वाढदिवस विशेष
प्रा. विश्वनाथ कराड सर हे एक उत्तम शिक्षक, व्यासंगी वक्ते, कुशल प्रशासक आहेत. विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय साधणारे विचारवंत व तत्त्वज्ञ आहेत. त्यांच्या वयाला ८२ वर्ष पूर्ण होत आहेत, त्या निमित्त दिलीप फलटणकर यांचा हा लेख.
श्री. दिलीप फलटणकर,
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षक
आता कोरोनामुळे घराबाहेर पडता येत नाही. बिल्डिंगच्या टेरेसवर नातवंडांबरोबर दिवेलागणीच्यावेळी खेळत असतो. आकाशात एखादी टपोरी चांदणी दिसते, एकेक चांदणी करता सगळं आकाश तार्यांनी भरून जातं. सगळे आकाश लखलखून जाते. डॉ. विश्वनाथ कराड सरांच्या आठवणींच तसचं आहे. आम्ही भेटलो ती पहिली भेट ओझरती आठवते. मी ३१ जानेवारीला सेवानिवृत्त झालो आणि नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण साहेबांसोबतची ती पहिली भेट होती, खळखळून हसणारे आणि मुद्देसुद बोलणारे डॉ. विश्वनाथ कराड सर हे व्यक्तिमत्त्व मला भावले.

विद्येच्या माहेरघरात विद्यापीठ
मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील रामेश्वर (रुई) हे प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांचे जन्मगांव. तेव्हा गावाची लोकसंख्या फक्त पंधराशे होती. कराड सरांच्या घरात पिढ्यानपिढ्या वारीची परंपरा होती. राष्ट्रपुजक दादाराव व आई सरस्वती या आई-वडिलांच्या पोटी जन्म घेतला. गावात शाळा नव्हती. गुरांच्या गोठ्यात शाळा भरायची. व्यंकटेश कुलकर्णी नावाचे गृहस्थ गावातील मुलांना गोळा करून शिकवीत. पुढील शिक्षणासाठी ते सोलापूरच्या दयानंद महाविद्यालय येथे आले. तेव्हा त्या कॉलेजचे प्राचार्य श्रीराम शर्मा व लोकप्रिय शिक्षक गोडबोले सरांनी त्यांना अभियांत्रिकीला प्रवेश घेण्याचा सल्ला दिला.
यांनी घडवले महाराष्ट्राचे शिक्षणातील अर्धशतक
पुण्यातील एकमेव सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेवून त्याच महाविद्यालयात पुढे ते शिक्षक झाले. त्यांच्या मनात विचार आला, महाराष्ट्रातील पुणे-मुंबई येथे असणारी अभियांत्रिकी महाविद्यालयात मुठभर उच्च वर्णियांसाठी उपयुक्त आहेत. ही ज्ञानगंगा खेड्यापाड्यात खेळवली पाहिजे. डॉ. विश्वनाथ कराड सरांची कार्यपद्धतीचे विशेष म्हणजे ताबडतोब कार्यवाही. मनात विचार आला की, त्याची कार्यवाही तपशीलवार योजनेत व्हायला वेळ लागत नसे. १४ एप्रिल १९८१च्या महाराष्ट्र टाईम्स दैनिकांत अग्रलेखाशेजारी त्यांचा लेख प्रकाशित झाला. त्यावेळचे कमल किशोर कदम, उत्तमराव पाटील यांनी हा विषय मंत्रालयात मांडला. १९८३ साली महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मा. नामदार वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालयांना मान्यता दिली. त्यावेळी डॉ. विश्वनाथ कराड सरांनी आशिया खंडात शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक मिळवणार्या डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे स्वप्न पाहिले. पण त्यावेळी होता मनात फक्त दुर्दम्य आशावाद आणि आपले स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द. रामेश्वर (रुई) येथून खेड्यातून आलेला, शिवाजीनगर येथील मॉर्डन कॅफे शेजारी महाराष्ट्र बँकेत स्वतःच्या खात्यावर असवणारी अल्पशी रक्कम या ताकदीवर हा आधुनिक भगीरथ ज्ञानाची गंगा खेड्यापाड्यात पोहचविण्याचे स्वप्न पहात होता.

अध्यात्म, विज्ञान आणि शिक्षण याची सांगण घालणारे डॉ. विश्वनाथ कराड सर
सामाजिक परिवर्तनाला उपयुक्त ठरणार्या संस्था किती चैतन्यपूर्ण, कार्यक्षम आणि प्रयोगशील आहेत यावर त्या संस्थेचे, देशाचे भवितव्य अवलंबून असते. नव्या जगाचा वेध घेत वाटचाल करणारी संस्था म्हणून माईर्स एमआयटी संस्थेकडे पहावे लागते. अध्यात्माला तंत्रज्ञान आणि तत्त्वज्ञानाची जोड दिली. मानवी इतिहासाची वाटचाल अध्यात्म आणि विज्ञानाच्या हातात हात घालून झाली आहे, मूल्य विचाराला वेगळे काढणे शक्य नाही. मुलांचे व्यक्तिमत्त्व संपन्न बनवणे हे एमआयटीचे ध्येय आहे. माझ्या कुटुंबाबद्दल समाजाबद्दल, पर्यावरणाबद्दल, सृष्टीबद्दल मला माया आहे, आस्था आहे. माझ्या संस्कृतीबद्दल मला आदर आहे असे शिक्षण दिले जाते, म्हणून डॉ. विश्वनाथ कराड सरांच्या व्यक्तिमत्त्वाला लोकप्रियतेचे आणि लोकसंग्रहाचं वारं सदैव वाहत राहील.

अनेक संस्थाचे आधारवड
संस्थेसाठी विविध क्षेत्रातील अभ्यासू व नामवंत माणसे जोडून घेणे हे मा. विश्वनाथ कराड सरांचे वैशिष्ट्ये आहे, भारतीय सर्व धर्माचे, संस्कृतीचे एकात्मतेचे ते प्रवक्ते आहेत, म्हणूनच वयाच्या ८२व्या पदार्पण करतांना सात्वीकतेचं, विद्वतेचे आणि सुसंस्कृतपणाचे तेज व्यक्तिमत्त्वावर झळाळत असते. चांगलं काम करणार्या संस्थेला आर्थिक मदत करतील. पण चुकीचं काम करणार्यांना कधीही पाठीशी घालणे हा त्यांचा स्वभाव नाही. ते स्पष्ट वक्ते आहेत.
मातृतुल्य प्रयागाआक्कांन ज्या मायेनं घडवलं, त्याचं ऋण, पावित्र्य आयुष्यभर जपलं. म्हणूनच गुरांच्या गोठ्यात शिक्षणाची सुरुवात करणारे डॉ. विश्वनाथ कराड सर, एका विद्यापीठाचे कुलपती झाले. त्यांच्या आयुष्याच्या क्षितिजावर शंभर वर्ष होईपर्यंत पौर्णिमेचं चांदणं उजळत राहो, हीच पंढरपुरच्या पांडूरंग चरणी प्रार्थना!

श्री. दिलीप फलटणकर,
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षक,
रिद्धी सिद्धी सोसायटी बी विंग ५०१, पुणे-४५
भ्रमणध्वनी: ९८८१४१९७९६




