पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब;
भाजपाच्या यशाचे सातत्य कायम राहणार – आ. कराड
लातूर दि.१० –
पाच राज्यातील निवडणुकीत चार राज्यात भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन केले असून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे शिक्का मोर्तब केले आहे. भाजपाच्या या यशाचे सातत्य यापुढील काळातही कायम राहणार असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी दिली.
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेश, गोवा, मनिपुर, उत्तराखंड आणि पंजाब या पाच राज्यातील निवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. या निकालात चार राज्यात भाजपाने घवघवीत यश संपादन केले तर पंजाब या राज्यात आप ने बाजी मारली. पाचही राज्यात काँग्रेसचा सुपडा साफ झाला. या निकालावर प्रतिक्रिया देताना भाजपाचे लातूर जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड म्हणाले देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाने केलेल्या विविध चांगल्या कामाचा परिणाम या निवडणुकीत दिसून आला. उत्तर प्रदेश, गोवा या राज्य सरकारनी केलेले काम जनतेच्या विश्वासास पात्र ठरले. भाजपाच्या नेतृत्वातील शासनानी शेवटच्या माणसापर्यंत विकासाच्या योजना पोहोचल्याने सर्वसामान्य गोरगरीब जनतेनी भाजपाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आपले आशीर्वाद दिले.
देशात विकास केंद्रित राजकारण सुरू झाले असून पाचही राज्यातील निवडणुकीचे निकाल काँग्रेसला मात्र झटका देणारे आहेत. या निवडणुक निकालामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यात मोठा उत्साह निर्माण झाला आहे. भाजपाच्या यशाचे सातत्य यापुढेही कायम राहणार असल्याचे सांगून आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की येणाऱ्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत लातूर जिल्ह्यासह सबंध महाराष्ट्रात भाजपाच्याच यशाचे चित्र दिसल्याशिवाय राहणार नाही.