नांदेड आणि धनंजय चिंचोलीकर !-
रजनीश जोशी
१९९१ साली नांदेडच्या ‘लोकपत्र’मध्ये काम करताना ज्या सहकाऱ्यांशी ‘दोस्ती’ झाली ती आजतागायत कायम आहे. त्यांच्यातल्या अनेकांच्या भेटीगाठी आता दुर्मिळ आणि अशक्य झाल्या आहेत.

धनंजय चिंचोलीकर, गोपाळ कुलकर्णी, हरिहर पांडे, विजय जोशी, नयन बारहाते, अनिकेत कुलकर्णी ही त्यातली काही ‘गिनिचुनी’ मंडळी. सहसंपादक रमेश राऊत आणि एसेम देशमुख वृत्तसंपादक आणि (संतोष महाजन सरांनंतर) पुढं संपादक झाल्याने आब राखून होते आणि आहेत.प्राचार्य रा. रं. बोराडेंचा शिष्य असलेल्या धनूचं तेव्हा कथांचं एक पुस्तक प्रकाशित झालेलं होतं. बोराडे सरांचीच शैली त्यातून दिसत होती, त्याची त्याला जाणीव होती, त्यामुळं त्या पुस्तकाचा तो उल्लेख करत नसे.

मी राहायला नांदेडच्या खादी भांडार परिसरात होतो.
नांदेडच्या एमआयडीसी भागातल्या आमच्या ऑफिसजवळ एका झाडाखाली चहाचा गाडा होता. तिथं आम्ही बऱ्याचदा चहा प्यायला जात असू. सडाफटिंग असल्यामुळं कायम ऑफिसातच. श्री. रमेश राऊत अल्पावधीतच ‘लोकपत्र’सोडून परतल्यानंतर त्याच्याकडं साप्ताहिक पुरवण्यांची जबाबदारी आली. तो ती पुरेशा ‘गांभीर्या’ने पार पाडे. साहित्यिक प्रकाश मेदककर, श्रीकांत देशमुख आणि अन्य मंडळी अधूनमधून ऑफिसमध्ये येत. तेव्हा ‘युनिक फीचर्स’चे आनंद अवधानी विविध लेख घेऊन पुण्याहून येत. पुरवण्यांमध्ये ते वापरण्याबाबत धनू तयार नसे. ‘स्थानिक लेखकांना सांगू’, असा त्याचा पवित्रा असे. त्या लेखांचं महत्त्व आणि श्री. अवधानी व त्यांच्या मित्रांच्या ‘फीचर सर्व्हिस’चं वेगळेपण त्याच्या लक्षात आणून दिलं, तेव्हा त्याने ते वापरायला सुरूवात केली. ही सेवा घ्यावी की नाही याबाबत ‘एसेम’नी आमचा सल्ला घेतला होता, हे विशेष उल्लेखनीय आहे.

आरंभी समोरासमोर आणि नंतर माझ्या शेजारच्या टेबलवर धनू बसत असे. त्यावेळी वाचनाची व.पु., पु.ल., बुवा ही इयत्ता पार करून आम्ही जी.ए., आरती प्रभू, ग्रेस, विंदा, साधू यांच्याकडं वळलो होतो. त्यांच्यासह अरूणा ढेरेंच्या नव्या कविता (‘मंत्राक्षर’, ‘यक्षरात्र’) आमच्या चर्चेत असत. भारत सासणे, दत्ता भगत, भास्कर चंदनशिव, सखा कलाल, फ.मुं.शिंदे, ‘अलोन’ यांच्याही कविता, नाटक, कादंबरी-कथांवर आम्ही अहमहमिकेनं बोलत असू. अर्थातच चर्चा आणि मतभेद!माझ्या खादी भांडारातल्या खोलीवर मुक्कामाला अनेकदा धनू, हरिहर, अनिकेत आणि गोपाळ कुलकर्णी येत असत. अनिकेतची शेवटची सिडको बस चुकली की ते थेट माझ्या खोलीवर येत. कधी कधी अभिराम सराफ (तो तेव्हा नांदेड आकाशवाणीवर होता), ‘डोस्टोव्हस्की’चा फॅन सुधीर कुलकर्णी असत. नयन बारहाते नागपूर-अकोला असा प्रवास करून नांदेडमध्ये एकटाच दाखल झाला, तेव्हा तोही कधी माझ्या खोलीवर मुक्कामाला असे. रात्र रात्र मोठमोठ्या आवाजात चर्चा चाले. खोली रेल्वेस्टेशनजवळ होती. चर्चेला ऊत आला की मध्यरात्री चहा प्यायला स्टेशनवर. एकदा परत येताना भला मोठा सर्प आडवा सरकत सरकत रस्ता ओलांडत होता. तेव्हा गोपाळ कुलकर्णीसह आम्ही खिळून एकाजागी स्तब्ध झालो होतो. धनूशी चर्चेचा वितंडवाद होई, तो थेट अबोल्यापर्यंत पोचे. आठवडाभरानंतर पुन्हा ऑफिसच्या चहाच्या कँटिनवर तह होई. ‘लोकपत्र’मधल्या अडीच वर्षांच्या खूप आठवणी आहेत. त्याच्या बब्रुवान रुद्रकंठावारचा जन्म अद्याप व्हायचा होता. एका दिवाळी अंकात त्यानं ‘चौथी इस्टेट’ लिहिली होती. मराठवाडी लेखनशैलीची तयारी तो लेखांतून करीत असे. त्याने काही एकांकिका लिहिल्या होत्या. ‘घनभार’ नावाची एकांकिका मुंबईच्या एका स्पर्धेसाठी मी करणार होतो. धनूने माझ्याआधी ‘लोकपत्र’ सोडलं आणि व्यवस्थापनाकडून पुन्हा बोलावणं आल्यानं जॉईन केलं. त्याचा ‘व्यक्तिगत आयुष्यात’ त्याला चांगला लाभ झाला. सुरूवातीला आमचा ‘पोस्टकार्ड व्यवहार’ होता. पुढं तो कमी झाला. मग मोबाईलवर संभाषण सुरू झालं. पुढं तेही कमी झालं. पंढरपूरला आजोळी आला की तो तिथूनच फोन करत असे. धनू आजारी आहे हे समजल्यावर त्याच्याशी फोनवरून बोलणं झालं होतं. महिन्या-दीड महिन्याभरापूर्वी शाहू पाटोळे सोलापूरात माझ्या घरी आल्यावरही धनूच्या तब्येतीचा विषय निघाला. शिवाय फेसबूक होतेच. पण तिथलाही त्याचा वावर कमी झाला.

रजनीश जोशी , जेष्ठ पत्रकार सोलापूर
०००




