30.7 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*पालखी सोहळ्याच्या निमित्ताने स्वच्छता दिंडीचा शुभारंभ*

*पालखी सोहळ्याच्या निमित्ताने स्वच्छता दिंडीचा शुभारंभ*

स्वच्छ, निर्मलवारीसाठी शासन कटिबद्ध; २१ कोटींचा निधी मंजूर -ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

पुणे, दि.१४: आषाढी वारीला अनेक वर्षाची परंपरा आहे. लाखो भाविक वारीसाठी येत असल्याने वारकऱ्यांच्या आरोग्याची, स्वच्छतेची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. शासन स्वच्छ, सुंदर व निर्मलवारीसाठी कटिबद्ध असून यंदाच्या वारीसाठी २१ कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

ग्रामस्वच्छता, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आळंदी ते पंढरपूर मार्गावरील स्वच्छता दिंडीचा शुभारंभ व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील विभागस्तरीय पुरस्काराचे वितरण मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते विधानभवन येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला आमदार सुनील कांबळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. महाजन म्हणाले, वारकऱ्यांसाठी दिवाळी, दसऱ्यापेक्षाही आषाढी वारी हा मोठा उत्सव आहे. राज्यातील विविध भागातून वारकरी पंढरपूरला येत असतात. प्रशासनाच्यावतीने वारकऱ्यांसाठी शौचालये, उष्णतेपासून संरक्षणाकरिता तात्पुरता निवारा, पाणी पुरवठा, वैद्यकीय सेवा, स्वच्छतेविषयक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. पालखी मार्गावरील रस्ते व परिसराच्या स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले आहे.

अस्वच्छतेमुळे रोगराई पसरत असल्याने सर्वांनी शौचालयाचा वापर करावा. गावांमध्ये प्रत्येकाने शौचालये बांधावित. शौचालय बांधण्यासाठी शासन निधी उपलब्ध करुन देत आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचा आदर्श अन्य ग्रामपंचायतींनी घ्यावा, आपलेही गाव हागणदारीमुक्त करून परिसर स्वच्छ ठेवावा. नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा आणि स्वच्छता पाळावी असे आवाहन त्यांनी केले. वारीमध्ये कुठेही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी प्रशासन काळजी घेत असल्याचे श्री. महाजन यांनी सांगितले. स्वच्छता दिंडीच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश गावोगावी पोहोचेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आमदार कांबळे म्हणाले, स्वच्छता दिंडीच्या निमित्ताने शासनाने चांगला कार्यक्रम हाती घेतला आहे. स्वच्छतेविषयी लोकजागृती होईल व संत गाडगेबाबांचा स्वच्छतेचा संदेश गावोगावी पोहोचेल.

विभागीय आयुक्त श्री. राव म्हणाले, आषाढी वारीनिमित्त १५ ते १८ लाख भाविक पंढरपुरला येतात. वारकऱ्यांना आवश्यक सोयी-सुविधा देऊन वारी स्वच्छ, हरित व निर्मल करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यासाठी वारीपूर्वी प्रत्यक्ष पालखी तळ व मार्गाची पाहणी केली. पालखी मार्गावर एकूण २ हजार ७०० शौचायले उपलब्ध असून मागच्या वर्षीपेक्षा ६० टक्के जास्त शौचालये उपलब्ध करुन दिली आहेत. त्यापैकी महिलांसाठी ५० टक्के शौचालये देण्यात आली आहेत.

उष्णतेची तीव्रता कमी झालेली नसल्याने वारकऱ्यांसाठी दीड पट जास्त टँकर तसेच थंड पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक दोन किलोमीटरवर विसावे केले आहेत. त्याठिकाणी आरोग्य पथके ठेवण्यात आली आहेत. माझी वसुंधरा अभियानांतर्गत चौथा टप्पा सुरु करण्यात आला असून प्रत्येक मुक्काम व विसाव्याच्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते २०१८- २०१९ व २०१९-२०२० यावर्षीच्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान विभागस्तरीय पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यामध्ये पुणे जिल्ह्यातील कान्हेवाडी, टिकेकरवाडी, सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी, कोल्हापूर जिल्ह्यातील श्रृंगारवाडी, सोलापूर जिल्ह्यातील मांडवे व सांगली जिल्ह्यातील कुंडल व चिखली ग्रामपंचायतींना विभागस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच टिकेकरवाडी ग्रामपंयाचतीला स्व. वसंतराव नाईक पुरस्कार, मान्याचीवाडी व सोलापूर जिल्ह्यातील शिरापूर ग्रामपंचायतीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देण्यात आला.

आरोग्य, ग्रामस्वच्छता व पाणी पुरवठा विभागाच्यावतीने काढण्यात आलेल्या घडीपुस्तिका, माहिती पुस्तिकांचे प्रकाशन आणि शौचालय उपयोजकाचे उद्घाटन यावेळी मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित सर्वांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. दिंडी प्रमुखांना औषध किटचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. कलशेट्टी यांनीही स्वच्छता दिंडीविषयी आपले मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविकात उपायुक्त विजय मुळीक यांनी स्वच्छता दिंडीविषयी माहिती दिली. यावेळी विभागातील पुरस्कार प्राप्त तालुक्यांचे गटविकास अधिकारी, गावांचे सरपंच, ग्रामसेवक, कलापथकांचे प्रतिनिधी, आरोग्यदूत, आशा सेविका, वारकरी उपस्थित होते.

स्वच्छतेची वारी पंढरीच्या दारी
स्वच्छता वारीच्या निमित्ताने पालखी मुक्काम, विसावा, रस्त्यावर निर्माण होणारा कचरा, गाव व परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत स्वच्छता दिंडीच्या माध्यमातून ८ चित्ररथाच्या माध्यमातून कलापथकाद्वारे व ५० आरोग्यदूतांमार्फत स्वच्छतेचा संदेश गावोगावी देण्यात येणार आहे. प्लास्टिकचे व्यवस्थापन, पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर, घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य विषयक पुस्तिका, माता सुरक्षित तर घर सुरक्षित, जागरुक पालक, सुदृढ बालक, नियमित लसीकरण असे स्वच्छता व आरोग्य विषयक संदेशाद्वारे वारकऱ्यांचे प्रबोधन करण्यात येणार आहे.
000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]