एक उधाणलेली न्यारी मैफल
०००अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या ‘रंगवर्धन’ उपक्रमांतर्गत पद्माकर देव सभागृहात ‘प्रेमयोग’ हा काव्यगान-कथनाचा अप्रतिम कार्यक्रम रजनीश जोशी आणि विद्या लिमये यांनी सादर केला. त्या कार्यक्रमाचा हा रंगतदार वृत्तांत.०००
शरदकुमार एकबोटे०००‘प्रेम कर भिल्लासारखं, बाणावरती खोचलेलं; मातीमध्ये उगवूनसुद्धा मेघांपर्यंत पोचलेलं..’ अशा उदात्त प्रेमभावनेच्या विविधांगी कंगोऱ्यांना शब्द-सुरांनी कधी हळूवार तर कधी कणखर स्पर्श करणारी अनोखी मैफल रसिकांनी अनुभवली. ‘प्रेमदिना’निमित्त हा मुग्धमधूर ‘प्रेमयोग’ साधला होता.

विविध क्षेत्रातील उपस्थित मान्यवर रसिक; साहित्यिक रजनीश जोशी आणि प्रख्यात गायिका विद्याताई लिमये यांच्या संवादी सादरीकरणावर अक्षरशः झुलत होते. शास्त्रीय संगीताच्या अभ्यासक, गायिका विद्या लिमये यांनी स्वतः प्रतिभासंपन्न कवींच्या रचना स्वरबद्ध केल्या होत्या. त्यांच्या नितळ, सुस्पष्ट, रेशमी सुरांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाला एका वेगळ्या उंचीवर नेले.रजनीश जोशी यांनी ‘प्रेम’ या सूत्राने संहिताबांधणी केली होती.

कवी कुसुमाग्रज, इंदिरा संत, वसंत बापट, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, सुरेश भट, आरती प्रभू, नारायण कुलकर्णी, हेमकिरण पत्की यांच्या कवितांच्या समावेशाने ‘प्रेमयोग’ साधला होता. काव्याबरोबरच प्रेमाचे मोहक किस्से, प्रेमकथांचे सार, प्रासंगिका अशा गद्य-पद्य मिश्रणाने मैफल रंगतदार झाली. महाकवी कालिदास, गीतकार गुलजार, गौरी देशपांडे यांचे संदर्भ म्हणजे दुग्धशर्करा योग होता. रजनीश यांची निवेदनशैली खूपच प्रभावी होती. खोडकर, मिश्किल भाव, संयमित अभिनयातून त्यांनी आपले सादरीकरण खुलवले.‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, या विद्याताई लिमये यांनी गायलेल्या गीताने आरंभ झालेल्या मैफलीत ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं,’ ही मंगेश पाडगावकरांचीच रचना सादर करून रजनीश आणि विद्या यांनी बहार उडवून दिली. वसंत बापट यांच्या ‘अर्धा विडा द्यावा घ्यावा, त्याची रंगतच न्यारी’ या कवितेतील खट्याळ भाव श्रोत्यांना आवडला. मधुकर जोशी यांचे ‘झिम झिम झरती श्रावणधारा’ या विद्या लिमये यांनी गायलेल्या गीताने सभागृह आर्त विरही सुरात बुडून गेले. पण नंतर ‘त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं, करू दे की, मला सांगा तुमचं काय गेलं?’ या मंगेशी वळणाच्या मिश्किल रचनेनं रसिकांच्या मुखावर स्मितहास्य विलसले.‘जाता जात नाही वेळ, म्हणून जमविला मेळ’, ‘हिरवे हिरवे माळ मोकळे’, ‘मनातल्या मनात मी, तुझ्या समीप राहतो’ या कवितांना विद्या लिमये यांनी स्वरबद्ध केले होते. शेवटी ‘फुलले रे क्षण माझे’ या गीताने जणू उपस्थित रसिकांच्या मनातील भावनाच प्रकट झाल्या. कोणत्याही वाद्याची साथसंगत न घेता आपल्या मंजुळ आवाजाने विद्याताईंनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. ‘प्रेमा’सारख्या विषयाची रजनीश यांनी बांधलेली संहिता किती उंचीवर जाऊ शकते आणि त्याचा सहजसुंदर आविष्कार रसिकांना किती हवाहवासा वाटू शकतो हे कार्यक्रम संपल्यानंतर रसिक आपल्या जागी मुग्ध होऊन तटस्थ बसले, त्यावरून प्रत्ययाला आले. या विलक्षण अनुभवाबद्दल या कलावंतांचे आणि तो आयोजिल्याबद्दल संयोजकांचे अभिनंदन !
शरदकुमार एकबोटे, सोलापूर
०००




