`अजातशत्रू`…
———–
काही माणसे एका शब्दात मांडता येतात. शामराव देशपांडेंसाठीचा चपखल शब्द म्हणजे `अजातशत्रू`… उत्तम संवादक असलेला, जिव्हाळ्याने बाेलणारा, माणसे जाेडणारा, कुणाला शब्दानेही न दुखावणारा हा माणूस आज मात्र स्वभावाच्या अगदी विरुद्ध वागला. कुणाचाही निराेप न घेता परलाेकीच्या प्रवासाला निघून गेला…
मी तरुण भारतात कार्यरत हाेताे तेव्हापासूनचा शामरावांचा परिचय. तेव्हाही ते आमच्याकडे पुस्तकांविषयी लिहायचे. औरंगपुऱ्यात पिंपळापुरेंच्या पुस्तकाच्या दुकानात नाेकरी करायचे. पुढे त्यांनी राजहंसचे वितरण स्वीकारले. काही काळ घरातूनच काम करायचे.
सन २००५ मध्ये मी सकाळ साेडून व्यवसाय सुरू केला आणि सहजीवन काॅलनीत भाड्याने जागा घेऊन थाटले. काही काळातच शामरावांनी तेथेच शेजारी भाड्याने जागा घेतली. आम्ही शेजारी झालाे. त्या काळात जवळजवळ राेज भेट व्हायची. पुढे मी तिथून बाहेर पडलाे. भेटी कमी झाल्या पण जाता येता डाेकावणे व्हायचे. एखादे नवे पुस्तक आले तर ते घेण्याच्या निमित्ताने चक्कर व्हायची.
काेविड काळात त्या भेटीही कमी झाल्या. फाेनवर अधून मधून बाेलणे व्हायचे. काही महिन्यांपू्र्वीच आमचे बाेलणे झाले हाेते. नंतर काही संपर्क झाला नाही. आता ताे कधीच हाेणार नाही. सकाळीच श्रीकांतचा मेसेज पाहिला आणि धक्का बसला. अनेक काॅमन मित्रांचे फाेन सकाळपासून घेताेय. सगळ्यांनाच धक्का बसलाय.

दत्ता जोशी जेष्ठ पत्रकार
औरंगाबाद
पण आयुष्य असेच आहे. कुणी पुढे जाताे, कुणी मागे राहताे…
`अकस्मात ताे ही पुढे जात आहे`, हेच शाश्वत सत्य…
शामरावांना श्रद्धांजली…


