डॉ. महेश दडपे; बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयात मोफत दंत आरोग्य तपासणी शिबिर
लातूर, दि. 18 – निरोगी दातांसाठी नियमीतपणे दातांची स्वच्छता करणे आवश्यक आहे. मनुष्याला वयाप्रमाणे विविध शारीरिक समस्यासोबत दातांच्या समस्यांनाही सामोरे जावे लागते. दात चांगले असतील तर संपूर्ण आरोग्य सुध्दा चांगले राहण्यास मदत होते. त्यामुळे निरोगी दातांकडे सुदृढ आरोग्याचे लक्षण म्हणून पहिले जाते, अशी महिती एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील दंत रोग तज्ज्ञ प्रा. डॉ. महेश दडपे यांनी दिली.

लातूर येथील एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील सार्वजनिक दंत आरोग्य विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील एम. एस. बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयात मंगळवारी मोफत दंत आरोग्य जागृती व तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. महेश दडपे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम. एस. बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य एम. एस. धानुरे, एनएसएस प्रमुख प्रा. सोलापूरे, विद्यार्थी प्रतिनिधी अजय डिग्रसकर, एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील दंत रोग तज्ज्ञ डॉ. विलास धुमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना डॉ. महेश दडपे म्हणाले की, निरोगी मुख हे संपूर्ण शरीर निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. निरोगी मुखासाठी दररोज सकाळी, झोपण्यापुर्वी योग्य पध्दतीने दात व हिरड्यांची स्वच्छता करणे आवश्यक आहे. त्यासोबत वर्षातून दोन वेळा दंत रोग तज्ज्ञांकडून तपासणी करुन घ्यावी व मुखरोग उद्भवल्यास त्वरीत उपचार घ्यावेत, तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन टाळावे, असे डॉ. दडपे यांनी सांगीतले. यावेळी डॉ. विलास धुमाळ यांनी दंत रचना, दातांचे, हिरड्यांचे आरोग्य व त्यावरील विविध दंत उपचार पध्दती या विषयी माहिती दिली.
महाविद्यालयीन तरुणांमध्ये दंत व मौखिक आरोग्य या विषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून मोफत दंत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या मौखिक आरोग्य तपासणी शिबिरात दंत रोग तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांची मुख व दंत रोग, मुख कर्करोग, तोंडात उद्भवणारे पांढरे – लाल चट्टे, हिरड्या व त्या सबंधी आजार अशा 256 विद्यार्थी रुग्णांची तपासणी करुन प्रथम दंतोपचार करण्यात आले. तसेच दिर्घ दंत आजाराच्या 63 रुग्णांना पुढील उपचारासाठी एमआयडीएसआर दंत महाविद्यालय, लातूर येथे पाठविण्यात आले.

या दंत रोग शिबिरात दंत रोग तज्ज्ञ डॉ. महेश दडपे, डॉ. विलास धुमाळ, डॉ. दिपाली जाधवर, डॉ. श्रध्दा बरुरे, डॉ. विशाखा लटपटे, डॉ. शिल्पाश्री बिराजदार, डॉ. विश्वनाथ चाटनाले, डॉ. गोविंद कांबळे, डॉ. आकांशा काशिदकर, डॉ. श्रेया चिद्रीकर, डॉ. दिव्या कांबळे, डॉ. ऋतुजा कलंत्री, डॉ. ऐश्वर्या झिल्ले, डॉ. कल्याणी भागवत, डॉ. गौरी चौंडे, डॉ. गंगेश्वरी चामले, डॉ. इखा तांबोळी, डॉ. श्रेया यांनी सेवा बजावली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय डिग्रसकर यांनी केले तर आभार प्राचार्य एम. एस. धानुरे यांनी मानले. या कार्यक्रमास एम. एस. बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
———————————————-




