महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा बाह्य स्त्रोताद्वारे परिचारिका पदभरती करण्यास तीव्र विरोध,कायमस्वरूपी पदभरती साठी संघटना करणार राज्यभर तीव्र आंदोलन
लातूर
राज्यातील परिचारिकांनी कोव्हिड १९ महामारीच्या काळात अत्यंत अपुऱ्या मनुष्यबळावर, आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक काळजी जबाबदाऱ्या,बाजूला ठेवून,कुटुंब मुलाबाळापासून दूर राहून,जिवाजी पर्वा न करता, डॉक्टरांच्या, खांद्याला खांदा लावून कोव्हिड रुग्णांना अनेक अडचणींना तोंड देत सेवा दिली आणि आजही देत आहेत.म्हणूनच त्यांना फ्रंट लाइन कोरोंना योद्धा असेही संबोधले गेले.परंतु आजता- गायत त्यांच्या मागण्याकडे शासनाकडून पूर्णत: दुर्लक्ष केले जात आहे,
याउलट शासनाने शासननिर्णय निर्गमित करून वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयाच्या तसेच आयुष संचलनालयाच्या अधिपत्त्याखालील महाविद्यालये व संलग्नीत रुग्णालयामधील वर्ग ३ व ४ संवर्गातील एकूण ४४४५ पदे भरण्यास शासनाच्या उपरोक्त संदर्भाधीन दि.१३ एप्रिल २०२२ रोजीच्या पत्रान्वये मान्यता दिली आहे.त्यापैकी परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांची नियमित पदभरती होई पर्यंत परिचारिकांच्या सेवा बाह्यस्त्रोताद्वारे उपलब्ध करून घेण्याचे निर्देश दिले आहेत,त्यास महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना,मुख्यालय लातूर संघटनेचा तीव्र आक्षेप घेतला आहे.

कोव्हिड १९ महामारीच्या पाश्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील (उदा.वैद्यकीय शिक्षण सार्वजनिक आरोग्य व गृह विभागातील १००% रिक्तपदे सरळसेवेने भरण्यास मा.मंत्री मंडळाने मंजूरी दिली होती.त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभाग व गृह विभागातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कळते.वैद्यकीय शिक्षण विभागातीलही रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याची केवळ माहिती गेले २ वर्षापासून विभाग व शासनाकडून वेळोवेळी देण्यात आली.मात्र मंत्री मंडळाने मंजूरी दिलेली असूनही वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने पदभरतीबाबत वेळकाढू धोरण स्विकारले असून,भरातीप्रक्रिया अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे.तसेच आत्ताच वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयांअंतर्गत असलेल्या परिचारिकांच्या रिक्तपदे सरळसेवेने न भरता १७९६ पदे बाह्यस्त्रोताद्वारे भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.राज्यातील परिचारिकांनी परिचारिका संवर्गाची १००% पदभरती व पदनिर्मिती कायमस्वरूपी करण्याबाबत वेळोवेळी शासनास निवेदनाद्वारे विनंत्या केलेल्या आहेत.तसेच याबाबत संबंधित मंत्री महोदयासोबत चर्चेस वेळ देण्याची विनंती सातत्याने केली आहे.परंतु शासनाकडून अद्याप चर्चेस वेळ मिळाला नाही किंवा परिचारिकांची पदभरती केली जात नाही.परिचारिका ह्या वर्षानुवर्षे रुग्ण सेवेच्या कणा मानल्या जातात व रुग्णसेवेत मोलाचे योगदान ही देतात.त्यांचा प्रत्यक्ष संबंध रुग्णसेवेशी आहे,म्हणून परिचारिकांच्या सेवा बाह्यस्त्रोताद्वारे न घेता तात्काळ कायमस्वरूपी पदनिर्मिती व पदोन्नती पदभरती करण्याच्या अनुषंगाने पुढील बाबींचा गांभीर्याने विचार करण्याबाबत संघटनेनी शासनास निवेदनाद्वारे विनंती केली आहे.

१.परिचारिका संवर्गातील सर्व स्तरावरील (शैक्षणिक व शुश्रुषा विभागातील) १००%
पदोन्नती,पदनिर्मिती व पदभरती राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागातील गेल्या अनेक वर्षात मोठ्या प्रमाणात सर्व स्तरावरची पदे रिक्त आहेत.परिसेविकांची ही पदे रिक्त असल्यामुळे त्यांचा कार्यभार वरिष्ठ अधिपरिचारिकांना दिला जातो.पाठयनिर्देशकांची ही राज्यात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने परिचर्या महा- विद्यालयातही परिचारिकांची प्रतिनियुक्ती केल्या जातात.कारकुणी कामासाठीही नियमबाह्य त्यांचा वापर केला जातो.(उदा.संचालनालय,अधिसेविका कार्यालये,) त्यामुळे प्रत्यक्ष रुग्णसेवा देणारे मनुष्यबळ अत्यंत अपुरे पडत आहे.राज्यात परिचारिकांची संख्या अत्यल्प आहे,रुग्ण व डॉक्टर यांचे प्रमाण राखण्या साठी नवनवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येत आहे, त्याच बरोबर त्यासाठी अत्यंत आवश्यक असलेले परिचारिका संवर्गाचे मनुष्यबळ वाढविणे ही अत्यंत गरजेचे आहे,त्यामुळे सर्व स्तरावरची, १००% पदोन्नती,पदनिर्मिती व पदभरती ही अत्यावश्यक बाब आहे.त्याबाबतची कार्यवाही अनेक महिन्यापासून चालू असल्याचे संचलनालया कडून सांगितले जाते.ती तात्काळ करण्यात यावी,तसेच परिचारिकांची पदनिर्मिती व पदभरती केल्याशिवाय, नव्याने मंजूर झालेले वैद्यकीय महाविद्यालये, अतिविशेषोपचार रुग्णालये,रुग्णालयातील नवनवीन विभाग,कार्यान्वित करण्यात येऊ नये. परिचारिकांची पदे बाह्यस्त्रोताद्वारे होणाऱ्या पदभरतीतून कायमचे वगळण्यात येऊन,सर्व स्तरावरील कायमस्वरूपी १०० %पदनिर्मिती,पदोन्नती पदभरती तात्काळ ३ महिन्याच्या करण्यात याव्यात.

२. यापूर्वी वैद्यकीय शिक्षण विभागाने सी.ई.टी सेल द्वारा परिचारिकांच्या पदभरती प्रक्रिया चोख व
यशस्वीरीत्या व कमी वेळात राबवल्या आहेत. त्यामुळे शासनाने बरखास्त केलेले सी.ई.टी सेल
पुनर्जीवित करून सी.ई.टी सेल द्वारा किंवा MPSC द्वारा लवकरात लवकर भरती प्रक्रिया
राबवावी
३.कायमस्वरूपी व नियमित पदभरती होईपर्यंत रुग्णसेवा विस्कळीत होऊ नये याकरिता,यापूर्वी
नोंदणीकृत परिचारिकांना रिक्त पदावर अल्पमुदतीसाठी,समान वेतनावर आवश्यकतेनुसार
नियुक्ती (LEAVE VACANCY) तात्पुरत्यास्वरूपात दिली जात होती.अशा नियुक्त्या पुनर्जीवित
करून रिक्तपदावर तात्पुरत्या नियुक्त्या देण्याबाबत विचार व्हावा.
४.नियमित पदभरती होईपर्यंत परिचारिका संवर्गाच्या उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करूनच
रुग्णालयातील परिचारिकांच्या मंजूर पदानुसारच विभाग सुरू ठेवावेत.एमसीआयच्या मानकां-
नुसार वाढवलेले बेड किंवा कक्ष कमी करण्यात यावेत.
कंत्राटी किंवा बाह्यस्त्रोताद्वारे परिचारिका संवर्गाचे मनुष्यबळ उपलब्ध केल्यास रुग्ण सेवेत गुणवत्ता राहणार नाही,त्यांना मिळणारे मानधन अत्यल्प असल्याने, आर्थिक असुरक्षिततेचा ही गंभीर प्रश्न आहे ईतयादी बाबींचा शासनाने गांभीर्याने विचार करून परिचारिका संवर्गाच्या सेवा बाह्यस्त्रोताद्वारे घेण्याचा निर्णय तात्काळ रद्द करून कायमस्वरूपी पदभरती किमान ३ महिन्यात करण्यात याव्यात. तसेच यासह इतर महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी बैठक लावण्यात यावी.अन्यथा नाईलजास्तव राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागातील परिचारिकांना तीव्र आंदोलन करावे लागेल व त्यामुळे रुग्णसेवा विस्कळीत झाल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन व शासन जबाबदार राहील,असे संघटनेच्या राज्याध्यक्ष डॉ. मनीषा शिंदे व राज्यसरचिटणीस श्रीमती सुमित्रा तोटे यांनी संघटनेच्या राज्यस्तरीय बैठकीत सांगितले




