तब्बल ३२ वर्षानंतर भरली शाळा….भेटले वर्गमित्र.. स्नेहमिलनाचा अनोखा लातूर पॅटर्न!
लातूर: लातूरच्या व्यंकटेश शाळेतील १९९० च्या १० वी वर्गातील मुला मुलींचा स्नेहमिलन सोहळा भेटी लागे जीवा काल मुक्ताई मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला. या सोहळ्यात १९९० साली १०वी वर्गात शिकत असलेल्या अ ब क ड ई तुकडीतील विक्रमी १७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तर तत्कालीन १२ शिक्षक आणि शिक्षिका जे आता सेवानिवृत्त झाले आहेत यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली.
गेल्या ३ महिन्यापासून या ऐतिहासिक स्नेहमिलन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू होती. व्यवसाय आणि नोकरीनिमित्त लातूर बाहेर वास्तव्यास असलेल्या विक्रमी १७० विद्यार्थ्यांनी या सोहळ्यात सहभागी होत हे स्नेहमिलन ऐतिहासिक आणि अविस्मरणीय ठरवले.

वेंकटेश शाळेतील तत्कालीन १२ गुरुजनांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. तद्नंतर या सर्व गुरुजनांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. खरा तो एकची धर्म ही प्रार्थना सामूहिकरित्या म्हणून पहिल्या सत्रास सुरुवात झाली.
दिवसभर चाललेल्या या स्नेहमिलन कार्यक्रमात मित्र परिचय, समूह नृत्य, वैयक्तिक सादरीकरण, शेलापागोटे, गीत गायन, मनोरंजनात्मक खेळ, भेटीगाठी अशी विविध सत्र ठेवण्यात आली होती.
अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यालयीन आठवणींना उजाळा देत तब्बल ३२ वर्षानंतर भरलेल्या या अनोख्या वर्गाचा आनंद घेतला.
स्नेह सोहळ्यासाठी चक्क लंडनहून आलेला डॉ प्रशांत संकाये, उस्मानाबाद येथे उपजिल्हाधकारी म्हणून कार्यरत असलेले महेन्द्र कांबळे, प्रसिद्ध उद्योजक वेदप्रकाश शर्मा, डॉ संजय खांडेकर, डॉ संतोष खंदाडे यांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष आकर्षण ठरले.
स्नेहमिलन कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. शैलेश गोजमगुंडे यांनी आपल्या खुमासदार शैलीत करून वर्गमित्रांची मने जिंकली तर सूत्रसंचालन प्रा. उर्मिला भांदरगे, ॲड.रजनी गिरवलकर यांनी केले. शेवटी आभार ॲड दिपक सुळ यांनी मानले.

भेटी लागे जीवा या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी साईनाथ पंपटवार, विजय काळे, जुगल बाहेती, रितेश लोया, डॉ ज्योती पाटील, मंजु अग्रवाल, नीळकंठ स्वामी, डॉ अमृत पत्की, मन्मथ पोपडे, सुजित चव्हाण, डॉ किरण गोजमगुंडे, दिपक प्रयाग, राजेश मुंदडा, रामावतार दायमा आदींनी परिश्रम घेतले.
बिस साल बाद हा चित्रपट अनेकांना आठवत असेल मात्र ३२ साल बाद शाळा भरवून व्यंकटेश शाळेच्या विद्यार्थ्यांनी एक नवीन लातूर पॅटर्न निर्माण केला आहे.