प्रासंगिक: वाढदिवस विशेष

0
203

देशातील शेतकर्‍यांचे हित जोपासणारे

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी

देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा १७ सप्टेंबर रोजी जन्म दिवस आहे. मागच्या सात वर्षापासुन भारत मातेला त्यांचे नेतृत्व लाभलेलं आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जगाच्या पाठीवर लोकप्रिय असलेला पंतप्रधान म्हणुन त्यांचा अमेरिकेतील एका संस्थेने सर्व्हे केला. आतापर्यंतच्या इतिहासात असं मानाचं स्थान भारतीय पंतप्रधानाला कधीच मिळालं नव्हतं. मा. नरेंद्रजी मोदी देशहितासाठी निर्णय घेतात हे अनेक प्रश्नावरून लोकांच्या लक्षात आलं. भारतीयांना पाच वर्षात दिलेला विश्वास पटला. म्हणुन देशातील जनतेने त्यांना बहुमताने २०१९ साली झालेल्‍या लोकसभा निवडणुकीत सत्तेवर पाठवलं. मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या भुमिकेचे वेगवेगळे गुण उल्लेखनीय आहेत पण सर्वात जास्त म्हणजे हे पंतप्रधान देशातील शेतकर्‍यांना मदत करणार नेता ही त्यांची ओळख आहे. उत्पादन खर्चावर आधारीत शेतकर्‍यांच्या हमी भावात सतत होत असलेली वाढ शेतकरी वर्गाला सुवर्ण पर्व काळाकडे घेवुन जाणारी आहे. माझ्या देशातील शेतकर्‍यांच्या नियमित कालावधीत वर्षाकाठी सन्मान निधी टाकण्याचं त्यांचं योगदान कुणीच विसरू शकत नाही. ऊसाची एफआरपी वाढवल्यानंतर पुन्हा गहु आणि मोहरी एफआरपी वाढवली. अर्थात शेती मालाला हमी भाव असा वाढत गेला तर आर्थिक क्रांती येणार्‍या काळात निश्चित होवु शकते यात शंका नाही.

पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब सत्तेवर आल्यानंतर देशात अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले. एक तर देशाची सुरक्षितता आणि अखंडता याला प्राधान्य देताना भारतमातेचं रक्षण त्यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे होत आल्याचे साक्षीदार जनता आहे. ३७० काश्मिरमधील कलम रद्द करून दाखवलं. श्री. प्रभु रामचंद्र मंदिराचा प्रश्न निकाली काढला आणि मंदिर उभारणीचे काम आज युध्‍द पातळीवर सुरू केले. तीन तलाक हा प्रश्न निकाली काढला. सबका साथ, सबका विकास देशातील भौतिक विकास आणि मुलभुत सुविधा वेगवेगळ्या माध्यमाने गोरगरीब जनतेच्या उंबरठ्यावर नेहुन ठेवण्याचं काम मागच्या सात वर्षात त्यांनी केले. माझ्या माय माऊलींना धुराड्यापासुन मुक्त व्हावं यासाठी उज्वला गॅस योजना तर देशातील गरीबांना त्‍यांच्‍या हक्काचं घर असावं यासाठी आवास योजना मोठया प्रमाणात सुरू केली. आज देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो आहे.

संरक्षण विषयात झालेले बदल किंवा देशातील भौतिक मुलभुत सुविधा गावच्या सरपंचाला विकासाच्या प्रक्रियेत घेवुन येण्याचं कसब त्यांच्या दृष्टीत आहे. खरं तर महात्मा गांधींनी राम राज्याची कल्पना मांडली. पण त्यांच्या काँग्रेसला अंमलात आणता आली नाही. देशात केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातुन ग्रामस्वराज्य असेल किंवा राम राज्य अंमलात येत आहे. हे देशातील १३८ कोटी जनता डोळ्यांनी पहात आहे. सात वर्षाची त्यांची कारकीर्द शेवटच्या माणसाचं कल्याण अर्थात स्व.पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांनी अंत्योदय या कल्पनेचा आविष्कार तत्कालीन काळात मांडला होता. त्या मार्गाने मोदीजी यांची वाटचाल नवरूप देशातील सामान्य जनतेच्या जीवनात घडवत आहे.

डॉ.शामाप्रसाद मुखर्जी यांचं बलिदान जनसंघापासुन आजच्या भाजपपर्यंत कुणीच विसरले नाही. कारण ३७० कलम काश्मिरमध्ये नको ही भुमिका मुखर्जी यांनी घेतली होती. एवढंच नव्हे तर १९५२-५३ सालात त्यांनी दिल्ली ते काश्मिर सर्व बंधने झुगारून प्रवास केला. अर्थात काश्मिरमध्ये तत्कालीन सरकारने त्यांना पकडलं. जेलमध्ये टाकलं आणि त्यांचा मृत्यू आजही संशयास्पद आहे. पण आपल्या अनुयायाचं बलिदान व्यर्थ न जाऊ देणारा महापराक्रमी पंतप्रधान म्हणुन मा. मोदींजी यांचा उल्लेख करणे क्रमप्राप्त. कारण स्वातंत्र्य प्राप्तीपासुन जी मागणी संघ परिवार भाजप करत होता त्याची पुर्तता यांच्या काळात झाली. वास्तविक पाहता वर्तमानकाळ देशात सुवर्ण पर्वकाळ असं म्हणायला हरकत नाही.

अनेक विषयामध्ये प्रगतीचे दरवाजे देशात खुलले. त्यापैकी मा. नितीनजी गडकरी यांच्याकडे असलेले रस्ते वाहतुक राष्ट्रीय महामार्ग निर्मितीचा नवा इतिहास सात वर्षात भारताने रचला. ज्यामुळे दळणवळणाची साधने सोयीची होवु लागली. काँग्रेसी लोकांना यापुर्वी देशात असं का करता आलं नाही? असो. बाकी काही असलं तरी स्वातंत्र्यानंतर देशातील शेतकर्‍यांना सतत कांहीतरी देणारा पंतप्रधान म्हणुन कोण? तर नरेंद्र मोदी अशी त्‍यांची ओळख पुढे येत आहे. मध्यंतरी त्यांनी शेतकर्‍यांच्या कायद्यात दुरूस्ती केल्या. आपल्या देशातील शेतकरी दलालाच्या तावडीत जाता कामा नये. सन्मानपुर्वक शेतकर्‍यांना त्याचा शेतीमाल कुठेही विक्री करता यावा. तशा प्रकारची मुभा त्याला असावी. त्याच्या मालावर कुणाचे बंधन नसावीत. म्हणुन क्रांतीकारक निर्णय घेताना शेतकरी वर्गाला स्वाभिमान आणि प्रतिष्ठा मिळवुन देण्याचं काम त्यांनी केलं. अर्थात केवळ राजकिय सुडापोटी काँग्रेसवाल्यांनी या निर्णयाला विरोध दर्शविला हा भाग वेगळा. पण शेती मालातील दलाली पद्धत बंद करण्याचं काम त्यांनी करून दाखविलं. शेतकर्‍यांना उत्पादन आधारावर भाव मिळाला पाहिजे. म्हणुन त्यांनी सतत हमीभाव वाढवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. ऊसाला चांगला भाव मिळावा म्हणुन सर्वात जास्त एफआरपी वाढवण्याचे निर्णय मोदी यांच्या कालावधीतच झाले.

खरीप हंगामाच्या तोंडावर दरवर्षी हमीभावात होत असलेली वाढ शेतकर्‍यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवणारी वाटते. त्यांनी गहु, मोहरी आदी पिकांत वाढ केली. तेलबीया पिक उत्पादनात प्रचंड वाढ केल्यामुळे ज्याचा फायदा शेतकर्‍यांना निश्चित होत आहे. सोयाबीन पिकात हमीभावात वाढ केल्यामुळेच आज परिणामी दहा हजार रूपायापर्यंत सोयाबीनच्‍या भावाची स्पर्धा वाढली. ज्वारीचे भाव तीन हजारी झाले तर हरभरा बाजारात साडे पाच हजारापेक्षा जास्त जाणार याची दक्षता त्यांनी घेतली. हमीभाव निमित्त असले तरी केंद्र सरकारने वाढवलेल्या भावाच्या पुढे बाजारात जेव्हा भाव वाढतात तेव्हा भाव वाढीची स्पर्धा सुरू होते आणि मग शेतकर्‍यांचा फायदा होतो.

देशात जे चित्र आज घडत आहे ते केवळ मा. मोदीजींच्‍या भुमिकेतुन. शेतीपुरक उद्योगाला दिलेली चालना असेल किंवा विमा सुरक्षा कवच असेल एवढेच नाही तर देशातील गरीब शेतकरी वेगवेगळ्या कारणास्तव संकटात सापडतो. म्हणुन त्यांनी केंद्रातुन शेतकरी सन्मान निधी वर्षाकाठी सहा हजार रूपये शेतकर्‍यांना हक्काने थेट बँकेत जमा होतात. ही योजना खर्‍या अर्थाने कल्याणकारी सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या आर्थिक हिताची जोपासना करणारी वाटते. यापुर्वी काँग्रेसवाल्यांनी एक कवडी रूपायाही शेतकर्‍यांना केंद्र स्तरावरून कधीच दिलेला नव्हता. आज जी मंडळी राजकिय विरोध करताना वेगवेगळे आव आणुन ओरडत आहेत. त्यांनी मागे वळुन आपल्या इतिहासाची पाने चाळली तर आज प्रत्येक काँग्रेसवाल्यांना पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांची भुमिका निश्चित कौतुकास्पद वाटेल. खरं तर ज्यांना मिळतं त्यांना कळतं. दर दोन तीन महिन्याला संकटात असलेल्‍या शेतकर्‍यांना केंद्र सरकारच्या कडुन आलेला दोन हजाराचा मॅसेज टण टण वाजतो तेव्हा सुखाने शेतकरी आपल्या हातात मोबाईल घेतो आणि खात्यावर पैसे पडल्याचं पाहतो. तेव्हा निद्रा अवस्थेत असलेला शेतकरी पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेबांना र्‍हदयातुन आशिर्वाद देतो.

कधी कधी वेगवेगळे अवतार मानवी जीवनात होवुन जातात. तसं पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब दैवी शक्ती असलेला अवतार वर्तमानकाळात भारतमातेच्या पोटी जन्म घेतला हेच खर्‍या अर्थाने भाग्य म्हणावे लागेल. मा. नरेंद्रजी मोदी साहेबांचा १७ सप्टेंबर हा जन्म दिवस आहे. त्‍यांच्‍या हातून देशाची अखंड सेवा घडो, शेतकर्‍यांसह गोर गरीब सर्वसामान्‍य माणसांना दिलासा देण्‍याचे कार्य घडो हीच जन्‍मदिवसा निमित्‍ताने परमेश्‍वर चरणी प्रार्थना.

लेखन:  आ. रमेशअप्पा कराड

भाजपा जिल्हाध्यक्ष लातूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here