नेत्रहिनांना दृष्टी देणे हे सर्वाधिक पुण्याचे काम
नेत्रदान जनजागृती फेरीच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांची भावना
लातूर, दि. 5 – जेवढे अधिक प्रमाणात नेत्रदान होईल, तेवढ्या अधिक नेत्रहिनांना दृष्टी मिळण्यास मदत होणार आहे. नेत्रदान हा उपक्रम केवळ पंधरवड्यापुरता मर्यादित नसून, ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. या पंधरवड्याच्या निमीत्ताने आपण जास्तीत-जास्त लोकांना नेत्रदानाविषयी जागृत करुन त्यांना नेत्रदानासाठी प्रोत्साहित करावे. आयुष्यात कधीही डोळ्यांनी हे जग न पाहिलेल्या व्यक्तीला जर आपण नेत्रदान करुण दृष्टी देऊ शकलो तर हे सर्वाधिक पुण्याचे काम होईल, अशी भावना लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री पृथ्वीराज बी. पी. यांनी व्यक्त केली.

नेत्रदान पंधरवड्या निमीत्ताने येथील माईर एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ ऑप्टोमेट्री महाविद्यालय, नेत्र प्रतिष्ठान संचलित डी. एस. कराड आय इन्टिट्युट, लातूर नेत्र तज्ज्ञ संघटना, सक्षम लातूर व लायन्स क्लब ऑफ लातूर हेल्थ केअर कॅम्प्स यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. 3 सप्टेंबर रोजी नेत्रदान या विषयावर आयोजित फेरीस जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या फेरीचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी माईर एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक तथा नेत्र तज्ज्ञ डॉ. हनुमंत कराड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन. पी. जमादार, जिल्हा शल्य चिकीत्स्क डॉ. लक्ष्मणराव देशमुख, नेत्र विभाग प्रमुख डॉ. उदय मोहिते, जिल्हा नेत्र तज्ज्ञ संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवाजीराव काळगे, जिल्हा नेत्र शल्यचिकीत्सक डॉ. श्रीधर पाठक, जिल्हा क्षेत्रीय अधिकारी जयंत क्षिरसागर, सक्षमच्या मराठवाडा विभागाच्या महिला प्रभारी प्रा. कोहेकर, लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रा. तानाजी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
सध्या सरासरी एक कोटीपेक्षा अधिक नेत्रहिन व्यक्ती डोळ्यांच्या प्रतिक्षेत आहेत. डोळे अथवा इतर अवयवांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या रुग्णांची भावना मी जाणून आहे. कारण इतरांप्रमाणे माझी आईही मुत्रपिंड या अवयवासाठी प्रतिक्षेत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यामुळे मला या विषयीची चांगली जाण असल्याचे सांगून, यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्रात आपण तांत्रीक दृष्ट्या सजग आहोत. त्यासोबतच रुग्णांच्या हताळणीसाठी जी प्रगल्भता लागते ती वैद्यकीय ज्ञानांएवढीच महत्त्वाची असते. जे डॉक्टर लोकांना अवयवदानासाठी तयार करु शकतात, अशांना परिपूर्ण डॉक्टर म्हणता येईल. त्यामुळेच वैद्यकीय ज्ञानाइतके सामाजिक ज्ञानही असणे महत्त्वाचे आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दिड वर्षात अवयवदानाची प्रक्रिया खंडीत झाल्याने अनेकजन अवयवांच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र आता नव्याने अवयवदानाच्या कामास बळ देण्याची गरज आहे. लातूर जिल्ह्यातील डॉक्टर व विद्यार्थ्यांनी हे आवाहन स्विकारुन या पंधरवड्यात नेत्रदानासाठी पुढाकर घ्यावा व नेत्रदान चळवळ यशस्वी करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी शेवटी सांगीतले.
यावेळी बोलताना डॉ. हनुमंत कराड म्हणाले की, सध्या डोळ्यांच्या उपलब्धतेअभावी समाजातील लाखो लोक अंधकारमय जीवन जगत असून ते नेत्रदात्यांच्या प्रतिक्षेत आहेत. समाजातील अशा नेत्रहिनांसाठी प्रत्येकाने नेत्रदानाचा संकल्प करणे गरजेचे आहे. लोकांच्या मनातील आंधश्रध्दा हा नेत्रदानातील मोठा अडसर आहे. मात्र कोणत्याही अनाठायी गोष्टीवर विश्वास न ठेवता लोकांनी निसंकोचपणे नेत्रदानासाठी पुढे येणे गरजेचे आहे. नेत्र दानानंतर आपला डोळा दुसऱ्याच्या शरीरात जावून दृष्टी देण्याचे काम करतो. मृत्यूनंतही डोळ्याचे दृष्टीचे कार्य सुरु असल्याने डोळ्याच्या रुपाने हा एक पुनर्जन्मच आहे.
यावेळी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ ऑप्टोमेट्री महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नेत्रदान व अंधत्व या विषयी जागृतीपर पथनाट्य सादर करुन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ते गांधी चौक या मार्गावर फेरी काढून नेत्रदानाविषयी जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रामाचे सुत्रसंचालन डॉ. आर. जी. कुलकर्णी यांनी केले तर आभार जिल्हा नेत्र शल्यचिकीत्सक डॉ. श्रीधर पाठक यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक, डॉक्टर, विद्यार्थी व नागरीक उपस्थित होते.










