बालविवाह प्रतिबंध उपक्रम सामाजिक
चळवळ होणे काळाची गरज
– पालकमंत्री तानाजी सावंत
उस्मानाबाद,दि.26 (जिमाका) : बालविवाह प्रतिबंध हा उपक्रम सामाजिक चळवळ होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी केले.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त श्री. तुळजाभवानी क्रीडा संकुल मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजभाऊ गलांडे, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी आदींची यावेळी उपस्थिती होती.

प्रजासत्ताक दिनानिमित्त जनतेला उद्देशून पालकमंत्री सावंत यांनी शुभेच्छा संदेश दिला. यामध्ये त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना आणि देशाच्या रक्षणासाठी सीमेवर धारातीर्थी पडलेल्या जवानांना सर्वप्रथम अभिवादन केले. संदेशात ते म्हणाले, आपल्या देशात भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आले. म्हणून आपण हा प्रजास्ताक दिन लोकशाहीचा उत्सव म्हणून साजरा करतो.

उस्मानाबाद जिल्ह्यातील देवधानोरा, नंदगाव, चिलवडी या गावांनी इतिहास रचला. यात चिलवडीचे रामलिंग जाधव, देवधानोऱ्याचे महादेव बोंदर, लक्ष्मण बोंदर, उस्मानाबादचे भास्करराव नायगावकर, जिल्हा गौरव समितीचे अध्यक्ष नामदेवराव माने अशा सर्व ज्ञात – अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची आम्हाला सदैव जाणीव आहे व यापुढेही राहील.भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यसैनिक आयुष्यभर क्रियाशील राहिले आहेत. केवळ स्वातंत्र्य मिळविणे एवढेच ध्येय समोर न ठेवता समग्र विकासाचा ध्यास त्यांनी धरला होता, तो ध्यास लवकर पूर्ण करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे व ती जबाबदारी आपण सर्वजण एकत्रित येऊन पूर्ण करूया.
उस्मानाबाद जिल्हा नेहमीच स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसर आहे. स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर अनेक वाईट प्रथांवर देशाने मात केली पण अजूनही बालविवाह प्रथा पूर्णपणे संपलेली नाही. या प्रथेला प्रतिबंध करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग, निम-शासकीय, खासगी संस्था, तसेच समाजातील प्रत्येक घटकांचा सक्रीय सहभाग मिळणे अपेक्षित आहे. त्यासाठी या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्हा हा पूर्णपणे बालविवाह मुक्त जिल्हा व्हावाया उद्देशाने, जिल्हा प्रशासनाच्या वतीने बालविवाह मुक्त जिल्हा हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्याचा संकल्प हाती घेण्यात आला आहे. हा उपक्रम एक सामाजिक चळवळ होणे ही काळाची गरज आहे. तसेच जिल्ह्यातील स्त्री, पुरुष जन्म दरांतील तफावत हा चिंतेचा विषय आहे. त्याबाबतही आपण जागृत होऊन इथून पुढे स्त्री भ्रूण हत्या होणार नाही हाही यासाठी पुढाकार घेवूया, असे आवाहन मंत्री डॉ.सावंत यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याचे मुल्य पाळताना संविधानाने दिलेले अधिकार आणि कर्तव्य याची जाणीव ठेवायला हवी. हे भान आपल्याला संविधान देते. आज ज्या दिवसाने आपल्याला हे सर्व स्वातंत्र्य बहाल केले तो वर्धापन दिन आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो, असेही प्रा.डॉ.सावंत यावेळी म्हणाले.
ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पालकमंत्री डॉ.सावंत यांच्या हस्ते पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचा विशेष सेवा पदक देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्र पोलिस क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये तायक्वांदोमध्ये महिला मधून कांस्य पदक पटकावल्याबद्दल श्रीमती अश्विनी पाउडशेटे आणि बॉक्सिंगमध्ये महिला मधून कांस्य पदक पटकावल्याबद्दल सारिका शिवाजी जटाळे यांचाही यावेळी पालकमंत्री सावंत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी मध्ये बेलेश्वर विद्यालय पखरुडचा ओमराजे चव्हाण हा 97.31 टक्के गुण मिळवून ग्रामीण भागातून चौथा आणि जिल्हा परिषद ताकविकी येथील साई शिंदे हा 95.30 टक्के गुण मिळवून ग्रामीण भागातून सातवा आल्याबद्दल यांचाही गौरव करण्यात आला. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीमध्ये शेकापूर येथील ग्रीनलँड पब्लिक स्कूलमधील सानवी कैलास गिलबिले ही 87.24 टक्के गुण मिळवून ग्रामीण भागातून दहावा आणि तुळजापूर जवाहर नवोदय विद्यालयातील स्नेहा कवडे हा 84.56 टक्के गुण मिळवून सीबीएसई बोर्डातून आठवा आल्याबद्दल त्यांचाही सन्मापत्र देऊन गौरव करण्यात आला.
***

संविधानातील मुल्यांमुळेच भारतीय
लोकशाही जगात सर्वश्रेष्ठ
– पालकमंत्री अब्दुल सत्तार
हिंगोली दि.26 (जिमाका) : राज्यघटनेमुळे नागरिकांना राज्यकारभारात सहभागी होण्याचा अधिकार मिळाल्याने या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. आज भारतीय संविधानातील मुल्यांमुळेच भारतीय लोकशाही आज जगात सर्वश्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन कृषी मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले .
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त हिंगोली येथील संत नामदेव कवायत मैदान येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे कृषी मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आज झाले. यावेळी ते बोलत होते. आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, प्र. पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी आदींची उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले, घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अमूल्य योगदान लाभलेल्या लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ ठरलेल्या भारतीय राज्यघटनेची 26 जानेवारी, 1950 रोजी देशात अंमलबजावणी सुरु झाली आणि जगात भारत देश प्रजासत्ताक गणराज्य म्हणून उदयास आला.

आपल्या महाराष्ट्र राज्याने सर्वच क्षेत्रामध्ये विकासाची मोठी भरारी घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. त्याचबरोबर राजकीय, सामाजिक, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रातही अभूतपूर्व प्रगती करीत देशाच्या विकासामध्ये नेहमीच सिंहाचा वाटा उचलला आहे.
संविधानामुळे नागरिकांना राज्यकारभारात सहभागी होण्याचा अधिकार मिळाला, हे विशेष. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व असून जनता, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून देशाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहोत. राज्य तसेच आपल्या जिल्ह्याची चौफेर प्रगती व्हावी यासाठी जागरुक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे आवाहन पालकमंत्री सत्तार यांनी केले.
तंबाखू मुक्ती व कुष्ठरोग निर्मुलनाची शपथही त्यांनी उपस्थितांना दिली. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त कृषी विभागाच्या चित्ररथाचा शुभारंभ पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी परेडचे निरीक्षण केले. यावेळी राज्य राखीव दल, पोलीस, गृहरक्षक दलाच्या पथकांनी शानदार संचलन केले. तसेच पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, मान्यवर यांच्या भेटी घेऊन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित अवचार यांनी केले. या ध्वजारोहण कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
***

मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी प्रयत्न करूया
-जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.
- लातूर येथे प्रजासत्ताक दिनाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
- मुख्य शासकीय समारंभात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण
- वृक्ष लागवड, नदी संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन
- विविध पुरस्कारप्राप्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान
लातूर, दि. 26 (जिमाका): जिल्ह्यातील स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तरात असलेली तफावत दूर करणे आवश्यक आहे. यासाठी मुलगा-मुलगी समान असल्याची भावना समाजात रुजविण्यासाठी सामाजिक संस्था, प्रतिष्ठीत नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले. जिल्हा क्रीडा संकुल येथे प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहणप्रसंगी ते बोलत होते.
मुख्य शासकीय समारंभात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, महानगरपालिका आयुक्त बाबाराव मनोहरे, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांच्यासह स्वातंत्र्यसेनानी, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, पत्रकार, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

लातूर जिल्हा विविध सामाजिक चळवळी, वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, वृक्षाच्छदनामध्ये लातूर जिल्हा खूप मागे आहे. पर्यावरणाच्यादृष्टीने ही बाब गंभीर असून जनतेने अधिक जागरूकपणे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आगामी काळात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून ही एक लोक चळवळ बनविण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले. नद्यांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात मांजरा नदीच्या काठावरील गावांमध्ये ‘चला जाणूया नदीला अभियान’ अंतर्गत मांजरा नदी जलसंवाद यात्रा काढण्यात आली. या जलसंवाद यात्रेतून नदीचे मानवी जीवनातील महत्त्व आणि तिचे आरोग्य सुधारण्याबाबत जनजागृती करण्यात आली आहे. नदी संवर्धनाच्या चळवळीतही सर्वांनी सहभागी होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

पथसंचालनात विविध पथके, चित्ररथांचा सहभाग
ध्वजारोहणानंतर झालेल्या परेड संचालनात पोलीस विभाग, गृहरक्षक दल, राष्ट्रीय छात्र सेना, जवाहर नवोदय विद्यालय, सैनिक विद्यालय, सरस्वती विद्यालयातील विद्यार्थी, स्काऊटस आणि गाईडस सहभागी झाले होते. पोलीस विभागाचे श्वान पथक, वज्र वाहन, बॉम्ब शोधक पथक, शीघ्र कृती दलाचे वाहन, अग्निशमन दल, आरोग्य विभागाची रुग्णवाहिकेसह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, समग्र शिक्षा अभियान, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सहायक कामगार आयुक्त कार्यालयाचे चित्ररथ पथसंचालनालयात सहभागी होते.
वीरपत्नी, पुरस्कारप्राप्त अधिकारी, विद्यार्थ्यांचा सन्मान
लडाख येथे कर्तव्यावर असताना शहीद झालेले वीर जवान गणपती लांडगे यांच्या पत्नी श्रीमती अनिता लांडगे यांचा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते शाल आणि ताम्रपट देवून गौरव करण्यात आला. गडचिरोली येथे केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांना, गोंदिया येथील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांना पोलीस महासंचालक अंतरिक सुरक्षा सेवा पदक मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धीबद्दल पोलीस उपनिरीक्षक ए.आर.पवार, पोलीस हवालदार हणमंत कोतवाड, पोलीस नायक विनोद चलवाड, जी.जी. क्षीरसागर यांचा गौरव करण्यात आला.
लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील 23 नोव्हेंबर 2022 रोजीच्या अपघातात आगीत अडकलेल्या प्रवाशांचा जीव वाचविल्याबद्दल शिरूर ताजबंद येथील अझर बबनसाब शेख यांचा सन्मान करण्यात आला. पोलीस प्रशिक्षण केंद्रातील कनिष्ठ लिपिक युवराज गायकवाड, वन अतिक्रमण निष्कासित करणे, नाविन्यपूर्ण योजनेची कामे उत्कृष्टपणे पार पाडल्याबद्दल विभागीय वन अधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि विवेकानंद हॉस्पिटलचा सन्मान करण्यात आला. भारत स्काऊटस आणि गाईडसचे विद्यार्थी, गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
मैदानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी जिंकली लातूरकरांची मने..!
प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने कुस्ती आणि जिम्नॅस्टिक्सच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन केले होते. यामध्ये विद्यार्थी आणि खेळाडूंनी सादर केलेल्या मैदानी खेळांच्या प्रत्याक्षिकांना उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला. यामध्ये सहभागी खेळाडू, विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी सत्कार करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले.
***

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते
मुख्य शासकीय समारोहात ध्वजारोहण
- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
नांदेड (जिमाका), दि. 26 : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त् मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम श्री छत्रपती शिवाजी महाराज पोलीस कवायत मैदानावर उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी समवेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर शहीद सुधाकर राजेंद्र शिंदे यांच्या वीरपत्नी सुधा शिंदे यांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय पुणे यांच्याकडून प्राप्त ताम्रपट व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. सुभेदार पोतगंते दत्ता मारुती यांना ऑपरेशन रक्षकमध्ये कर्तव्य बजावल्यामुळे त्यांना ताम्रपट देऊन गौरविण्यात आले. ए. आर. पवार, फयाज यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत नांदेड जिल्ह्यातील शिवेंद्रराज पाटील, अरुण लिंगदळे, अजित मुंढे, स्पर्श शिप्परकर, तन्वी कौठेकर, अदित्य मोग्गावार, निनाद बरडे, आर्यन पाटील, आरुष शेरीकर, वेदांत मोतेवार, श्लोक लढ्ढा, संचित बोरगावे, काव्या इंगळे, अश्मित कौशल्ये, मुकुंद भुतडा, प्रत्युशकुमार, महतो सर्वेश वाघमारे, सदाशीव केशराळे, सुघोष काब्दे, ओवी साधून, सार्थक पेठकर, श्रिया टेंभुर्णे, नंदकिशोर बसवदे, अनय पांडे, राजनंदिनी हिवराळे, ओमकार सैदमवार, जय पतंगे, कौस्तुभ देशपांडे, कौस्तुभ जाधव, प्रहर्ष चुंचूवार यांना शिष्यवृत्ती मिळाल्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. वडेपुरीच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी सायबर जनजागृतीवर पथनाट्य सादर केले. सगरोळी सैनिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी कवायतीचे प्रात्यक्षिक सादर केले.

राष्ट्रध्वजास मानवंदना व राष्ट्रगीतानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संचलन करणाऱ्या पथकाचे निरीक्षण केले. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांच्या नेतृत्वाखालील पथसंचलनात केंद्रीय राखीव पोलीसबल, सशस्त्र पोलीस पथक, सशस्त्र महिला पोलीस पथक, वाहतुक पोलीस शाखा पथक, गृहरक्षक दलाचे पुरूष व महिला पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल पथक, राष्ट्रीय छात्रसेना, सैनिकी शाळा, स्काऊट पथक, स्टुडंट पोलीस कॅडेड, पोलीस बॅन्ड पथक, डॉग स्काड,मार्क्स मॅन वाहन, बॉम्ब शोधक व नाशक पथक, वज्र वाहन, बुलेट रायडर, आपदा मित्र, मिनी रेस्क्यू फायर टेंडर, कृषी विभाग चित्ररथ, पोलीस विभाग मोटर सायकल पेट्रोलींग या प्लाटूनने पथसंचलनात सहभाग घेतला.
*****




