भरकटलेल्या समाजाला वैचारिक दिशा देण्याचे काम साहित्यिकांनी करावे
-प्राचार्य डॉ नागोराव कुंभार
.
निलंगा (प्रतिनिधी )-
आज सामाजिक व बौद्धिक पर्यावरण पाहता ते स्वच्छ राहिलेले नाही. समाज भरकटत जात असल्याने पुन्हा एकदा मूल्यांची पेरणी करण्यासाठी साहित्यिकांनी भरकटलेल्या समाजाला वैचारिक दिशा देण्याचे काम साहित्यिकांनी करावे असे प्रतिपादन तिसऱ्या शिवार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ज्येष्ठ विचारवंत आणि वैचारिक साहित्याचे लेखक डॉ. नागोराव कुंभार यांनी केले आहे.
निलंगा तालुक्यातील निटुर येथे मराठवाडा साहित्य परिषद शाखा लातूरच्या वतीने 30 एप्रिल रोजी साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात संत तुकारामांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले.

संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागोराव कुंभार, उद्घाटक अतुल देऊळगावकर, सत्कारमूर्ती डॉ. शेषराव मोहिते स्वागताध्यक्ष प्राचार्य अनिल सोमवंशी व प्रमुख पाहुणे राजाभाऊ सोमवंशी यांचा सत्कार उपरणे, स्मृतिचिन्ह व पुष्पहार देऊन करण्यात आला.या सत्राचे प्रास्ताविक अध्यक्ष डॉ.जयद्रथ जाधव यांनी केले.

तिसऱ्या शिवार साहित्य संमेलन निटूर ता.निलंगा येथे आज संपन्न झाले. ३० एप्रिल २०२३ या एकदिवसीय साहित्य संमेलनात अध्यक्ष पदावरून डॉ. नागोराव कुंभार बोलत होते. साहित्य हे समाजाच्या भरणपोषणासाठी मूलभूत विचारपीठ आहे. साहित्याने व्यक्ती समाज व राष्ट्र उभे राहते. माणसांच्या शारीरिक गरजा भौतिक सुखाने पूर्ण होतात तर मनाच्या आणि चिंतनाच्या गरजा साहित्य पूर्ण करते. विज्ञान तंत्रज्ञानामुळे आपला विकास होतो. परंतु सामाजिक दृष्ट्या एकतेचा, समतेचा विकास होण्यासाठी साहित्यातून शाश्वत मूल्यांची पेरणी करणे आवश्यक असते. माणूस ही एक मोठी विकास करणारी पायाभूत संस्था असून तीच संस्था समाजाबरोबर राष्ट्राचा उद्धार करते. म्हणून महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कार्ल मार्क्स या व्यक्तींनी समाजाच्या उद्धाराकरता आपले साहित्य लेखणी स्पष्टपणे आणि वैचारिक भूमिका घेऊन सतत तळपत ठेवलेली आहे. त्याप्रमाणेच मराठी साहित्यिकांनी सुद्धा आपली भूमिका नाही रे वर्गाच्या बाजूने उभी करून समाजात न्याय,नीती, समता, बंधुता,व स्वातंत्र्य या शाश्वत मूल्याची पेरणी करावी. साहित्य हे चिंतनाचे मूळ आहे. साहित्यातून समाज अनुभवनिष्ठपणे प्रगट झाला पाहिजे. साहित्य हे समाजाला व राष्ट्राला आधार देण्याचे काम करते. साहित्य हे देश व समाजाचे विघटन होताना ते जोडण्याची काम करते. साहित्य हे एक मार्गदर्शक तत्व आहे. ते आपल्या जगण्याला वैचारिक आधार देते. म. ज्योतिराव फुले यांनी ग्रंथकार सभेला पत्र लेखन करून जी भूमिका घेतली होती ती भूमिका आजच्या साहित्यिकांनी घेतली पाहिजे. समाजाच्या व्यथा वेदना आणि दुःखाचा शोध घ्या आणि आपल्या साहित्याला मूल्यांचा आत्मा द्या,असे डॉ. नागोराव कुंभार अध्यक्षपदावरून बोलत होते.

या संमेलनाचे उद्घाटन पर्यावरणाचे अभ्यासक लेखक श्री अतुल देऊळगावकर यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणातून म्हणाले की, शिवारापर्यंत जाऊन गावातील माणसांचे प्रश्न घेऊन शिवार साहित्य संमेलन संवाद साधत आहे. आजच्या काळात माणसा माणसातील संवाद कमी होत असून तो संवाद डिजिटल तंत्रज्ञानाने आपल्यापासून हरवून घेतलेला आहे. साहित्य हे पुन्हा एकदा संवाद साधण्याचे मदत करते. म्हणून ते संमेलन महत्त्वाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम आणि शेक्सपियर एकाच काळातले असताना सुद्धा शेक्सपियर या इंग्रजी कवीला इंग्रजी माणसाने जितके समजून घेतले तितके जगप्रसिद्ध राजा छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकारामांना आपण समजून घेऊ शकलो नाही. याची कारण म्हणजे आपले संवाद, चिंतन, आत्मचिंतन आणि समूहात मिसळणे हे हळूहळू संपत चाललेले आहे. आजच्या पिढीला उत्सवी स्वरूप आलेले आहे. ते टाळून साहित्य त्यातील घडणारा संवाद समजून घेतला पाहिजे.आजचा समाज हा आत्मप्रेमग्रस्त समाज झालेला आहे. परंतु साहित्याच्या माध्यमातून लोकसंवाद घडून येतो. म्हणून तरुण लेखकांनी शेती, शेतकरी आदिवासी आणि नष्ट होत जाणारे पर्यावरण याविषयी लिहिले पाहिजे. त्यासाठी अशी छोटी छोटी संमेलने गावागावातून भरवली पाहिजे.

शिवार साहित्य संमेलना त४२ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शेषराव मोहिते यांचा याप्रसंगी सत्कार करता करण्यात आला. यावेळी ते मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, लातूर ही साहित्यिकांची, चळवळीची भूमी आहे. या भूमीत मराठवाडा साहित्य परिषद शाखा लातूर तीन संमेलन घेऊन साहित्याची चळवळ गतिमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

यावेळी रमेश चिल्ले, सुरेंद्र पाटील,रामदास कांबळे, पत्रकार राजाभाऊ सोनी पत्रकार माधव शिंदे मोहिब कादरी,द.मा.माने, जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे अध्यक्ष बालाजी जाधव,योगीराज माने, विलास सिंदगीकर, संतोष सोमवंशी,नयन राजमाने, विद्या बयास ठाकूर,उषा भोसले,प्रकाश घादगिने,बी.आर.पाटील, राजेसाहेब कदम, अनिल चवळे, बालाजी मुंडे, नामदेव कोद्रे, रमेश हाणंमते, चंद्रकांत कदम, सविता जाधव, सोमवंशी भाग्यश्री, राजाभाऊ सोनी, शिवाजी सूर्यवंशी, शरद कांबळे, जाधव जितेंद्र, जाधव सतीश, इंगळवाड विष्णुदास यांच्या सह या कार्यक्रमाला निटूर ग्रामस्थांसह रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.सूत्रसंचालन मसाप शाखेचे .सदस्स विवेक सौताडेकर यांनी तर आभार प्रदर्शन शाखेची सचिव डॉ.दुष्यंत कटारे यांनी मानले.




