लातूर जिल्ह्यातील २६० रुग्णांच्या होणार शस्त्रक्रिया
लातूर : आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या दिशा प्रतिष्ठानच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त २३ मार्च रोजी लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी नाव नोंदणी ठेवण्यात आली होती. जवळपास ६०० रुग्णांची तपासणी यावेळी तज्ञ डॉक्टरांनी केली. ज्यात २६० रुग्णांच्या शस्त्रक्रिया या आता लातूरमध्ये केल्या जाणार आहेत.
लातूर जिल्ह्यातील सर्व १० तालुक्याच्या ठिकाणी मोफत शस्त्रक्रिया शिबिरासाठी नाव नोंदणी करण्यासाठी ६०० रुग्णांनी हजेरी लावली. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ०५ तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने म्हणजेच जवळपास ५० तज्ञ डॉक्टरांनी नोंदणीसाठी आलेल्या रुग्णांची तपासणी केली. या तज्ञ डॉक्टरांच्या पथकामध्ये कान-नाक-घसा, आर्थोपेडिक, जनरल, ऑपथेम तसेच स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांचा समावेश होता. तज्ञ डॉक्टरांनी तपासणी केलेल्या २६० रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ज्यात सर्वाधिक डोळ्यांच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. तर त्या पाठोपाठ कान-नाक-घसा, जनरल सर्जरी, हाडांच्या, मणक्याच्या, हृदयाच्या, प्रोस्टेट ग्रंथी आणि अँजिओप्लास्टीच्याही शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.

नोंदणी झालेल्या २६० पैकी २४ शस्त्रक्रिया या पूर्णपणे मोफत होणार आहेत. तर उर्वरीत २३६ शस्त्रक्रिया या ५० टक्के सवलतीत केल्या जाणार आहेत. या सर्व शस्त्रक्रिया दिनांक बुधवार 27 मार्च ते 10 एप्रिल या कालावधीत लातूर शहरातील सह्याद्री हॉस्पिटल, पोद्दार हॉस्पिटल, काळे हॉस्पिटल, गोरे हॉस्पिटल, सदासुख हॉस्पिटल, सिग्मा आय हॉस्पिटल, कुलकर्णी हॉस्पिटल, मोरया हॉस्पिटल, प्रज्वल नेत्रालय तर निलंगा येथील गणेश नेत्रालय येथे केल्या जाणार असल्याची माहिती दिशा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक संचालक डॉ अशोक पोद्दार, अभिजित देशमुख, डॉ. चेतन सारडा, डॉ. हणुमंत किनीकर, संतोष देशमुख, प्रसाद उदगीरकर, किशोर भुजबळ, रतन बिदादा, अविनाश कामदार, प्रसाद जोशी, महेश मालपाणी, पप्पु घोलप यांनी दिली आहे. तालुका समन्वयक म्हणून मारोती पांडे, कल्याण पाटील, डॉ अरविंद भातांब्रे, डॉ. गणेश कदम, निलेश देशमुख, श्याम भोसले, मुकेश राजेमाने, डॉ. नवनाथ सोनाळे यांनी सहकार्य केले.

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठान चे अध्यक्ष सोनू डगवाले संचालक अॅड. वैशाली यादव, इसरार सगरे, जब्बार पठाण, विष्णू धायगुडे, अजय शहा यांनी
परिश्रम घेतले.