भगवान दातार
मी औरंगाबादला असताना भगवान दातार माझ्या घराजवळच राहत होता. त्यावेळी बहुतेक मध्यमवर्गीय कुटुंबातल्या तरूणांप्रमाणे भगवानसुद्धा नोकरी करून शिकत होता. माझेही तसेच चालले होते. गोरापान वर्ण, सरळ नाक आणि चेह-यावर अत्यंत सोज्ज्वळ भाव असलेला हा उंचापुरा तरुण त्यावेळी अजिंठा दैनिकांमध्ये उपसंपादक म्हणून काम करत होता. त्याकाळी नव्याने लिहिणाऱ्या कवी-लेखकांना मराठवाड्यातील दोन दैनिकांचा मोठा आधार वाटायचा! – एक ‘दै. मराठवाडा’ आणि दुसरा ‘दै.अजिंठा’! या दैनिकांच्या रविवार पुरवणीमध्ये खूप चांगले लेख आणि कविता येत असत. आमच्या कवितांनाही तिथे अधूनमधून स्थान मिळे.
त्यावेळी भगवान आणि रवींद्र धोंगडे हे दोन तरुण औरंगाबादमध्ये वेगवेगळ्या नामवंत गायकांचे कार्यक्रम आयोजित करत. त्यांची ‘सरगम’ नावाची संस्था होती. त्यावेळी पंडीत भीमसेन जोशी, प्रभाकर कारेकर, मालिनी राजूरकर अशा कितीतरी नामवंत गायकांची गाणी आम्हाला ऐकायला मिळाली ती याच संस्थेमुळे! भगवानचे सतत काही ना काही छोटे-मोठे उपक्रम सुरू असत. त्याच्या घराच्या शेजारच्या इमारतीत ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे’ ऑफिस होते. तिथेही तो खूप चांगलं काम करत असे. खरे तर तो आधीपासूनच संघाचे काम करत होता. त्याने अनेक वक्त्यांच्या व्याख्यानमालाही आयोजित केल्या होत्या. मग काही दिवसांनी भगवान ‘दै.लोकमत’ला गेला.
त्याची आणि आमच्या तिन्ही बहिणींच्या नात्याची एक वेगळीच गंमत आहे. तो आधीपासून माझा मित्र आहे. माझी मोठी बहीण माधुरी ‘लोकमत’मध्ये काम करत होती. आणि तिचं आडनाव पण दातार आहे. त्यामुळे भगवान तिला वहिनी म्हणायला लागला. छोटी बहिण शुभांगी ही भगवानची शेजारीण! त्यामुळे तो तिला शेजारी मानायचा. त्याच्या अगदी सालस स्वभावामुळे तो आमच्या तिघी बहिणींच्या सुखदुःखामध्ये नेहमीच सामील असायचा.
आणीबाणीचा काळ आला आणि बघताबघता अनेक पत्रकार, विचारवंत, लेखकांना अटक झाली. त्यामध्ये भगवानचा समावेश झाला. तो त्या काळात कारागृहात राजकीय कैदी होता, त्याला ओरंगाबादजवळच्या हर्सूल जेल मध्ये ठेवण्यात आले होते. तिथे जेष्ठ पत्रकार अनंतराव भालेराव आणि बाबा दळवी यांचा सहवास त्याला मिळाला. पुढे हा स्नेह वृधिंगत झाला. पण त्याचा त्याने पुढे कधी बडेजाव केला नाही किंवा तुरंगवास झाल्याने स्वभावात कडवटपणा येऊ दिला नाही.
पत्रकारितेत असताना तो अनेक नामवंत लेखकांची सदरे इंग्रजीतून अनुवादित करत असे त्यामुळे आमच्यासारख्या नव्याने पत्रकारितेत येणाऱ्या लोकांना देश-विदेशातील पत्रकारांनी एखाद्या विषयावर काय लिहिले आहे ते समजत असे. मग भगवानने औरंगाबाद सोडले आणि तो पुण्यात आला. पुण्यामध्ये आल्यावरही त्याने दै. केसरीत काम केले. नंतर तो ‘लोकसत्ता’ला रुजू झाला. तिथे चांगले काम सुरु असताना त्याला तरून भारतचे संपादकपद मिळाले. त्यामुळे त्यांनी लोकसत्ताची चांगली नोकरी सोडली. पण काही कारणामुळे ‘तरूण भारत’ बंद पडला. मग लोकसत्ताचे संपादक श्री अरुण टिकेकर यांनी त्याला परत बोलावून घेतले. तिथे तो वृत्तसंपादक असताना त्याच्या अनेक वृत्तमालिका गाजल्या! पण मला आठवते ती अयोध्या येथे बाबरीपतन झाल्यानंतर त्याने अयोध्येमध्ये जाऊन केलेली ‘शरयूच्या तीरावरून’ ही लेखमाला! अगदी मोजक्या शब्दात लिहिलेली ही लेखमाला अतिशय माहितीपूर्ण होती. ती आजही अनेकांच्या स्मरणात आहे. भगवानने जेंव्हा औरंगाबाद सोडले बहुधा त्यादरम्यानच मीही औरंगाबाद सोडले होते. सरकारी नोकरीमुळे धुळे, नाशिक, मुंबई अशा माझ्या बदल्या होत गेल्या.
भगवानची अनेक वर्षात भेट झाली नव्हती. पण एक दिवस अचानक मला समजले की माझी छोटी बहिण शुभांगीच्या घराजवळच त्याने घर घेतले आहे. त्याकाळी मोबाईल फोन वगैरे काही नव्हते. आम्ही त्याच्या घरी गेलो आणि आमची बऱ्याच वर्षांनी भेट झाली. पुढे काही दिवसांनी भगवान शुभांगीच्या सोसायटीत समोरच रहायला आला. त्यावेळी शुभांगीकडे गेले की अपोआपच त्याची भेट व्हायची. भगवानचा एक महत्त्वाचा गुण म्हणजे तो अत्यंत गुणग्राहक आहे आणि आपण काही नवीन प्रयोग करत असू तर त्याबद्दल त्याला अतिशय कुतूहल असतं! माझे काही ना काही उद्योग चालत असायचे आणि प्रत्येक वेळेस भगवान मी काय नवीन करते आहे हे जाणून घेत असे! त्यावेळेस मी मंत्रालयामध्ये उपमुख्य उपमुख्यमंत्री कार्यालयात जनसंपर्क अधिकारी होते. असाच एकदा त्याच्या ‘तरुण भारत’च्या कार्यालयात तो मला घेऊन गेला आणि सहकारी पत्रकारांबरोबर माझा वार्तालाप करून दिला! त्याचा जनसंपर्क फार व्यापक आहे. पत्रकारितेतील कुमार सप्तर्षी, माधव गडकरी, अरुण टिकेकर, चंद्रकांत घोरपडे यांच्यासारख्या अनेक दिगज्जांशी सलोख्याचे संबध होते.
तो मुबईच्या “म्हाळगी प्रबोधिनी” मध्ये काही काळ कार्यक्रम अधिकारी होता. त्यावेळी त्याने टीव्ही निवेदकांचे वर्कशोप, आय ए एस वर्कशॉप आणि पुण्यात भारत पाकीस्थान अभ्यासवर्गाचे आयोजन केले होते.
त्याच्या वृत्तपत्रीय लिखाणाबरोबरच त्याचे महत्त्वाचे योगदान म्हणजे त्याने अनेक गाजलेल्या इंग्रजी पुस्तकांचा केलेला अनुवाद होय. चार-पाचशे पानांचे इंग्रजी पुस्तक बघून आपला जीव दडपतो. पण हा माणूस मात्र अत्यंत शांतपणे ती पुस्तके वाचून त्याचे मर्म समजावून घेऊन त्या पुस्तकाचा सुंदर अनुवाद करतो! कधीकधी तर ‘प्रत्यक्षाहूनी प्रतिमा सुंदर’ असा हा अनुवाद असतो. विनिता कामटे यांनी लिहिलेल्या ‘द लास्ट बुलेट’ या पुस्तकाचा त्याने केलेला अनुवाद इतका गाजला की त्या पुस्तकाच्या आत्तापर्यंत सत्तावीस आवृत्या संपल्या आहेत!
अनेक प्रशासकीय अधिकारी चांगलं काम करतात पण ते लोकांपर्यंत येत नाही हे लक्षात घेऊन त्याने ‘कलेक्टिव्ह एनर्जी’ नावाचं एक पुस्तक काढलं! अनेक ठिकाणचे जिल्हाधिकारी वेगवेगळे प्रयोग करतात ते प्रयोग यशस्वी होतात परंतु अधिकाऱ्यांची बदली झाली की पुढे काही होत नाही हे लक्षात आल्याने या प्रयोगांचं कुठेतरी डॉक्युमेंटेशन व्हावं या हेतूने त्यांनी बारा जिल्हाधिका-यांना बरोबर घेऊन त्यांच्या वेगळ्या प्रयोगाची दखल घेतली आणि एक छान पुस्तक तयार केलं. हे पुस्तक पुण्याच्या प्रसिद्ध ‘अमेय प्रकाशन’ने प्रकाशित केले होते. मला आठवतं या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईला तत्कालीन मुख्यमंत्री मा.पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्याचे ठरले होते
मुख्यमंत्र्यांनी केवळ दहा मिनिटे वेळ दिला होता त्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी वरच्या सभागृहामध्ये हा छोटेखानी कार्यक्रम होणार होता. काही कलेक्टर्स, प्रकाशक लाटकर, भगवान आणि काही मोजके प्रेक्षक उपस्थित होते. मी उत्सुकतेने या कार्यक्रमासाठी गेले होते. भगवानने छान सविस्तर प्रास्ताविक केलं आणि या प्रकल्पामागची भूमिका समजावून सांगितली. त्यानंतर एक-दोन आधिक-यांनी आपले अनुभव सांगितले आणि मुख्यमंत्री भाषणासाठी उभे राहिले. ते सविस्तर बोलले. ते म्हणाले की अशा प्रकारचे प्रकल्प वारंवार राबवले गेले पाहिजेत. त्यांनी केवळ दहा मिनिटे कबुल केली होती परंतु त्यांना ते पुस्तक इतके आवडले की कार्यक्रम तासभर चालला. त्यांनी या प्रकल्पाचं खूपच कौतुक केलं आणि खरोखरच पुस्तक अतिशय वाचनीय झाले होते. नव्याने काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्याचा मार्गदर्शक म्हणून खूप उपयोग होऊ शकतो. शिवाय ज्यांनी कल्पकपणे काही वेगळे काम केलेले आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे समाजाने पाठीवर मारलेली कौतुकाची थाप आहे. सरकारमध्ये जे डॉक्युमेंटेशन होत नाही अशी नेहमी तक्रार असते ते डॉक्युमेंटेशन या पुस्तकाच्या निमित्ताने झालेले आहे.
भगवान जेंव्हा भेटायचा त्या प्रत्येक वेळी मला ‘मी काय नवीन लिहिते आहे’ याविषयी विचारायचा! मला सरकारी नोकरीत आल्यापासून आलेल्या अनुभवांविषयी किंवा जे नवे प्रयोग केले त्याविषयी लिहायला हवे असा त्याचा आग्रह असायचा! मी नेहमी ‘हो’ ला ‘हो’ लावायची. एखादा छोटामोठा लेख सोडून माझी फार काही प्रगती झाली नव्हती. मी मंत्रालयात असताना एक दिवस भगवान माझ्याकडे ‘अमेय प्रकाशन’चे श्री. उल्हास लाटकर यांना घेऊन आला. मला वाटलं तो नेहमीप्रमाणे मंत्रालयात काही कामासाठी आला असेल. तसा तो इतरही अनेक कामासाठी अनेकदा मंत्रालयात येत असे. त्यांनी माझी लाटकरांशी ओळख करून दिली आणि सांगितलं की आम्ही अमेय प्रकाशनच्या वतीने तुझे पुस्तक काढायचं ठरवले आहे. तू सरकारमध्ये केलेल्या आगळ्या उपक्रमाविषयी लिहायला सुरुवात कर. मला मी पुस्तक छापण्याइतके काही लिहू शकेल अशी अजिबात खात्री नव्हती. मी म्हटल ‘बघू या’ कारण माझ्या डोक्यात असा विचारच नव्हता. पण भगवानने पाठपुरावा सोडला नाही. त्याने सांगितलं की हे पुस्तक झालच पाहिजे. मग आम्ही त्याचा थोडासा आराखडा ठरवला आणि पुस्तकाचं लेखन सुरू केल.

भगवानच्या कायमच्या तगाद्यामुळे आणि धाकामुळे मी पुस्तक लिहिलं. त्याच्यावरचे सर्व संपादकीय संस्कार त्यानेच निगुतीने केले आणि माझं ‘डबल बेल’ हे पुस्तक प्रकाशित झालं! मला वाटतं त्यांनी माझ्यावर माझ्या पुस्तकासाठी जेवढे कष्ट केले त्यात त्याची दोन पुस्तकं झाली असती! हे करताना आपण काहीतरी उपकार करतोय की फार मोठे वेगळं काहीतरी करतोय अशी भावना त्याच्या मनात नसे. भगवान कुणाला मदत करतानाही ते काम स्वतःचेच आहे अस समजून करत असतो. तो नेहमीच नव्याच्या शोधात असतो. ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ झाले. त्याबद्दल लोकांना फार उत्सुकता होती. या मोहिमेत सहभागी असलेले जनरल ब्रार यांनी लिहिलेले आत्मकथन भगवानने अनुवादित केले त्यांचे एक सुंदर पुस्तक झाले. या पुस्तकाच्या कितीतरी आवृत्त्या प्रकाशित झाल्या! त्याने अनुवादित केलेल्या पुस्तकात ‘शेवट नसलेल्या अफगानिस्तानच्या प्रश्नाविषयी’ या पुस्तकाबरोबरच खासदार पवन वर्मा यांनी लिहिलेल्या बहुचर्चित ‘बिकमिंग इंडियन’, मेजर जनरल शुभी सूद यांनी लिहिलेल्या ‘फिल्ड मार्शल माणेकशा’, तसेच ‘सत्ता झुकली’, ‘शहीद भगतसिंग यांचे चरित्र’, ‘परमवीर गाथा’, ‘शौर्य गाथा’, परमेश्वर विवेकानंदन यांनी लिहिलेल्या ‘विवेकानंद आणि कार्ल मार्क्स’, ‘द मोदी इयर्स’, ‘गीता, गांधीच्या नजरेतून’, अशा असंख्य पुस्तकांचा समावेश आहे.

“एंडिंग करप्शन” हे माजी दक्षता आयोगाचे अध्यक्ष यांचे अनुवादित पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. भगवानला अशा कामाबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत. नुकताच त्याला ‘ग्रंथोत्तेजक मंडळा’चा पुरस्कारही मिळाला आहे.
मी तर कधीकधी भगवानला गमतीने म्हणते सुद्धा, ‘बाबा, ती हिंदीत म्हण आहे ना, “भगवान देता हैं तो छप्पर फाडके देता हैं” मराठी वाचकांच्या दृष्टीने ती हिंदी म्हण तुलाही तंतोतंत लागू पडते!”
*******

–श्रद्धा बेलसरे-खारकर
मो ९८६९३५७९११


