दौलतचे वय जास्तीत जास्त तेरा वर्षे असेल. नाव दौलत पण घरात अठरा विश्व दारिद्र्य. प्रचंड बोलके डोळे. त्याची झोपडी आपली आनंद शाळा चालते त्याच्या बाजूलाच. तो शाळेत यायला थोडा घाबरायचा. मी काही मुलांना त्यांना बोलवायला पाठवले. त्या दिवशी पासून तो नियमित येतो. भारीच चुणचुणीत मुलगा. तेवढाच समजदार. मला त्याचा हा स्वभाव थोडा त्रास द्यायचा. त्याची गोष्ट समजून घेण्याची खूप इच्छा होती. सर्व मुलांच्या समोर तो मोकळा होईल का या बाबत संशय होता.
माझी आणि दौलतची हळूहळू चांगलीच दोस्ती झाली. तो शाळेत कधीच गेला नाही पण शुभमदादाकडून तो आता मुळाक्षरे शिकून घेतोय. केवल ताईंनी Keval Mule दिवाळीसाठी मुलांना नवीन कपडे शिवून घेण्यासाठी छान कापड पाठवले होते. अरुणाताई देशमुख आणि रुपेशदादांनी Rupesh Ubale शिलाईचे पैसे पण पाठवले होते वस्तीवरील 30 मुलांचे माप घेऊन कपडे शिवणे संपले होते. दौलतचे माप पण घेतले गेले नव्हते. त्याच्या मागे खूप लागलो होतो.
“दादा वेळच नाही मिळत हो ..फारच काम असते”
दिवाळीच्या आदल्या दिवशी शेवटी निराशेने त्याचे कपडे शिवून होणार नाहीत हे स्वतःला समजून सांगत होतो.इतक्यात शुभमला शुभम शिवाजीराव काकडे प्रबोधिनीतुन फोन आला. वस्तीवरून मुलगा आलाय असे त्याला कळले. तो नेमका दौलत होता.
दौलतचे माप घेतले व त्याला माझ्या गाडीवर बसून आम्ही वस्तीवर निघालो. दौलतचा दिवस सकाळी 6 वाजता सुरू होतो. आवरले की तो आपले पोते घेऊन बाहेत पडतो. हॉटेल वर चहा आणि नाष्टा. दिवसभर भंगार गोळा करत फिरतो. त्याचे वडील पाच वर्षांच्या पूर्वी वारले. त्यांना कँसर होता. मेंदूचा ट्युमर. माझ्या कपाळावर छोटीशी गाठ आहे. ती पाहून दौलतने काही काळापूर्वी माझ्या थोड्या अस्वस्थ मनानेच मला विचारले होते.
“दादा ही गाठ डॉक्टरांना दाखवी का ?”
त्याच्या मनातील अस्वस्थ करणारी भीती मला आता लक्षात आली होती.
वडिलांचा मृत्य झाल्यापासून म्हणजे वयाच्या नवव्या वर्षांपासून दौलत भंगार,काचेच्या बाटल्या आणि प्लस्टिक गोळा करतो. खूप पाऊस असेल तरच खाडा नाही तर कधी सुट्टी नाही. दिवसभर तीस ते पस्तीस किलोमीटर फिरावे लागते. दुपारी भूक लागली तर पुरी भाजी आणि थोडी जास्तच भूक असेल तर खिचडी. दिवस मावळतीला शेवटी ते दुकानांवर वजन करून आपली कमाई घ्यायची.
तीनशे ते पाचशे रुपये मिळतात. पैशांचे काय करतोस विचारल्यास मला खुपच कुतूहल निर्माण झालं. तो काही पैसे घरखर्चासाठी ठेवून सगळे पैसे मामाला पाठवतो. मामाला का पाठवतोस विचारल्यावर कळलेले की त्याला त्याच्या भावा बहिणीचे लग्न करायचे आहेत. जमा झालेल्या पैशातून मामांनी त्याच्या दोन बहिणीचे लग्न लावून दिले आणि आता एका भावाचे लग्न करायचे आहे.
दिवसभर दौलतची अंबाजोगाई परिक्रमा चालू असते. त्याच्या आईच्या हाताला काही तरी गंभीर दुखापत असल्याने ती फारसे काम करू शकत नाही.त्यामुळे घरातील बहुतेक कामं दौलतलाच करावे लागतात.
असे अनेक दौलत आनंद शाळेत येतात. त्यांना दीपावलीचा मनसोक्त आनंद देण्याचा प्रयत्न तुमच्या मदतीने केला. हर्षद राजूरकर, आशिष पाटील आणि संजय बुरांडे यांनी यासाठी मोलाची मदत केली.
दौलत आता झेंडूच्या फुलांचे हार बनवायला शिकला.सौर दिव्यांची जोडणी पण शिकला. कुकर मिक्सर दुरुस्ती शिकतोय. स्वावलंबी तर तो आहेच आमचा प्रयत्न चालला आहे की त्याच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा व त्याचे बालपण पण हरवू नये !!
मी सर्व काही हे लिहितोय ते कुठली मदत मिळावी यासाठी नाही. ज्ञान प्रबोधिनीचे काम खूप मोठं आहे त्यामुळे मदत सहज मिळते. तुमच्या आनंदाच्या दिवाळीत अशी करून कहाणी सांगून मला तुम्हाला काही क्षणासाठी दुःखी पण करायचे नसते. हे सगळे आपल्याच भारतात घडते याची जाणीव फक्त आपल्याला असावी. आपल्याला अशा असंख्य दौलतचे आयुष्य सुकर करायचे आहे.
काम खूप अवघड आहे पण नेटाने करावे लागेल. आपल्या स्वतःती सूर्याला पूर्ण ताकदीने हाक मारावी लागेल. मित्रा सर्व करण्यासाठी आम्हाला प्रचंड मानसिक ताकद देशील. आमच्यातील निराशेची काजळी दूर होऊन ज्ञानाचा आणि सेवेचा दिवा अखंड तेवत राहू देत…आमच्या सामूहिक प्रयत्नांना बळ मिळू देत…..

प्रसाद चिक्षे




