मुंबई ते मराठवाडा- उकाड्याचा पहिला फटका
लेखन :-प्रणव पटवर्धन
भाग
मुंबईसारख्या अफाट महानगरात आयुष्य सुखसोयींनी युक्त असेच जाते. या महानगराच्या पलिकडे असलेल्या जगाशी ओळख झाली की खरंतर आपल्याला आपल्याच शहराची नव्याने ओळख होते. तशी ओळख मला मराठवाड्यात दोन- तीन वेळा गेल्यानंतर हळूहळू झाली असंच म्हणेन. मराठवाड्यात सुरूवातीला गेलो तेव्हा इंटर्नशिपसाठी ज्ञान प्रबोधिनी आणि पानी फाऊंडेशनमध्ये गावागावात चालणारी कामं पहायला, आणि इतर दोन वेळेला त्यावर आधारित संशोधनासाठी. दुष्काळाचा आणि मुंबईचा संबंध, फक्त महापालिका जेव्हा काही टक्के पाणी कपात लागू करते, त्याच वेळेस येतो. अन्यथा मुंबईकरांना पाण्याचा प्रश्न म्हणून भेडसावत असण्याची शक्यता कमीच!
मराठवाड्यात माझं स्वागत झालं ते उकाड्याने. एप्रिल महिन्याचे दिवस होते. त्यामुळे मुंबई हळूहळू गरम होत असली तरी तिकडे मात्र चांगलाच उकाडा होता. एसी थ्री टायरमधून लातूरला उतरलो, तेव्हा अर्धा झोपेतच होतो म्हणून उकाडा एवढा कळला नाही. लातूर ते अंबाजोगाई प्रवास पण डुलक्या काढत काढत झाला. त्यानंतर अंबाजोगाईला ज्ञान प्रबोधिनी चे प्रसाद चिक्षे यांची भेट घेतली. थोडा आराम केला. त्यानंतर माझी झोप पूर्ण झाली. तेव्हा प्रत्यक्ष उकाडा लक्षात आला.
पूर्वी अंबरनाथला रामनवमीसाठी जायचो. त्यावेळी गाडीने ठाण्याची खाडी ओलांडली की, कोरडा गरम वारा लागायचाय. उकाड्याच्या झळा बसायच्या आणि प्रत्यक्ष अंबरनाथ स्टेशनवर तर भट्टी पेटल्यागत फुफाटा असे. तशाच प्रकारचा पण अधिक तीव्र आणि अधिक कोरड्या उकाड्याच्या झळा अंबाजोगाईत बसत होत्या. त्यामुळे तिथे दादांनी दिलेली पहिली सूचना होती ‘खूप पाणी पित रहा आणि उसाचा रसही पी.’
त्यानंतर संध्याकाळी ४ वाजता जरा ऊन्हं कलल्याने आम्ही जवळच्याच कुंबेफळ गावी जायला निघालो. ४ वाजता ‘ऊन कललं’ म्हणण्याचा प्रघात म्हणून ‘ऊन कललं’ असं म्हटलं, अन्यथा ऊन्हाचा तडाखा म्हणजे काय हे तर जाणवत होतंच. मी आणि तिथला एक कार्यकर्ता बाईकवरून एकत्र निघालेलो. वाटेत आणखी दोघांना बाईकवरून जाताना पाहिले. नंतर काही अंतराने चक्क उन्हाने त्यांचा अपघात झालेलाही पाहिला. तेव्हा कळलं, इथे उनही घातक होऊ शकतं, आणि त्यावर गोड ऊसाचा रस हा अतिशय रामबाण इलाज आहे.
उन्हाचा दुसरा फटका काही दिवसांनी बसला. याच कुंबेफळ गावात आम्ही नलारुंदीकरणाच्या कामासाठी पोकलेन मशिन ठेवले होते. ते ज्या ठिकाणी असणं अपेक्षित होतं, तिथे दुसऱ्या दिवशी ते नव्हतं. आता, एवढं अक्खं पोकलेन मशिन कसं काय गायब झालं ते कळेना! बरं गावात कोणाचे फोनही लागेनात. त्यामुळे भर दुपारच्या वेळात, कडाक्याचा उन्हात रानोमाळ हिंडणं भाग होतं. मी यावेळी- आणखी एक कार्यकर्ते होते, विनायक पटवर्धन म्हणून- त्यांच्यासोबत गेलेलो. मग पटवर्धन काका आणि मी, पाऊल आत जाईल अशा भूसभूशीत नांगरलेल्या- आणि कमालीच्या तापलेल्या जमिनीवरून चालत निघालो. माती बुटात गेली की पायाला प्रचंड चटके बसत. शेताचे बांध ओलांडताना बाभळीच्या झाडांनी ओरबाडून काढलं, तिथल्या मातीच्या ढेकळावरून घसरून अनेकदा पडलो, अनेकदा आमच्याच खड्ड्यांमधून उतरून जावे लागले, पण मशिन शोधायचंच होतं. किती तरी अंतर चालल्यानंतर एखादं खोपट दिसे, त्यातला बुवा सांगे, ‘मशान रातच्याला थिकडं गेलं…’ मग त्या दिशेची वाट तुडवा. असा सुमारे तास दीड तास टळटळीत उन्हात चालल्यावर अखेरीस ‘मशान’चा नेमका पत्त्या घावला, ते मशीनही पाहिलं. त्यानंतर काकांनाच माझी काळजी वाटू लागली, त्यामुळे त्यांनी मला एका डेरेदार आंब्याच्या सावलीत बसायला सांगितलं आणि तिथून जवळच पार्क केलेली बाईक आणायला ते गेले.
या उकाड्याचा खरा, अगदी स्मरणात राहण्यासारखा किस्सा घडला तो निमला गावात. खरंतर निमला हेच एक स्वतंत्र प्रकरण आहे. या गावाने अनेक नव्या गोष्टी मला दाखवल्या. काही भीषण वास्तवांची जाणीव या गावाने करून दिली. काय ते पुढच्या भागात सांगतो………..नमस्कार!











