५९ जातींना अ ब क ड प्रवर्ग आरक्षण लागू करा
– बहुजन रयत परिषदेचे लक्ष्मण ढोबळे यांची मागणी
लातूर/प्रतिनिधी दुबळ्यांना आरक्षणात संधी मिळत नाही. त्यामुळे बहुजनांच्या ५९जातींना अ ब क ड प्रवर्ग आरक्षण लागू करावे, यासाठी राज्यातील आघाडी सरकारकडे नाहरकत पत्र मागितले असल्याची माहिती माजी मंत्री तथा बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण ढोबळे यांनी लातूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
५९ जातींना अ ब क ड प्रवर्ग आरक्षण तसेच गेल्या काही वर्षांत मातंग समाजाची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ गेल्या पाच वर्षांपासून मेल्यात जमा आहे. त्यामुळे मातंग समाजातील सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रश्न सोडवण्याच्या हेतूने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त बहुजन रयत परिषदेच्यावतीने राज्यभरात नवनिर्धार संवाद अभियान यात्रा सुरु करण्यात आली आहे. आज ही अभियान यात्रा लातूर येथे आली होती. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत लक्ष्मण ढोबळे यांनी या संवाद अभियानाबद्दलची भूमिका मांडली.
प्रारंभी ढोबळे यांनी लोकनेते विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्याने मराठवाडा पोरका झाल्याची भावना व्यक्त केली. तसेच आज जे आरक्षणावरून घोळ सुरु आहे, त्यावर देशमुख, मूंडे यांनी तात्काळ तोडगा काढला असता, असेही ढोबळे म्हणाले.
अ ब क ड प्रवर्ग आरक्षणासंदर्भात ते म्हणाले, ५९ जातींपैकी बौद्ध समाजाची संख्या सर्वाधिक आहे, म्हणून त्यांना अ प्रवर्गाचे आरक्षण, त्यानंतर मातंग समाजाला ब प्रवर्ग, त्यानंतर चर्मकार, ढोर, होलार, मोची समाजाला क प्रवर्ग आणि उर्वरित ५४ जातींना ड प्रवर्ग आरक्षण लागू करावे. यासाठी देशातील १२ राज्यांनी नाहरकत पत्र दिले आहे. बहुजन रयत परिषदेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेवून मागणी केलेली आहे. मात्र अद्याप पत्र मिळालेले नाही. त्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे ढोबळे यांनी सांगितले.
आरक्षणाबद्दल सगळेच बोलत आहेत, पण तयारीने बोलायला हवे, आणि त्यासाठी पाठपुरावाही महत्वाचा आहे, असे मत त्यांनी यावेळी मांडले.
या पत्रकार परिषदेला बहुजन रयत परिषदेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष कोमलताई साळुंके, संस्थापक रमेश गालफाडे, जि.प. सदस्य महेश पाटील, रोहिदास वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.











