महाशिवरात्रीनिमित्त “नागनाथा” च्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
श्री साईनाथ सेवाभावी मंडळातर्फे फराळाचे वाटप
……
वडवळ नागनाथ:
नऊ नाथा पैकी एक, पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान तसेच वडवळ नागनाथ (ता. चाकूर) येथील ग्रामदैवत वटसिद्ध नागनाथ मंदिरात महाशिवरात्री निमित्त मंगळवारी “स्वयंभू” शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. “भवं तारक् हे तुझ्या पादुका, वंदिन मी माथा..,करावी कृपा नागनाथा..!” हे स्तवन गात देवाला विनवणी करून भाविकांनी नागनाथाचे दर्शन घेतले.

महाशिवरात्री निमित्त वटसिद्ध नागनाथ मंदिरात मंगळवारी मध्यरात्रीपासुनच “ओम नमः शिवाय…” च्या मंत्रोच्चाराने संपूर्ण मंदिर परिसर शिवमय झाला होता. यावेळी मध्यरात्री नागनाथ संस्थानच्या महिला भजनी मंडळातर्फे संगितमय असे अकरा रूद्राचे वाचन करून जल आणि दुधाने “श्री” चा महाअभिषेक झाल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी करून लांबच लांब रांगा लावल्या होत्या. भाविकांच्या नवसाला पावणारे हे वटसिद्ध नागनाथ मंदिर परिसरात जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.

महाशिवरात्रीला या मंदिरात दर्शनाला दुरूदुरून आलेल्या भाविकांमुळे गावाला जणू यात्रेचे स्वरूप आले होते. मंगळवारी यानिमित्त मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. पहाटे महारूद्र अभिषेक, सकाळी शिवलिलामृत पारायण सोहळा, सायंकाळी संगितमय शिवभजन, शिवपाठ आणि रात्री शिवकीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

दरम्यान, दिवसभरात दर्शनाला आलेल्या सर्व भाविकांना येथील श्री साईनाथ सेवाभावी मंडळातर्फे गेल्या तेरा वर्षापासूनची महाप्रसाद वाटपाची परंपरा यंदाही सुरूच राहीली. यासाठी मंडळाचे संतोष आचवले, महादेव लिंबुटे, शिवशंकर बेरकिळे, लक्ष्मण टेकाळे, गणेश नंदागवळे, सचिन नंदागवळे, परमेश्वर नंदागवळे, सतिश भुरे, अस्मिता राजकुमार उस्तुरगे, गणेश भेटे, भगवान लोखंडे, संगमेश्वर नंदागवळे, डॉ.गंगाधर येवंदगे, बालाजी बेंडके, डॉ.शिवशंकर खडके, विकास नवणे, बालाजी वडिले, संतोष जोशी, गुणवंत भुरे, श्रीमती भाग्यश्री भास्कर लिंबुटे आदिंनी पुढाकार घेतला.




