24.9 C
Pune
Thursday, July 17, 2025
Homeआरोग्य वार्तापोद्दार हॉस्पिटलचा असाही सामाजिक उपक्रम:१५० व्या अस्थिरोग शिबिरास प्रतिसाद

पोद्दार हॉस्पिटलचा असाही सामाजिक उपक्रम:१५० व्या अस्थिरोग शिबिरास प्रतिसाद

डॉक्टर्स डे निमित्त पोद्दार हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात मोफत अस्थिरोग शिबिरात ८८ रुग्णांची तपासणी

लातूर :, (माध्यम वृत्तसेवा):–डॉक्टर्स ‘डेचे औचित्य साधून लातूर मेडिकल असोसिएशन, रोटरी क्लब मिडटाऊन आणि पोद्दार हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत अस्थिरोग शिबिरात ८८ रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने आयोजित करण्यात आलेले हे १५० वे मोफत आरोग्य शिबीर होते, हे विशेष.

या शिबिराचे उदघाटन विलास सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ सुरेश भट्टड , आयएमएच्या माजी अध्यक्षा डॉ. सुरेखा काळे, ज्येष्ठ अस्थिशल्य चिकित्सक डॉ. दिलीप देशपांडे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अभय कदम आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना श्रीमती वैशालीताई देशमुख यांनी पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने अशा प्रकारचे आरोग्यदायी उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. अशा उपक्रमांना आपल्या शुभेच्छा आहेतच, त्याचबरोबर असे लोकोपयोगी उपक्रम भविष्यातही राबविण्यात यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ.अशोक पोद्दार यांच्यासह सर्वच डॉक्टर मंडळी सदैव लोकांची सेवा करण्यासाठी तत्पर असतात. लातूरला उंचावर नेण्याचे काम ते करत आहेत, लातूर आम्हाला नवीन नाही. लातूरला आम्ही आमचे घर समजतो त्यामुळे लोकांनी प्रेमाने बोलावले की आम्ही अशा उपक्रमांना उपस्थित राहतो, असेही वैशालीताईंनी सांगितले.

डॉ.सुरेश भट्टड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना डॉक्टर्स डे चे औचित्य साधून पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या या अस्थिरोग शिबिरास आपल्याला आवर्जून निमंत्रित केल्याबद्दल आभार व्यक्त केले. आजचा दिवस डॉक्टरांसाठी अतिशय आनंदाचा आहे. या कार्यक्रमात निमंत्रित करून डॉ. अशोक पोद्दार यांनी एक प्रकारे गुरु – शिष्य परंपरा कायम ठेवण्याचे काम केले आहे. डॉ.अशोक पोद्दार असे सामाजिक व आरोग्य विषयक उपक्रम सातत्याने आयोजित करत असतात. अकॅडमिक कार्यातही ते अव्वल असतात. अस्थिशल्य चिकित्सकांच्या सर्व परिषदांना ते आवर्जून उपस्थिती लावून आपल्या ज्ञानात भर घालून त्याचा सर्वांना कसा उपयोग होईल यासाठी प्रयत्नशिल असतात. लातूरच्या डॉक्टर मंडळींच्या अडचणी सोडविण्याकामीही डॉ.पोद्दार अग्रेसर असतात, असे डॉ. भट्टड यांनी सांगितले.

डॉ. दिलीप देशपांडे यांनी यावेळी बोलताना डॉ. पोद्दार आपल्याला त्यांचे गुरु मानतात , हा माझा नव्हे तर त्यांच्या मनाचा मोठेपणा असल्याचे सांगितले. अशा प्रकारचा आरोग्यदायी यज्ञ ते नियमितपणे राबवित असतात हे सर्वांना माहिती आहेच. एक प्रकारे ही त्यांची तपस्या आहे. आपल्या व्यस्ततेतून वेळ काढून ते असे सामाजिक उपक्रम राबवितात , ही बाब आम्हा सर्व डॉक्टर मंडळींसाठी प्रेरणादायी आहे. आयएमए चे अध्यक्ष डॉ.अभय कदम यांनी लातुरात मोफत आरोग्य शिबिराचा अनोखा उपक्रम राबविण्याकामी अग्रेसर असणाऱ्या डॉ.अशोक पोद्दार यांचे नाव या उपक्रमस्तही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदले जाईल,असा विश्वास यावेळी बोलताना व्यक्त केला.

डॉ. सुरेखा काळे यांनीही आपले विचार व्यक्त करून सर्वांना डॉक्टर्स डे च्या शुभेच्छा दिल्या. डॉ. अशोक पोद्दार यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून आपल्या हॉस्पिटलच्या वतीने अशा प्रकारचे आरोग्य विषयक व सामाजिक उपक्रम नियमितपणे राबविण्यात येत असल्याचे सांगितले. आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेने आपण असे उपक्रम राबविण्याकामी पुढाकार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. या निमित्ताने रुग्णांना सर्व सेवांमध्ये पन्नास टक्के सवलत देण्यात आली असून हाडांची ठिसूळता आणि सर्व रुग्णांना मोफत औषधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगितले.

आज डॉक्टर्स डे सोबतच सीए डे असल्याने सर्व सीए बांधवांनाही डॉ.पोद्दार यांनी शुभेच्छा दिल्या. या शिबिरात ३५ रुग्णांचे एक्सरे काढण्यात आले तर ७० रुग्णांची मोफत हाडांच्या ठिसूळतेची तपासणी करण्यात आली. ३२ रुग्णांना व्हिटॅमिन डी ३ च्या गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच ३० रुग्णांची न्यूरोपॅथी तर १८ रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली. यावेळी वैशालीताई देशमुख यांचे स्वागत डॉ.अशोक पोद्दार व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. भावना पोद्दार यांनी केले. डॉ. भट्टड यांचे स्वागत डॉ. अभय कदम यांनी केले. डॉ. सुरेखा काळे यांचे स्वागत डॉ. ज्योती सूळ यांनी केले. या प्रसंगी दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत डॉ. आरती झंवर यांनी ९० किमी अंतर ८ तास ३७ मिनिटांमध्ये पूर्ण करून विजय मिळवल्याबद्दल त्यांचा वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याच स्पर्धेत संजीव भार्गव यांनी हे अंतर ११ तास १३ मिनिटात पूर्ण केल्याबद्दल त्यांचा डॉ. सुरेश भट्टड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. ब्रिजमोहन झंवर यांनी हे अंतर ११ तास ४५ मिनिटात पूर्ण केल्याबद्दल डॉ. दिलीप देशपांडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या तिन्ही यशस्वी स्पर्धकांना पोद्दार हॉस्पिटल परिवाराकडून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. ब्रिजमोहन झंवर यांनी या सन्मानाबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त केले. प्रत्येक व्यक्तीने आपल्या चांगल्या आरोग्यासाठी दररोज किमान ४५ मिनिटे स्वतःसाठी द्यावेत,अशी अपेक्षा व्यक्त केली.

याप्रसंगी आयएमएचे सचिव डॉ. हरिदास, आयएमए महिला विंगच्या अध्यक्षा डॉ. ज्योती सूळ, सचिव डॉ. प्रियंका डावळे, कैलास कांबळे, रामेश्वर सोमाणी, अजय दुडिले, विजय रांदड, दीपक वारद, रोटरीचे सचिव मालपाणी, अमोल बनाळे, नरेंद्र भुतडा, डॉ. विश्रांत भारती, डॉ. इमरान कुरेशी, डॉ. पल्लवी जाधव, डॉ. निकिता ब्रिजवासी, डॉ. साक्षी शर्मा, बालाप्रसाद सारडा, जयेश बजाज, व्यवस्थापक वसिम शेख यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

————————————-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]