मतांची फाटाफूट रोखण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा
मुंबई : ( विशेष प्रतिनिधी)
राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर पराभव झाल्यानंतर आता महाविकास आघाडीनं विधान परिषद निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. विधान परिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. दगाफटका टाळण्यासाठी सर्वच पक्ष काळजी घेत आहेत. विरोधकांकडून होणारी फोडाफोड टाळण्यासाठी प्रत्येक पक्षानं खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेवर शिवसेनेचे उमेदवार संजय पवार पराभूत झाले. हा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे स्वत: विधान परिषद निवडणुकीत लक्ष घालत आहेत. काल रात्री आदित्य यांनी हॉटेल वेस्ट इनला जाऊन शिवसेना आमदारांची भेट घेतली. आजशनिवारी ते सेना आमदारांसोबत हॉटेलमध्ये मुक्काम करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

विधान परिषद निवडणुकीत आपला विजय नक्की आहे. पण गाफिल राहू नका, असा शब्दांत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्या आमदारांना मार्गदर्शन केलं. राज्यसभेतील पराभवाचा वचपा काढण्याची हीच ती वेळ आहे. आपला विजय नक्की आहे. पण गाफिल होऊन चालणार नाही. विधान परिषदेत आपली ताकद दाखवायची आहे. हॉटेलमध्ये असताना नातेवाईक, मित्रांसोबत वावर टाळा. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, अशा सूचना वरिष्ठ नेत्यांकडून शिवसेना आमदारांना देण्यात आल्या आहेत.

शिवसेनेचे आमदार पवईतील वेस्ट इन हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. राष्ट्रवादीचे आमदार ‘ट्रायडंट’मध्ये थांबले आहेत तर काँग्रेसनं आपल्या आमदारांचा मुक्काम ‘फोर सीझन्स’मध्ये ठेवला आहे. दरम्यान आज संध्याकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक होणार आहे.