्याची संधी मिळाली. मुंबईचे शेरिफ असताना दिलीप कुमार यांनी एका खूप चांगल्या गोष्टीसाठी लक्ष घातले आणि त्याचे एक सुंदर प्रत्यंतर आजही मुंबईत येते आहे.
एका भेटीत दिलीप कुमारांनी रजनी पटेल यांना सांगितले की, मुंबईसारख्या महानगरात एका सांस्कृतिक, विज्ञान केंद्राची गरज आहे; जिथे कलावंत आपली कला सादर करू शकतील, जिथे तरुण वैज्ञानिक आपली प्रात्यक्षिके सादर करू शकतील, लेखक, संगीताचे साधक असे सगळे एकत्र येऊन या विविध कलांची देवाण-घेवाण करु शकतील… अशी एक सुंदर जागा निर्माण केली पाहिजे. आणि विशेष म्हणजे रजनी पटेल यांनी ही गोष्ट पंतप्रधान इंदिरा गांधींना सांगितल्यावर त्याने ताबडतोब त्याला हिरवा कंदील दाखवला आणि आज मुंबईतील वरळी येथे जे नेहरू सेंटर उभे आहे, त्याची सुरुवात त्यावेळी झाली.
दक्षिणेतील एक दिग्दर्शक पैगाम हा चित्रपट करत होते आणि त्यात नायक दिलीप कुमार होते. त्यावेळी पंडित नेहरूंना या दिग्दर्शकांनी व त्यांच्या कंपनीने निमंत्रित केले होते. नेहरू आल्यानंतर दिलीप कुमार दूर उभे असल्याचे दिसले. नेहरू चालत त्यांच्यापर्यंत गेले आणि त्यांचा हात हातात घेऊन त्यांच्याशी बोलू लागले. अशा अनेक गोष्टी या पुस्तकात वाचायला मिळतात.
भारतातला हा एक दिग्गज अभिनेता, पहिला सुपरस्टार!
डॉ.जब्बार पटेल आणि सत्यजित रे यांच्या भाषेत सांगायचे तर भारतीय चित्रसृष्टीतील पहिला मेथड ॲक्टर म्हणजे दिलीप कुमार. जब्बार पटेल यांच्याशी दिलीप कुमार यांचे छान स्नेहसंबंध होते.
एक चित्रपट निर्माते ए. आर. करदार यांनी काही चुकीचे आरोप करून दिलीप कुमार यांना एका खटल्यात अडकवले होते, त्या पाच वर्षांच्या काळात सार्वजनिक जीवनातून जणू संन्यास घेतलेले दिलीप कुमार विविध विषयांचा अभ्यास करत होते. अनेक चित्रपट निर्माण करण्याची त्यांची कल्पना त्याच काळात साकार होत होती. याच काळात काला आदमी, बाबाजान अशा काही चित्रपटांची स्क्रिप्ट स तयार झाली होती. बाबाजान चित्रपटाचे दिग्दर्शन जब्बार पटेल यांनी करावे अशी दिलीप कुमार यांची इच्छा होती. त्यासाठी जब्बार पटेल यांच्या बरोबर अनेक बैठका झाल्याची नोंदही त्यांनी या पुस्तकात केली आहे. नंतर मात्र हे सगळे बारगळले.कारण,
मनोज कुमार यांनी क्रांती चित्रपटाचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला आणि मग ते पुन्हा गुंतून गेले.
माझे वडील मला अनेकदा दिलीप कुमार पुण्यात होते हे सांगत असत. पण या त्यांच्या आत्मचरित्रातून काही गोष्टी माहिती झाल्या.पुण्याच्या लष्कर भागातील आर्मी क्लबमध्ये ते काम करत होते. अचानक एका प्रसंगात त्यांना पोलिसांनी अटक केली. झाले असे… तो दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता. बहुदा चलेजाव आंदोलन सुरू झाले होते. पुण्याच्या येरवडा तुरुंगात सरदार पटेल आणि अन्य नेते बंदिवासात होते. आर्मी क्लबमध्ये दिलीप कुमार यांनी उस्फूर्तपणे भाषण केले. अचानक टाळ्यांचा कडकडाट सुरू असताना समोर पोलीस येताना दिसले. त्यांनी हातकड्या घालून त्यांना पकडले आणि येरवडा तुरुंगामध्ये टाकले. आपल्याला तेथील जेलरने तेथे गेल्यावर हा गांधी वाला, असे म्हटले. दिलीप कुमार यांना ही गोष्ट खूप अभिमानाची वाटली. दुसऱ्या दिवशी आर्मी क्लबचे अधिकारी त्यांना सोडवून घ्यायला आले, तेथून जातानाही घ्या तुमचा गांधी वाला, असे तो जेलर परत म्हणाला. आपण गांधीजींच्या विचारांचे कार्यकर्ते म्हणून एक दिवस का होईना तुरुंगवास सोसला, याचा आनंद आणि आपण निर्भयतेने त्यामुळेच बोलू शकतो, हा विश्वास जागा झाला असे दिलीप कुमार यांनी यात म्हटले आहे.
पंडित नेहरू यांच्यामुळे रजनी पटेल, रजनी पाटील यांच्यामुळे शरद पवार, शरद पवार यांच्यामुळे सुरेश कलमाडी अशी एक मोठी काँग्रेसची साखळी
दिलीपकुमार यांच्याशी जोडली गेली.
बऱ्याच वर्षापूर्वी तुम्ही आम्ही सर्वांनीच लंडनच्या अल्बर्ट हॉलमधील लता मंगेशकर रजनीचा कार्यक्रम पाहिला असेल. त्या कार्यक्रमात लता मंगेशकर यांचा परिचय करून देण्याची थोरल्या भावाची भूमिका दिलीप कुमार यांनी निभावली होती. आजही ते भाषण ऐकताना उर्दू, हिंदी आणि पर्शियन या भाषेतील किती समृद्ध आणि सुंदर शब्दांचा उपयोग दिलीप कुमार यांनी केला होता हे जाणवते.आणि आपण लंडनमधील हजारो प्रेक्षकांच्या बरोबरच टाळ्या वाजवण्यात सहभागी होतो; हा अनुभव अनेकदा आला आहे!
खूप मोठा अभिनेता, त्याहून मोठा माणूस,अलौकिक असा जणू हिराच! या पुस्तकाच्या प्रस्तावनेत सायरा बानो यांनी माझा कोहिनूर, असा त्यांचा प्रेमाने उल्लेख केला आहे.
दिलीप कुमार अजून काही काळ थांबले असते तर पुढील वर्षी साऱ्या देशाने त्यांचा शतकपूर्तीचा वाढदिवस किती आनंदाने साजरा केला असता!
या महान अभिनेत्याला माझ्यासारख्या शेकडो प्रेक्षकांची अंतकरणपूर्वक श्रद्धांजली !!
अरुण खोरे,पुणे.











