हवामान
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात १३ जुलैपर्यंत जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल. काही भागांत अतिवृष्टी होईल. अजूनही पुढील चार दिवस हवामान खात्याने कोकण,मध्य महाराष्ट्रात नारंगी आणि पिवळा बावटा कायम असल्याचे स्पष्ट केलं आहे. मराठवाडा, विदर्भातही काही ठिकाणी असा इशारा देण्यात आला आहे.
राज्य पाऊस
पुणे ;—राज्यातील पाऊस आणि पावसाशी संबंधित बातम्यांवर आधारित वृत्तांत आता ऐकूया…
पुणे शहरात काल पहाटेपासूनच पावसाने चांगला जोर धरला. त्यामुळे पुणेकरांना सूर्यदर्शन झाले नाही. दिवसभरात शहराच्या मध्यवर्ती भागासहीत उपनगरांतही दमदार पाऊस झाला. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या ४ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असल्यानं या धरणांमधील पाणीसाठा चांगलाच वाढला आहे. चारही धरणात मिळून क्षमतेच्या सुमारे २५ टक्के पाणी साठा झाला असून त्यामुळं पुणेकरांवर असलेली पाणी टंचाईची टांगती तलवार काही प्रमाणात दूर झाली आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार सुरू असून सर्वाधिक पाऊस महाबळेश्वर इथं झाल्याची नोंद आहे. वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेनं भरून वाहू लागला आहे. कोयना धरण क्षेत्रात देखील पावसाचा जोर कायम असून सध्या धरणात 25 tmc हून अधिक पाणीसाठा झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांपासून पाडणाऱ्या संततधार पावसामुळे चंदगड तालुक्यातील पिळणी इथल्या पुलावर पाणी आल्याने रस्ता बंद करण्यात आला आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही पुन्हा वाढ होऊ लागली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पेरण्या पूर्णत्वाकडे चालल्या आहेत. आतापर्यंत १ लाख २६ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर म्हणजे सुमारे सत्तर टक्के पेरणी झाली आहे. मृग नक्षत्र जवळपास कोरडे गेल्याने चिंतेत पडलेल्या शेतकऱ्याला आर्द्रा नक्षत्राने साथ दिली. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. काही ठिकाणी दुबार पेरण्या कराव्या लागत आहेत. नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून जिल्ह्यातील धरणांमध्ये 5 ते 7 टक्के साठा वाढला आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये 31 टक्के जलसाठा झाल्यामुळे नाशिककरांची पिण्याची पाण्याची चिंता मिटली आहे. दारणा, गंगापूर, गिरणा पालखेड या समूहांमध्येही पाणीसाठा वाढत आहे. नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणा-या महापालिकेच्या मोरबे धरण परिसरात 4 तारखेपासून चांगला पाऊस पडत आहे. जलसाठ्यातील सुमारे 37 टक्के वाढ नवी मुंबईकरांना दिलासा देणारी आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळं अनेक प्रमुख मार्ग बंद झाले आहेत. अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे. यामुळे ताडगाव-भामरागड, मुलचेरा-आष्टी, आष्टी-आलापल्ली, आलापल्ली-सिरोंचा आणि आलापल्ली-खमनचेरु या प्रमुख मार्गांवरील वाहतूक बंद झाली असून, शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. काही गावांतील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याची माहिती आहे. चोवीस तासात भामरागड तालुक्यात सर्वाधिक १४१ मिलीमीटर पाऊस पडला. तर सिरोंचा तालुक्यात ११७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. अकोला जिल्ह्यातील अकोला आणि बाळापूर या दोन तालुक्यांत ४७ घरांची पडझड झाली असून, ८६४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. दोन्ही तालुक्यांत कापूस, सोयाबीन आणि तूर या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत 264 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वैनगंगा नदीच्या जलसाठ्यात वाढ झाल्यामुळे गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 11 दरवाजे अंशतः उघडण्यात आले. नदीकाठी असणाऱ्या गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाच्या दमदार आगमनामुळे बळीराजा शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यात दमदार पावसानंतर आतापर्यंत 81 टक्के पेरण्या आटोपल्या आहेत अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी दिली. काही ठिकाणी आंतरमशागतीची कामंही सुरु आहेत. पांढरकवडा इथं बनावट कीटकनाशक, खतं, तणनाशक, कपाशीचे बियाणे तयार करून विनापरवाना विक्री केली जात होती. याठिकाणी कृषी विभागाने धाड टाकून कारवाई केल्यानंतर पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. गुजरात आणि तेलंगण राज्यातून आणलेल्या अडीच लिटरच्या डब्यांमध्ये बनावट किटकनाशक भरुन विकले जात होते.
( सौजन्य : आकाशवाणी पुणे )