वसुंधरा प्रतिष्ठानतर्फे ‘माणुसकीची दिवाळी’ उपक्रम साजरा
लातूर : ज्यांचं कोणी नाही, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे या प्रामाणिक हेतू घेऊन वसुंधरा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने गेल्या सात वर्षांपासून ‘माणुसकीची दिवाळी’ हा अनोखा उपक्रम हाती घेत अनाथ बालकांना दिवाळीनिमित्त नवे कपडे, मिठाई आणि फटाके देऊन हा आनंदाचा उत्सव साजरा केला जातो. यावर्षीही लातूर शहरातील एमआयडीसी भागातील अनाथ मुलींचे निरीक्षण गृह येथे माणुसकीची दिवाळी साजरी झाली. हा उपक्रम लक्ष्मीपूजन अर्थात सोमवारी राबविण्यात आला.
वसुंधरा प्रतिष्ठानतर्फे अनाथ, दुर्बल आणि उपेक्षित घटकांसोबत दरवर्षी माणुसकीची दिवाळी साजरी केली जाते. अनाथ बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे हा प्रामाणिक हेतू घेऊन हा उपक्रम गेल्या सात वर्षांपासून सातत्याने राबविला जातो. या उपक्रम अंतर्गत अनाथ बालकांना नवीन कपडे, मिठाई आणि फटाके दिले जातात. यासोबतच जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत स्वतः पोहोचून त्यांनाही मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला जातो. वसुंधरा प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असते. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी एमआयडीसी येथील मुलींचे अनाथ आश्रम येथे माणुसकीची दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी येथील अनाथ मुलींना नवीन कपडे, मिठाई आणि फटाके भेट देण्यात आले. या उपक्रमासाठी सोनाली खानापुरे, रतन झंवर मित्र परिवार, डॉ.अजित चिखलीकर मित्र परिवार, अमोल पोतदार, अक्षय घोगडे, आंनद वेदपाठक, गौस मणियार, दत्ता जाधव यांनी विशेष सहकार्य केले. सिने अभिनेते सचिन दानाई यांच्या हस्ते या भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.योगेश शर्मा, कार्याध्यक्ष अमोलआप्पा स्वामी, सदस्य गौसपाशा मणियार, दत्ता जाधव, उमेश ब्याकुडे, समर्थ स्वामी, हर्ष ब्याकुडे, श्रेयश शर्मा, निरीक्षण गृहाचे व्यवस्थापक मलवाडे आदींची उपस्थिती होती.

अंतःकरणातून सामाजिक करणारी टीम म्हणजे वसुंधरा : सचिन दानाई
*********
वसुंधरा प्रतिष्ठानचे सामाजिक कार्य खरोखरच उल्लेखनीय आणि प्रेरणादायी आहे. अनाथ आश्रमात स्वतः जाऊन माणुसकीची दिवाळी साजरी करणे म्हणजे या लेकरांप्रती तळमळीने कार्य करणे होय. गेल्या सात वर्षांपासून हा उपक्रम होतोय. याआधीही वसुंधरा प्रतिष्ठानच्या अनेक उपक्रमात मी सहभागी झालो आहे. खरोखरच ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही प्रांजळ भावना ठेवून अंतःकरणातून निसर्ग रक्षण आणि सामाजिक कार्य करणारी टीम म्हणजे वसुंधरा प्रतिष्ठान होय, अशी भावना सिने अभिनेते सचिन दानाई यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

समाजाचे आपण देणेकरी आहोत : प्रा.योगेश शर्मा
*********
ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण देणेकरी आहोत. दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी वसुंधरा प्रतिष्ठानने अनाथ, दुर्बल आणि उपेक्षित घटकांसोबत ‘माणुसकीची दिवाळी’ साजरी केली. या अनाथ लेकरांच्या चेहऱ्यावर हास्य पाहून खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केल्यासारखे आम्हाला वाटते. सर्वांच्या सहकार्याने दिवाळी आम्ही अशा पद्धतीने साजरी करू शकतो. माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी असे उपक्रम होणे काळाची गरज आहे. आमच्या हातून हे कार्य घडते आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो, अशी भावना वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.योगेश शर्मा यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.



 


