प्रसाद चिक्षे यांना रोटरीभूषण पुरस्कार जाहीर
शुक्रवारी रोटरीच्या पदग्रहन सोहळ्यात होणार पुरस्कार प्रदान
अंबाजोगाई-:रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी यांच्या वतीने दिला जाणारा रोटरीभूषण पुरस्कार या वर्षी ज्ञानप्रबोधिनी चे समन्वयक प्रसाद चिक्षे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण शुक्रवारी १६ जुलै रोजी दुपारी एक वाजता परिचय मंगल कार्यालय येथे होणार आहे. अशी माहिती रोटरी चे अध्यक्ष डॉ.निशिकांत पाचेगावकर व सचिव कल्याण काळे यांनी दिली.
या पदग्रहन सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून रोटरी चे प्रांतपाल ओमप्रकाश मोतीपवळे,उपप्रांतपाल दादासाहेब जमाले पाटील, उपस्थित राहणार आहेत. यावेळी रोटरी चे नूतन अध्यक्ष विवेक गंगणे,सचिव प्रा.रोहिणी पाठक व नवीन पदाधिकारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
याच कार्यक्रमात ज्ञानप्रबोधिनी चे समन्वयक प्रसाद चिक्षे यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोटरीभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
प्रसाद मधुकरराव चिक्षे हे गेल्या दोन तपा पासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. नवीन पिढी सक्षम घडविण्यासाठी त्यांनी शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोग केले आहेत.अंबाजोगाई च्या शिक्षणक्षेत्रात ज्ञानप्रबोधिनी ने नवीन पिढी सक्षम घडविल्याची अनेक उदाहरणे आहेत.शिक्षण क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातही प्रसाद चिक्षे यांचे मोठे काम आहे.सन २०१२ पासून त्यांनी अंबाजोगाई तालुक्यात सुरू केलेली पाणलोटाची चळवळ आज महाराष्ट्रभर पोहंचली आहे.तलावातील गाळ काढणे,डोंगरी भागात पाणीसाठा निर्माण करणे,आवश्यक असणाऱ्या गावांना ज्ञानप्रबोधिनी व विविध संस्थांच्या मदतीने टँकर द्वारे पाणीपुरवठा करणे.ही कामे करत असतानाच पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून सुरू झालेली चळवळ हाती घेऊन तिला मूर्त स्वरूप व चालना देण्याचे काम चिक्षे यांच्या माध्यमातून झाले आहे. कोरोनाच्या काळात ज्ञानप्रबोधिनी व विविध संस्थांच्या माध्यमातून लोखंडी व स्वाराती रुग्णालयात २५ लक्ष रुपयांची अत्यावश्यक औषधी व यंत्र सामुग्री उपलब्ध करून देत रुग्णसेवेला बळकटी दिली.या शिवाय चिक्षे यांचे शिक्षण व सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन रोटरी ने त्यांना रोटरीभूषण पुरस्कार जाहीर केला आहे. या समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन रोटरी च्या वतीने करण्यात आले आहे.











