प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांचा
आयएमबीतर्फे ११ रोजी सन्मान
पणजी, दि.३ ( प्रतिनिधी ) –
ज्येष्ठ पत्रकार व कवी प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांचा येथील इन्स्टिट्युट मिनेझिस ब्रागांझा या सरकारी संस्थेतर्फे येत्या ११ ऑगस्ट रोजी विशेष सन्मान करण्यात येणार आहे. यंदाचा हा कार्यक्रम येत्या ११ रोजी दुुपारी ३.३० वाजता होणार आहे. श्री. क्षीरसागर यांच्या समवेत विजय डिसोझा हे इंग्रजी व महेश दिवेकर हे कोंकणी दैनिकातील पत्रकारांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती इन्स्टिट्युट मिनेझिस ब्रागांझाचे चेअरमन दशरथ परब यांनी कळविले आहे.
इन्स्टिट्युट मिनेझिस ब्रागांझा दरवर्षी तीनही भाषांतील पत्रकारांचा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथीनिमित्त सन्मान करत असते. यंदा या सन्मानासाठी क्षीरसागर यांची निवड झाली आहे. श्री. दिवेकर हे कोकणी दैनिक भांगरभूंयचे संपादक आहेत.
श्री. क्षीरसागर हे गेल्या १९९३पासून दै. गोमन्तकमध्ये उपसंपादक म्हणून काम करत होते. ते तेथून २०१४ मध्ये स्वेच्छानिवृत्तीनंतर त्यांनी भांगरभभूंय या दैनिकात ज्येष्ठउपसंपादक तसेच दै. तरुणभारतच्या संवाद पुरवणीचे काम पाहिले आहे.
पत्रकारितेच्या क्षेत्राखेरीज प्रकाश क्षीरसागर हे ज्येष्ठ साहित्यिक कवी व गझलकार असून त्यांचे गर्भावल्या संध्याकाळी, मातीचे डोहाळे(माती, पाऊस आणि सखी), जमाना बदलल्याचं चिन्ह दुसरं काय हे कवितासंग्रह प्रकाशित असून झेलून दुःख माझे गेला खचून रस्ता व दहकता अंगार आहे हे मराठी गझलसंग्रह, माणसांची खैर नाही, माणसांची हाव सांग संपणार तरी केव्हा आणि कृतज्ञ पशु आणि पक्षा आनंदते सृष्टी हे ललित लेखसंग्रह प्रकाशित आहेत. माणसांची खैर नाही हा संग्रह कर्नाटक विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात लागला आहे. खुशी को जरा छुपा दीजिए हा हिंदी कवितासंग्रहही प्रकाशित झाला आहे. त्यांना अनेक पुरस्कार व मानसन्मान लाभले आहेत. दिल्लीच्या साहित्य अकादमीत व बृहन्महाराष्ट्र मंडळात त्यांचे गझल सादरीकरण झाले आहे.
या तीनही पत्रकारांचा दीर्घकालीन अनुभव लक्षात घेऊन त्यांचा सन्मान आयएमबी करीत आहे.




