23.4 C
Pune
Monday, October 27, 2025
Homeसांस्कृतिकदिवाळी पहाट स्वरमैफलीने लातूरकर मंत्रमुग्ध

दिवाळी पहाट स्वरमैफलीने लातूरकर मंत्रमुग्ध

लातूर अर्बन को-ऑप बँकेतर्फे सुरेल कार्यक्रमाचे आयोजन

लातूर :दिवाळीच्या शुभप्रसंगी लातूर अर्बन को-ऑप बँक लातूरच्या वतीने आयोजित ‘दिवाळी पहाट स्वरमैफली’ ने लातूरकर रसिकांच्या मनावर अमिट ठसा उमटवला. अष्टविनायक मंदिर परिसरात पहाटे संगीताच्या सुरेल लहरींच्या सहवासात सुरांची आराधना रंगली.

सकाळी ५.३० वाजता सुरुवात झालेल्या या मैफलीची सुरूवात ‘अलबेला सजन आयो रे’ या अहिर भैरव रागातील बंदिशीने झाली. हार्मोनियमवर ओंकार अग्निहोत्री आणि व्हायोलिनवर अनुप कुलथे यांनी सुंदर सादरीकरण करत रसिकांची मने जिंकली.यानंतर सुप्रसिद्ध गायिका अंजली गायकवाड आणि युवा गायक कैवल्य केसकर यांनी बंदिश सादर करत श्रोत्यांना तन्मयतेच्या दुनियेत नेले. अंजली गायकवाड हिने “कट्यार काळजात घुसली” चित्रपटातील ‘दिल की तपिश’ आणि ‘घेई छंद मकरंद’ या नाट्यगीतांनी प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट मिळवला.कैवल्य केसकर यांनी ‘सुर निरागस हो’, ‘कानडा राजा पंढरीचा’ या भावगीतांद्वारे श्रवणीयता निर्माण केली. ओंकार अग्निहोत्री यांनी हार्मोनियमवर विविध गझला सादर करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

विशेष म्हणजे त्यांनी स्वतः विकसित केलेल्या ‘रेझोनियम’ या नव्या वाद्यावर विविध चित्रपटगीते व रचना सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.तालसंगतीत तनय रेंगे यांनी तबल्यावर, बालू कांबळे यांनी अ‍ॅक्टोपॅडवर, ओंकार रोजगरे यांनी ढोलकी आणि ढोलकवर, तसेच मंगेश जोशी यांनी सिंथेसायझरवर अप्रतिम साथ दिली.

कार्यक्रमास प्रदीप राठी (चेअरमन, लातूर अर्बन को-ऑप बँक), दिलीप माने, अभय शाह, प्रा शिवराज मोटेगावंकर शुभदा रेड्डी व संचालक मंडळ, प्रा. शशिकांत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.१० हजार दीप प्रज्वलित करून नयनरम्य दीपोत्सव करण्यात आला होता.पहाटेपासून ते सकाळी ९ वाजेपर्यंत चाललेल्या या संगीत मैफलीला लातूरकर संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भरभरून प्रतिसाद दिला.

स्वर, ताल आणि भावनेच्या संगमाने सजलेली ही दिवाळी पहाट रसिकांच्या मनात दीर्घकाळ गुंजत राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]