- राज्यमंत्री संजय बनसोडे
लातूर दि.७ ( जिमाका ) “पत्रकार स्व.लक्ष्मीकांत हलकीकर यांची सामाजिक जाणिवेची पत्रकारीता ही समाजासाठी भूषणावह व दिशादर्शक होती ” असे प्रतिपादन राज्यमंत्री ना.संजय बनसोडे यांनी केले.
“स्व.लक्ष्मीकांत हलकीकर स्मृती सेवा पुरस्कार” गौरव सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एजयुकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर होते.
उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, निलंगा पं. स. चे माजी सभापती अजित माने, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर , दक्षिण मध्य रेल्वेचे सदस्य मोतीलाल डोईजोडे,लाॕयन्स नेत्र रूग्णालयाचे अध्यक्ष डॉ .रामप्रसाद लखोटीया,ताहेर हुसेन हे व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी स्व.लक्ष्मीकांत हलकीकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी पारधेवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ.छाया सतीश काकडे यांना “स्व.लक्ष्मीकांत हलकीकर स्मृती सेवा गौरव पुरस्कार” ना.बनसोडे यांच्या हस्ते देण्यात आला.५००१ रु.रोख ,सन्मानपत्र व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

भौतिक विकास हा समाजासाठी जसा गरजेचा आहे, तसाच सामाजिक विकासही तितकाच महत्त्वाचा आहे,ही जबाबदारी पूर्ण करतानाच अशा उपक्रमांच्या पाठीशी उभे राहणे ही आपली जबाबदारी असल्याचे ना.बनसोडे म्हणाले. स्व.लक्ष्मीकांत हलकीकर यांच्या सामाजिक जाणिवा या वंचितांसाठी होत्या हा वारसा पुढे चालविणा-या संयोजकांचे ना.बनसोडे यांनी मुक्तकंठाने कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक श्रीपाद सिमंतकर यांनी केले.
‘विचारांचा वारसा चालविणे हे कठीण कार्य असून स्व.हलकीकरांच्या अक्षरसेवेचा हा सामाजिक वारसा समाजासाठी दिशादर्शक असल्याचे मत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर यांनी व्यक्त केले.
जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी पत्रकारितेसोबत जपल्या गेलेल्या या सामाजिक जाणिवेचा गौरव केला. पुरस्कारप्राप्त सौ.छाया काकडे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या .
“चांगला कार्याला त्रास होतो हे खरे असले तरी त्यामुळे नाउमेद न होता कार्य केले पाहिजे, सामाजिक जाण असणारे कार्यक्रम हीच समाजाची ओळख असते” अशा शब्दांत बसवराज पाटील नागराळकर यांनी अध्यक्षीय समारोप केला.
पाहुण्यांचे स्वागत दत्तोपंत हलकीकर, विशाल हलकीकर, विक्रम हलकीकर, शरद जोशी, संजय जोशी यांनी केले.अंजली स्वामी यांनी मानपत्राचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता मोरे यांनी केले. विक्रम हलकीकर यांनी आभार मानले.