फीचर
एक काळ होता, रोज भाकरी खाणारं घर गरीबाचं असायचं ( अर्थात त्या संकरीत ज्वारीत गावरान ज्वारीची सकसता नव्हती )… ज्याच्या दुर्डीत भाकरी, लोटक्यात तुरीच वरन आणि ठेच्याची वाटी…कधी तर ताटाला भात लागायचा, गव्हू फक्त सणादिवशी पोळीच्या रूपात दिसायचे… पण ज्या घराच्या दुर्डीत चपाती असायची, ताटाला रोज भात लागलेला असायचा… ते घर पुढारलेलं, आर्थिक संपन्न असं अलिखीत गृहीत धरलं जायचं…!!
आर्थिक उदारीकरणाच्या वाऱ्यानं सगळं उलटं करून टाकलं…संकरीत वाणं आली, बाजारातून खरेदी केलेली बियाण्याची पिशवी परस्पर शेतात जायला लागली अन रासीचा पाय घराला न लागता थेट मोंड्यात जाऊ लागला… घरात एकेकाळी खंडीनं असलेला माल आता बाजारातून किलोनी घरी यायला लागला …!!
गरीबाच्या दुर्डीत चपाती आली… भाकरीनं आपलं पारड बदललं ती श्रीमंताच्या ताटात डायट फायबर युक्त म्हणून डिनरचा मेनू झाली… मोठमोठ्या मॉल मध्ये गव्हाच्या किंमती सामान्याच्या आवाक्यात वाटू लागली… ज्वारीची किंमत मात्र गगणाला भिडली.. पर्यायाने ग्लुकोटिन गव्हातून घरा घरात गेलं.. भाकरीतल्या फायबरनी गरीबाचा निरोप घेतला…संकर धान्याचा सुकाळ झाला, आणि हॉस्पिटलच्या चकरा वाढल्या…फायबर, व्हिटॅमिन सी, क यासाठी मुद्दाम ट्रीटमेंट घ्यावी लागावी लागली… एकेकाळी ढेरी हे सुखासीन माणूस असल्याचे लक्षण आता बी पी, शुगरचं घर होऊन बसलं… इनटेक मध्ये मोठा लोच्या झाला, सगळं गणित बिघडलं.. आता आमच्या घरातली भूतकाळातली भाकरीची दुर्डी,गावाकड अजूनही खाण्यापूरती ज्वारी पीकविणारे पाहुणे रावळे आहेत म्हणून ती दुर्डी श्रीमंत झाली आहे.

लेखन:
@युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी , लातूर




