बांधिलकीने दिले त्यांच्या पंखांना बळ
दिशा प्रतिष्ठानची विद्यार्थ्यांना दोन लाखांची मदत
लातूर, प्रतिनिधी
आर्थिक अडचण हा शिक्षणातला अडसर ठरू नये या जाणिवेने गेली अनेक वर्षापासून गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदतीचा हात देणाऱ्या येथील दिशा प्रतिष्ठानने याही वर्षी ही बांधिलकी जपत १३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी दोन लाख पाच हजाराची मदत केली
दिशा प्रतिष्ठानचे नियमित दाते चंद्रकांत बिराजदार, राजकुमार जाधव, श्वेता लोंढे, डॉ. अभय कदम ,व्यंकटेश पुरी ,इम्रान पठाण ,मोबीन शेख यांच्या हस्ते मदतीचे धनादेश विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले.योग्यता असूनही केवळ आर्थिक अडचणीमुळे काही विद्यार्थी त्यांचे प्रवेश शुल्क भरू शकत नव्हते त्यांनी यासाठी प्रतिष्ठाकडे मदत मागितली होती. दरम्यान संबंधित विद्यार्थ्यांची सर्व माहिती आजमावून ही मदत त्यांना देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. शिक्षण हे सर्वांगीण उन्नतीचे प्रवेशद्वार आहे. आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये ही प्रतिष्ठानची तळमळ असून या भावनेने हे सहकार्य करण्यात आल्याचे प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले. प्रतिष्ठानची ही बांधिलकी विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ पुरवणारी असून अशा बांधिलकीचा समाजात विस्तार झाला पाहिजे ,अशी अपेक्षा यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.
महेश गस्तगार,साक्षी स्वामी,करिना पांचाळ,समिक्षा रोडके,अलीशा मुलानी,नंदिनी कुलकर्णी,गणेश चव्हाण,हनुमंत मुळे, पुजा रोकडे, ज्योती लासुने, रमाकांत शिंदे, महेक शेख व भारती परमेश्वर
या विद्यार्थ्यांना ही मदत करण्यात आली. हा आधार आमचा शैक्षणिक प्रवास सुकर करेल व आम्हाला प्रेरणा ही देईल अशी भावना लाभार्थी विद्यार्थ्यांनी व्यक्त करीत प्रतिष्ठानने केलेल्या सहकार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.