आलुरे गुरुजी गेले…ऋषितुल्य नेता ,
मराठवाड्याचे साने गुरुजी…विनम्र श्रद्धांजली ..
.तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार , अणदूर गावचे सुपुत्र श्री. सिद्रामप्पा आलुरे गुरुजी यांचे आज पहाटे सोलापूर येथे एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ९० वर्षांचे होते . साधी राहणी , उच्च विचारसरणी ही त्यांची खासियत होती . मराठवाड्यातले साने गुरुजी म्हणून त्यांना ओळखले जात असे . अणदूर येथे शिक्षण संस्थेची स्थापना करून त्यांनी गोरगरीब मुलामुलींना शिक्षणाची दारे खुली केली होती. अणदूरचे जवाहर विद्यालय हे त्यांनीच स्थापन केलेले ज्ञानमंदिर . हे विद्यालय मराठवाड्यात गुणवत्तेत अग्रेसर आहे .आलुरे गुरुजींवर साने गुरुजींच्या विचारांचा प्रभाव होता. गांधी टोपी , नेहरु शर्ट , धोतर असा त्यांचा साधा पेहराव होता . तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्याचे ते माजी अध्यक्ष होत . सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालकपदही त्यांनी भूषविले होते. आलुरे गुरुजींच्या निधनाने शिक्षणावर अनन्यसाधारण निष्ठा असलेला तत्वनिष्ठा राजकीय नेता काळाने हिरावून नेला आहे . ते काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून ओळखले जात . आलुरे गुरूजी गेल्यामुळे जुन्या पिढीतील दुवा निखळला आहे. सोलापूरच्या अनेक सहकारी संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता . शिक्षणातून त्यांनी समाजाचा उद्धार केला .त्यांच्या निधनाने तुळजापूर तालुक्यावर … अणदूर गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर अणदूर ( ता. तुळजापूर ) या त्यांच्या गावी आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या ध्येयवादी , गांधीवादी नेत्याला माझी विनम्र श्रद्धांजली …
– शांतकुमार मोरे , ज्येष्ठ पत्रकार , सोलापूर