जहिराबाद-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील मसलगा येथील पुलाचे अर्धवट काम ; सुविधा देण्यात दुजाभाव, ग्रामस्थांचा आक्रमक पविञा
सर्वसामान्यांच्या शेतात पाणी साचत असल्याने नुकसान
निलंगा,-( प्रशांत साळुंके )-जहिराबाद-लातूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक { 752 } या मार्गावरील निलंगा तालुक्यातील मसलगा येथील ग्रामस्थांनी मुख्य महामार्गावरील रस्त्यासाठी केलेल्या आंदोलनाचा राग लक्षात ठेवून येथून जाणार्या रस्त्याच्या पुलाचे काम अर्धवट केल्याने या पुलाच्या खालून पाणी अडवले जात आहे.हे पाणी शेतामध्ये जमा होत असल्याने शेतकर्यांचे अतोनात नुकसान होत आहे.त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील गावांसाठी इस्टिमेटप्रमाणे ज्या सेवा-सुविधा आहेत त्या सुविधा 15 दिवसात मसलगा यागावासाठी द्याव्यात,अन्यथा परिसरातील महामार्गावरील मार्गाचे कामाचे नुकसान केले जाईल असा इशारा छावा संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.

जहिराबाद-लातूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक { 752 } मार्गावरील औराद शहाजानी जाणार्या या मार्गात मसलगा हे गाव असून,यागावात रस्त्यावर असणार्या पुलाचे काम संबंधित ठेकेदाराने अर्धवट अवस्थेत सोडले आहे.प्रत्यक्षात जुन्या पुलावरच कठडे बांधल्याने तसेच हायवेची उंची वाढली व रस्त्याची उंची कमी झाली असे असतानाही जुन्या पुलावर कठडे बांधून थातूरमातूर काम केले आहे.त्यामुळे परिसरातील शेतकर्यांना पाण्याचा ञास होत असून पीकांचे नुकसान होत आहे.हायवेचे काम सुरू असताना मसलगा येथील ग्रामस्थांनी गुत्तेदाराच्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात वारंवार आंदोलन केले.याचा राग मनात धरून मसलगा येथील कामाबाबत संबंधित ठेकेदाराने हात आखडता घेतला.

इस्टिमेटप्रमाणे असलेली सेवा-सुविधाही येथे दिली नाही.नियमाप्रमाणे बसथांबा निवाराव्यवस्था,जोडपूल,जोड रस्त्यापासून 50 मीटरची डांबरी रस्ता,गाव निर्देश फलक यासर्व गोष्टी वगळल्या असून याच रस्त्यावरील मसलगा गावाच्या बाबतीत दुजाभाव केला.वारंवार लोकप्रतिनिधी व प्रशासनाला नागरिकांनी निवेदन दिले.माञ,याकडे सर्वांचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत असून,इस्टिमेटप्रमाणे सर्व कामे पूर्ण झाली नाहीत तर परिसरातील हायवे खोदून टाकणार असा इशारा यावेळी छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंके यांच्यासह मसलगा ग्रामस्थांनी दिला आहे.











