मांजरा कारखाना गेट समोर शुक्रवारी विविध मागण्यासाठी
आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन
लातूर दि.१० – मांजरा परिवारातील साखर कारखाने गेल्या गळीत हंगामात गाळप केलेल्या उसाला एफआरपी प्रमाणे उसाचे बिल तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे यासह विविध मागण्यांसाठी १२ नोव्हेंबर २०२१ शुक्रवार रोजी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांच्या नेतृत्वाखाली मांजरा कारखान्याच्या गेट समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
चालू वर्षाचे गळीत हंगाम सुरू झाले मात्र गेल्यावर्षी गाळप केलेल्या उसाला शासनाच्या नियमानुसार एफआरपी प्रमाणे अद्याप शेतकऱ्यांना ऊस बिलाची रक्कम मिळाली नाही. याबाबत वेळोवेळी सर्व संबंधिताकडे मागणी करूनही शेतकऱ्याना कष्टाचा मोबदला मिळाला नसल्याने भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता मांजरा साखर कारखान्याच्या गेटसमोर १२ नोव्हेंबर शुक्रवार रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
मांजरा कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय बब्रुवानजी काळे तात्या यांचे स्मारक मांजरा कारखाना परिसरात उभे करावे, चालू वर्षाच्या गळीत हंगामात कसल्याही प्रकारची कपात न करता संपूर्ण उसाचे पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, ऊस लागवड ते ऊस तोडणी पर्यंतचा संपूर्ण कार्यक्रम ऑनलाइन करण्यात यावा, वजन काटा अचूक असावा, गाळपास आलेल्या उसाचे वजन होताच ऑनलाइन करावे, गेल्या वर्षी गाळप केलेल्या उसाला मांजरा परिवारातील साखर कारखान्यांनी २३००/- रुपये प्रति टन याप्रमाणे उसाचे पेमेंट शेतकऱ्यांना दिले असून शासनाच्या एफआरपी नुसार शेतकऱ्याला मिळणारा भाव आणि देण्यात आलेली रक्कम यातील फरकाची रक्कम प्रति टन मांजरा कारखाना ४६६/- रुपये, विलास साखर कारखाना ३९९/- रुपये, रेणा साखर कारखाना ५५६/- रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करावी या मागणीसाठी हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
या धरणे आंदोलनात मांजरा परिवारातील साखर कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी सभासद आणि ऊस उत्पादकांनी आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आव्हान भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव मुळे, भाजपाचे लातूर तालुका अध्यक्ष बन्सी भिसे, रेणापुर तालुका अध्यक्ष अँड. दशरथ सरवदे, किसान मोर्चाचे लातूर तालुका अध्यक्ष बापूराव बिडवे, रेणापुर तालुका अध्यक्ष शिवमुर्ती उरगुंडे यांच्यासह अनेकांनी केले आहे











