माजी मंत्री आ. निलंगेकरांच्या पाठपुराव्याने 21.40 कोटीच्या निधीस मंजुरी
लातूर/प्रतिनिधीः– निलंगा मतदारसंघातंर्गत असलेल्या देवणी तालुक्यातील शंभर मुलींसाठी शासकीय निवासी शाळा उभारली जावी अशी मागणी माजी मंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली होती. याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्याने आता देवणी तालुक्यात शंभर मुलींसाठी शासकीय वसतिगृह उभारण्यासाठी 21.40 कोटी रूपयांच्या निधीस मंजूरी मिळाली आहे. या माध्यमातून लवकरच या वस्तीगृहाच्या कामास सुरुवात करण्यात येईल असा विश्वास देऊन माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले आहेत.
निलंगा मतदारसंघातील देवणी हा तालुका महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सिमेवर आहे. या तालुक्यातील देवणी शहरात शिक्षण घेण्यासाठी तालुक्यासह कर्नाटक राज्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळेच देवणी हे शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते. देवणी येथे शिक्षणासाठी येणार्या विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थींनीची संख्याही लक्षणीय आहे. मुलींना शिक्षण मिळावे याकरीता केंद्रासह राज्य सरकारच्या वतीने विविध उपक्रम आणि योजना राबविण्यात येत आहेत. विशेष म्हणजे समाजातील प्रत्येक घटकात असलेल्या विद्यार्थींना शिक्षण मिळावे याकरीता विशेष प्राधान्य देऊन बेटी बचाव बेटी पढाव हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. याच माध्यमातूनच देवणी तालुक्यात अनुसुचीत जाती व नवबौद्ध समाजातील मुलींकरता शासकीय शाळा व वस्तीगृह उभारले जावे अशी मागणी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली होती. याबाबत आवश्य असणारा प्रस्ताव दाखल करून त्याकरीता पाठपुरावा करण्यात येत होता. या पाठपुराव्याला यश आले आहे.
शासनाच्या वतीने देवणी तालुक्यात शंभर मुलींसाठी शासकीय वस्तीगृह उभारण्याच्या प्रस्तावास मंजूरी देऊन त्यांसाठी आवश्यक असणारा 21.40 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या निधीच्या माध्यमातूनच लवकरच देवणी तालुक्यात चार मजली वस्तीगृह उभारण्याच्या कामास सुरुवात होईल असा विश्वास व्यक्त करून या वस्तीगृहाचा लाभ देवणी तालुक्यातील विद्यार्थींना होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर देवणी तालुका केवळ लातूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातही शैक्षणिक केंद्र म्हणून नावलौकिक प्राप्त करेल असा विश्वासही माजीमंत्री आ. निलंगेकरांनी व्यक्त केला आहे. सदर वस्तीगृह उभारण्यास मंजूरी देऊन निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल देवणी तालुक्यातील नागरीकांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.