आज पोळा, हा दिवस ‘मातृदिन’ म्हणूनही साजरा केला जातो. आपल्या आयुष्यात आईचं महत्व अतुलनीय आहे. तिच्यामुळेच आपण हे जग पाहू शकतो. ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ हे आईविषयी केलेलं विधान अगदी यथार्थ आहे. आई जन्माची अशी शिदोरी आहे जी उरत ही नाही आणि पुरतही नाही. आपण तिचे कधीच उतराई होऊ शकत नाही. म्हणूनच आजच्या दिवशी आपल्याला या जगात घेऊन येणाऱ्या त्या माउलीला आपल्या कृतीतून कृतज्ञता आणि आदर व्यक्त करायला हवा. आज या निमित्ताने मला माईची म्हणजे माझ्या आईची प्रकर्षाने आठवण येत आहे. माई मातृदिनाच्या निमित्ताने मला नेहमी एक कथा सांगायची, “देवकीने कृष्णाला जन्म दिला. पण त्यानंतर काही क्षणातच तिला त्याला तिच्यापासून दूर ठेवावे लागले. स्वतः जन्म देऊनही तिला आपल्या वात्सल्याची पखरण कृष्णावर करता आली नाही. त्यामुळे ती त्याच्या विरहात अतीव दुःखी असायची आणि हा आवेग अनावर झाला कि विचारायची ‘अतीत कोण’ आणि त्या क्षणी कृष्ण तिला उत्तर द्यायचा ‘मीच’. त्या स्वरांनी देवकीच्या दुखऱ्या मनावर फुंकर घातली जायची. दूर असला तरी आपला पुत्र आपल्या पाठीशी आहे ही आश्वासकता तिला त्या ‘मीच’ या स्वरात जाणवायची आणि ती थोडी शांत व्हायची.” माईच्या तोंडून ही कथा ऐकताना मी नेहमीच हळवा व्हायचो. आईची कूस म्हणजे जगातील सर्वात सुरक्षित स्थान असतं. जगातलं कोणतंही संकट तिथे आपल्याला इजा पोहचवू शकत नाही. ती आपल्या सोबत असली किंवा नसली तरी तिचे आशीर्वाद सदैव आपल्या सोबत असतात. म्हणून आपण कायम आपल्या आईप्रती कृतज्ञ राहायला हवं हे सांगणारा आजचा हा ‘मातृदिन’. आजची पिढी अनेक ‘डे’ साजरे करते. पण आपल्या संस्कृती प्रमाणे ‘पोळा’ हाच खरा’ मातृदिन’ आहे आणि आपण तो साजरा करायला हवा.

त्याचप्रमाणे अखिल प्राणिमात्राविषयी देखील आपण कृतज्ञ असायला हवं हे सांगणारा आजचा ‘पोळा’ हा सण. बळीराजा बैलावर आपल्या पुत्राइतकंच प्रेम करतो. बैलही आपल्या धन्या इतकाच शेतात राबतो. म्हणून आजच्या दिवशी त्याची पूजा करून, त्याला गोडधोड खाऊ घालून, त्याला सजवून, त्याची मिरवणूक काढून त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतो. आपले सण आणि उत्सव हे खरोखरच आपल्याला वैचारिक आणि भावनिक दृष्ट्या समृध्द करत असतात.

©श्रीकांत अनंतराव जोशी
माजी आमदार
मराठवाडा पदवीधर मतदार संघ