*भारत महासत्ता*

0
343

 

भारत आता आशियातील महासत्ता : डॉ. देवळाणकर

राष्ट्रजागरण व्याख्यानमालेत विदेशनीतीच्या ‘मोदी डॉक्ट्रीन’वर केले सखोल भाष्य

मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी) :भारताच्या परराष्ट्र धोरणात अभिनव असे उपक्रम, प्रयोग करणारे ‘मोदी डॉक्ट्रीन’ हे अनेकार्थाने ऐतिहासिक आहे. गेल्या सात वर्षांत भारताच्या विदेशनीतीची चर्चा आज केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर होत असून, भारताचा प्रवास हा दक्षिण आशियातील एक देश इथपासून ते आशियातील महासत्ता असा झाला असल्याचे मत परराष्ट्र संबंधांचे अभ्यासक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी नोंदवले. साप्ताहिक विवेक आयोजित राष्ट्रजागरण व्याख्यानमालेत ते बोलत होते.

साप्ताहिक विवेकच्या ‘लोकनेता ते विश्वनेता’ या ग्रंथानिमित्त ‘राष्ट्रजागरण व्याख्यानमाले’चे आयोजन विवेकच्या फेसबुक पेज व युट्युब चॅनेलवरून करण्यात आले आहे. ‘मोदी डॉक्ट्रीनची सात वर्षे’ या विषयावर डॉ. देवळाणकर यांनी राष्ट्रजागरण व्याख्यानमालेच्या दुसऱ्या सत्रात आपले विचार मांडले. यावेळी ते म्हणाला की, यापूर्वी आंतरराष्ट्रीय संस्था-संघटना निर्णय घेत व भारताला ते अंमलात आणावे लागत. आता या संस्था-संघटनांचा अजेंडा, ध्येय-धोरणे निश्चित करण्यात भारताचा महत्वाचा सहभाग असतो. उदाहरणार्थ ‘जी-२०’ देशांच्या व्यासपीठावरून अनेक महत्वाच्या सूचना भारतातर्फे मांडण्यात आल्या व त्यास या देशांकडून मान्यता मिळाल्याचे त्यांनी सांगितले. भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून देशाचा आर्थिक विकास कसा साधता येईल, यावर गेल्या सात वर्षांत भर देण्यात आला. मेक इन इंडिया, स्किल इंडिया, स्टार्ट-अप इंडिया आदी प्रकल्पांना यशस्वी करण्याच्या परराष्ट्र धोरणाची सूत्रबद्ध आखणी व अंमलबजावणी करण्यात आली. मेक इन इंडिया ते आत्मनिर्भर भारत आदी योजनांच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात रोजगार निर्मिती करण्यावर व भारताला ‘मॅन्युफॅक्चरींग हब’ बनवण्याकरिता प्रयत्न करण्यात आल्याचे देवळाणकर यांनी नमूद केले.

डॉ. देवळाणकर पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तरहुन अधिक देशांच्या दौऱ्यावर गेले. स्वतंत्र भारताच्या इतिहासात ही खूपच मोठी उपलब्धी आहे. मोदींनी केलेल्या प्रत्येक परराष्ट्र दौऱ्याच्या मागे एक सुनियोजित उद्दिष्ट होते, असेही त्यांनी नमूद केले. भांडवल, पायाभूत सुविधा व तंत्रज्ञान या भारताच्या आर्थिक विकासाच्या प्रमुख गरजा होत्या. या सर्व गरजा लक्षात घेत भारताने मोदींच्या नेतृत्वाखाली परराष्ट्र धोरण राबवल्याचे ते म्हणाले. ‘मॅडिसन स्क्वेअर’ ते ‘हाऊ डी मोदी’पर्यंत विदेशातील प्रत्येक कार्यक्रमात मोदी यांनी तेथील भारतीयांशी संवाद साधला तो ‘पब्लिक डिप्लोमसी’चा अभिनव प्रयोग होता. हाऊ डी मोदी कार्यक्रमासारखा कार्यक्रम आजवर अमेरिकेच्या इतिहासात कधीच घडला नव्हता ज्यामध्ये एका अन्य देशाचा राष्ट्रप्रमुख एवढ्या भव्य संमेलनात भाषण करतो व त्यास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित राहतात. आजच्या घडीला १२५ हुन अधिक देशांत भारतीय नागरिक (अनिवासी भारतीय) राहतात आणि प्रतिवर्षी हे नागरिक ८० अब्ज डॉलर्स पैसे पाठवतात. भारतीय अर्थव्यवस्थेत याचे महत्व मोठे आहे. त्यामुळे या अनिवासी भारतीयांची भारतात अधिकाधिक गुंतवणूक व्हावी, यासाठी राबवण्यात आलेली ही ‘पब्लिक डिप्लोमसी’ भारताच्या विदेशनीतीतील पहिलाच प्रयोग असल्याचे डॉ. देवळाणकर यांनी सांगितले.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यत्वासाठी भारताची निवड झाली. यावेळी मतदानात १९३ पैकी १८४ देशांनी भारताच्या बाजूने मत दिले. यावरून भारताचा आंतरराष्ट्रीय प्रभाव दिसून येत असल्याचे ते म्हणाले. भारताने कोरोनाच्या दोन लाटा सहन करूनही गेल्या सहा महिन्यात १०० अब्ज डॉलर्सपर्यंत निर्यात केली व आत्मनिर्भर भारत मोहिमेचे हे यश असल्याचे देवळाणकर यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रवास लोकनेता ते विश्वनेता असा झाला असून त्याचबरोबरीने भारताचा प्रवास आशियातील एक देश ते आशियातील एक महासत्ता असा झाला असल्याचे मत डॉ. देवळाणकर यांनी या व्याख्यानात नोंदवले.

विक्रम गोखले मांडणार पडद्यावर मोदी साकारण्याचा अनुभव

राष्ट्रजागरण व्याख्यानमालेचे तिसरे सत्र बुधवार, दि. २७ रोजी सायंकाळी ७.०० वाजता होणार असून यावेळी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. ‘अवरोध’ या वेबसिरीजमध्ये गोखले यांनी पंतप्रधान मोदी यांची भूमिका साकारली. ही भूमिका साकारताना त्यांना आलेला अनुभव, मोदींच्या व्यक्तिमत्वाचा त्यांनी केलेला अभ्यास आदी मुद्द्यांवर विक्रम गोखले भाष्य करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here