एकजूट, समर्पण आणि लोकसंपर्कातून भाजपचा विजय निश्चीत
– ना. चंद्रशेखर बावनकुळे महापालिका निवडणूक आढावा बैठक ; काँग्रेस पदाधिकाऱ्यासह माजी नगरसेवकाचा भाजपात प्रवेश
लातूर ( प्रतिनिधी ) :- जगातील सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान भाजपाला कार्यकर्त्यांच्या समर्पणामुळे मिळालेला असून राज्यासह देशातील विविध निवडणुकांमध्ये पक्ष पदाधिकारी यांच्या एकजूट भावनेतून केलेल्या लोकसंपर्कामुळे भाजपला विजय मिळाला आहे. हीच समर्पण आणि एकजुटीची भावना तसेच होत असलेला लोकसंपर्क आणि केलेल्या विकास कामाच्या बळावर भाजपला लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत निश्चीत विजय मिळेल असा विश्वास महसूल मंत्री तथा निवडणूक प्रदेश प्रभारी ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपाने लातूर शहरातील औसा रोड येथे असलेल्या पाटील प्लाझा येथे सुरु केलेल्या निवडणूक कार्यालय शुभारंभ प्रसंगी घेतलेल्या आढावा बैठकीत ना. बावनकुळे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री तथा जिल्हा निवडणूक प्रभारी आ. संभाजी पाटील निलंगेकर, प्रदेश सचिव किरण पाटील, मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, शहर जिल्हा अध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, माजी खा. डॉ. सुनील गायकवाड, माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बस्वराज पाटील मुरुमकर, माजी शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, गुरुनाथ मगे, देविदास काळे, अॅड. शैलेश गोजमगुंडे, सुधीर धुत्तेकर, सरचिटणीस संजय गीर, निखील गायकवाड, रागिणी यादव, प्रविण कस्तुरे आदींची उपस्थिती होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील केंद्र – राज्य सरकारने समाजातील प्रत्येक घटकांसाठी विविध योजना राबवत अनेक विकासाची कामे पूर्णत्वास नेली असल्याचे सांगत ना. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले कि नेत्यांच्या निवडणुका झालेल्या असून आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका होत आहेत. नेत्यांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांनी एकजूट आणि समर्पण भावनेतून काम करत मोठा विजय मिळवलेला आहे. आता कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत नेते सर्वस्वी ताकत पणाला लावत त्यांच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास ना. बावनकुळेनी दिला. केंद्र व राज्य सरकारने लातूर शहराच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला असून या पुढे लातूरच्या विकासासाठी निधीची कमतरता पडणार नाही अशी ग्वाही दिली. मात्र हा निधी हक्काने आणण्यासाठी मनपावर भाजपचा झेंडा फडकावणे आवश्यक आहे. सरकारच्या माध्यमातून केलेली विकास कामे कार्यकर्त्यांची एकजूट आणि समर्पण भावना तसेच होत असलेला लोकसंपर्क या बळावर भाजपचा विजय निश्चीत होईल असा विश्वास व्यक्त केला. मात्र पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अति आत्मविश्वास बाळगू नये असे सांगून आपण केलेली कामे आणि आगामी काळातील लातूरच्या विकासाची संकल्पना प्रत्येक मतदारापर्यंत पोहचवावी असे आवहान ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

आगामी महापालिका निवडणुकीत आपला विजय निश्चीत असला तरी या विजयासाठी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गाफील न राहता मतदारांशी होत असलेल्या संपर्क मोहिमेला अधिक गती द्यावी अशी अपेक्षा जिल्हा निवडणूक प्रभारी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त करत विरोधकांच्या खोट्या आमिषांना आणि दिशाभूल करणाऱ्या घडामोडींना हाणून पाडून आपण काय केले आणि आगामी काळात लातूरच्या विकासाला कशी गती देणार हे मतदारांना पटवून द्यावे. या निवडणुकीच्या प्रचारात आम्ही सर्वच नेते लातूर ढवळून काढत कार्यकर्त्यांना बळ देत त्यांच्या विजयासाठी जीवाचे रान करू अशी ग्वाही आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.

बैठकीच्या प्रास्ताविक शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी आगामी महापालिका निवडणुक संदर्भात पक्षांने काय काय तयारी केली आहे याची माहिती देत पक्ष आणि पक्षश्रेष्टीना अपेक्षित असणारा निवडणुकीतील विजय मिळवण्यासाठी आम्ही सर्वजन एकजूट आणि समर्पण भावनेतून काम करू असा विश्वास दिला.

यावेळी ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणूक व्यवस्थापन संदर्भात विविध सूचनाही केल्या.या बैठकीच्या प्रारंभी काँग्रेसचे माजी नगरसेवक गौरव काथवटे, कॉंग्रेसच्या प्रदेश रोजगार व स्वयंरोजगार सेलच्या उपाध्यक्षा स्वाती जाधव, सचिव दिलीप बेरूलकर, बळीराम गाडेकर, स्वराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. या सर्वांचे स्वागत करत ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रवेश केलेल्यांना शुभेच्छा देऊन आगामी निवडणुकांसाठी त्यांनी समर्पण भावनेतून काम करावे असे सांगितले. बैठकीचे सूत्र संचलन सरचिटणीस प्रविण कस्तुरे यांनी केले.




