*नाट्यकला प्रशिक्षण कार्यशाळा*

0
267

सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त 

‘सृजन- ’ नाट्यकला प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन.

अभिनेते, निर्माते राजेश देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभणार

लातूर – सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान वर्धापन दिनानिमित्त लातूरकरांना दरवर्षी सांस्कृतिक मेजवानी देत असते. याआधी बालाजी सुतार यांच्या ‘गावकथा’चा प्रयोग,  डॉ. सुधीर बनशेळकीकर व चंद्रशेखर पारशेट्टी यांच्या सुमधुर सिनेगीतांचा असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. टाळेबंदीत सांस्कृतिक कार्यक्रम करता न आल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. दुर्लक्षित राहून बांधिलकीच्या जाणिवेने उत्तम कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मानही गेल्या काही वर्षांपासून प्रतिष्ठान करत आहे.

यावर्षी ४ थ्या वर्धापनानिमित्त दि. २३ ते २५ जानेवारी दरम्यान तीन दिवसीय नाट्यकला प्रशिक्षण कार्यशाळेचे (अनिवासी) आयोजन करण्यात आले असून, सिने-नाट्यअभिनेते, दिग्दर्शक, निर्माता राजेश देशपांडे (मुंबई) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभणार आहेत. राजेश देशपांडे यांनी सिनेनाट्य क्षेत्रात आपला ठसा उमटवला असून ‘धुडगूस’, ‘कुमारी गंगुबाई नॉन मॅट्रिक’, ‘मालवणी डेज’ अशा चित्रपट आणि मालिकांची निर्मिती व ‘हिमालयाची सावली’ या भव्य नाट्यकृतीची पुनर्निर्मिती केली आहे. अनेक मालिका व चित्रपटांचे लेखन, संवादलेखनही त्यांनी केले आहे, तसेच ‘सृजन – दि क्रिएशन’ या त्यांच्या प्रशिक्षण व निर्मिती संस्थेच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांत अनेक ऑनलाईन व मुंबई, कोकण भागात प्रत्यक्ष कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. राजेश देशपांडे  यांच्यासारख्या  सिद्धहस्त व अनुभवी कलाकारांचे मार्गदर्शन ही विशेष पर्वणी असून त्याचा लाभ लातूर व परिसरातील तरुण, होतकरू व हौशी रंगकर्मींनी घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे. 

ह्या कार्यशाळेत अभिनयाशिवाय दिग्दर्शन, नेपथ्य, संगीत, भाषा व उच्चार, आवाजाच्या लकबी, संकलन व लघुनाट्य, नाटक, मालिका लेखन अशा अनेकविध पैलूंवर सप्रयोग मार्गदर्शन होणार असून, प्रत्यक्ष कलाकृती तयार करण्यात येणार आहेत. समारोपात प्रशिक्षणार्थींच्या कलाकृतींचे आविष्कार सादर करण्यात येतील व सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. प्रतिष्ठानच्या www.skspratishthan.com ह्या संकेतस्थळावर उपक्रमाची संपूर्ण माहिती व प्रवेशासाठी दालन तयार करण्यात आले आहे. 

आपल्या परिसरातील उदयोन्मुख व होतकरू कलावंतांची उमेद व सशक्त प्रतिभा लक्षात घेवून त्यांच्या कलागुणांना मान्यवर, अनुभवी व अधिकारी व्यक्तीच्या मार्गदर्शन मिळावे, ह्या उद्देशाने ह्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे; मात्र,  सद्यस्थितीतील निर्बंध लक्षात घेता प्रवेश मर्यादित असेल, अशी माहिती कार्यवाह डॉ. संतोष कुलकर्णी व सहकार्यवाह पुरुषोत्तम भांगे आणि समन्वयक प्रा. मनोहर कबाडे यांनी दिली आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here