लतादीदींचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी मंगेशकर कुटुंबीयांनी मार्गदर्शन करावे
- सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख
मुंबई, दि. २४ फेब्रु.
“लता मंगेशकर यांचे गायन आणि त्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्वच अलौकिक असे होते. त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक राज्य शासनातर्फे उभारण्यासाठी मंगेशकर कुटुंबियांनी मार्गदर्शन करावे, अशी विनंती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केली. देशमुख यांनी मंगेशकर कुटुंबियांची घरी जाऊन सांत्वना भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. लता दीदींच्या धाकट्या भगिनी उषा मंगेशकर आणि बंधू हृदयनाथ मंगेशकर, माजी आमदार उल्हासदादा पवार, संगीतकार मयुरेश पै यावेळी उपस्थित होते.

सुमारे ४० वर्षांपूर्वी लातूरमध्ये प्रथमच एका महाविद्यालयाला मा. दिनानाथ मंगेशकर यांचे नाव देण्याची लातूरकरांची विनंती दीदींनी मान्य केली होती, अशी आठवण सांगत देशमुख यांनी लता दीदींच्या लातूरशी निगडित आठवणी जागवल्या. दिवंगत विलासराव देशमुख आणि दीदींना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या जिव्हाळ्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला.

लता दीदींच्या कार्याचा उचित सन्मान करण्यासाठी उत्कृष्ट असे संगीत संग्रहालय शासनाला उभारता येईल, असे सांगून देशमुख यांनी याबाबत मंगेशकर कुटुंबियांचा मानस जाणून घेतला. याबाबतच्या सूचना कुटुंबियांकडून शासनाला पत्राद्वारे कळविण्यात येतील, असे हृदयनाथ मंगेशकर यांनी यावेळी सांगितले.




