मनीषा पाटणकर-म्हैसकर
सांगली जिल्ह्यामध्ये २००६ च्या दरम्यान जलसंधारणाच्या कामाचा खूपच बोलबाला झाला होता. खूप बातम्या यायच्या. मनिषा म्हैसकर नावाच्या तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी खूपच चांगले काम केले आहे असे कानावर आले होते. आपणही माहिती जनसंपर्क खात्याच्या वतीने एखादी डॉक्युमेंटरी करावी असा विचार माझ्या मनात आला आणि मी त्यांना फोन करून सांगितले. त्यांनी लगेच आनंदाने सांगलीला यायचे निमंत्रण दिले आणि मी सांगलीला पोहोचले!

तिथेच त्यांची आणि माझी पहिली भेट झाली. लख्ख गोरापान रंग, तपकिरी मोठे डोळे, खांद्यावर रुळणारे घनदाट केस, नीटनेटकी नेसलेली छान साडी, गळ्यामध्ये लक्षात येईल असं घातलेलं नेकलेस, चेहर्यावर प्रसन्न हास्य आणि एकूणच व्यक्तिमत्त्वामध्ये असलेला प्रचंड आत्मविश्वास असलेल्या मनीषा मॅडम मला प्रथमदर्शनीच खूप आवडल्या! त्यांनी केलेले जलसंधारणाचे काम खरोखरच अद्वितीय होते. चित्रीकरणाच्या निमित्ताने त्या आमच्याबरोबर एकदोन गावांमध्ये आल्या थोडाफार बोलणं झालं आणि एक छान डॉक्युमेंटरी तयार झाली! एकदोनदा फोनवर बोलणे झाले. काहीवेळा त्या मंत्रालयात बैठकीला येत त्यावेळी भेट झाली. पण एकदिवस अचानक त्या आमच्या महासंचालक म्हणून आल्या आणि बरोबर काम करण्याची संधी मिळाली.

त्यांच्याबरोबर साडेतीन वर्ष मला काम करता आलं आणि तो माझ्या आयुष्यातला खूप आनंदाचा आणि कामाचं समाधान मिळण्याचा काळ होता. सरकारी काम ते नेहमीच्या धाटणीप्रमाणे होणार अशी आमची विचारसरणी होती. पण तेच काम किती वेगळ्या पद्धतीने करता येतं आणि त्यातही किती उंची गाठता येते याचा जणू वस्तुपाठच मला म्हैसकरमॅडमच्या सहवासात मिळाला. साधी ऑफिसमधली केबिन कशी ठेवायची, ती किती सौंदर्यपूर्ण बनवता येते, तिथे असणाऱ्या वस्तू किती नेमक्या आणि छान असाव्यात आपण जिथे दिवसातले ८-१० तास काम करतो ती वास्तू कशी प्रसन्न असावी याच जणू प्रशिक्षणच आम्हाला त्यांच्या काळात मिळालं.

माहिती आणि जनसंपर्क खात्यात आम्ही आमच्या ठराविक पठडीनुसार वर्षानुवर्षे काम करत होतो, खूप मेहनत करत होतो. शासनाची प्रतिमा निर्माण करत होतो पण आमचं असं वेगळं अस्तित्व नव्हतं. कुणीही यावे आणि टपली मारून जावं असं काही चाललं होतं. पण मॅडमच्या काळात आपण दुसऱ्या माध्यमांवर अवलंबून राहतो ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी असं ठरवलं की आपण शासनाच्या प्रसिद्धीसाठी स्वतःची अशी माध्यमे निर्माण करूया.
इतके दिवस आम्ही काम करायचो आणि त्या कामाची दखल माध्यमे त्यांना हवी तशी घ्यायची. त्यात आमचे काय म्हणणे आहे ह्याला काहीच किमत नव्हती. मॅडमच्या म्हणण्यानुसार आम्ही आमची माध्यमे निर्माण करायला हवी होती की ज्यामध्ये आपल्याला जे म्हणायचं आहे, त्यासाठी आपलं स्वतःचं व्यासपीठ असलं पाहिजे. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आधी आमच्या ‘लोकराज्य’ मासिकाचे वर्गणीदार वाढवण्याचा प्रयत्न केला. लोकराज्य मासिक, उर्दू लोकराज्य, इंग्रजीत ‘महाराष्ट्र अहेड’ मासिक तसेच ‘दूरदर्शन’वरचा “जय महाराष्ट्र” कार्यक्रम आकाशवाणीवरचा “दिलखुलास” कार्यक्रम दूरदर्शनवरचा “साप्ताहिक महाराष्ट्र” हा कार्यक्रम आणि शासनाच्या सर्व बातम्या, फोटो व्हिडीओ ज्याच्यावर रोजच्या रोज अपडेट होत असे ‘महान्युज वेबपोर्टल’ तयार केले. आमचे न्यूज पोर्टल तर खऱ्या अर्थाने आमच्यासाठी मैलाचे दगड ठरले.

‘महान्यूज’ हे वेब पोर्टल हे देशातील एखाद्या राज्य सरकारचे पहिले न्यूज वेबपोर्टल ठरले आणि याची नोंद खुद्द श्री. सॅम पित्रोदा यांनी मला मेल पाठवून घेतली. असे अनेक महत्वाकांक्षी उपक्रम म्हैसकरमॅडमच्या काळामध्ये झाले. त्यांची खासियत म्हणजे कोणत्याही गोष्टीचे परिपूर्ण नियोजन करणे. अगदी छोटासा कार्यक्रम असेल तरी त्यांचे त्या कार्यक्रमाचे नियोजनही इतके परिपूर्ण आणि नेटके असे की पाहुण्यांना देण्याची शाल नीट उलगडून त्रिकोणी घडी करून ठेवलेली असे. प्रेक्षकांच्या जागी पहिल्या दोन रांगा महत्त्वाच्या व्यक्तीसाठी राखून ठेवण्यात येतात पण ते लोक आले नाही तर जागा रिकामी दिसते मग त्या दोन रांगांमध्ये आमची माणसं बसत योग्य व्यक्ती कधी उशिरा आल्या तर त्यांना मग तिथे बसलेला आमचा अधिकारी ती जागा रिकामी करून देत असे.
खूप प्रकल्प एकदम हाती घेऊन वैचारिक गोंधळ करून घेण्याची त्यांची सवय नव्हती. त्या एका वेळी एकच प्रकल्प हाती घेत आणि तो नियोजनबद्धपणे पूर्ण यशस्वी करून दाखवत.
नियोजन करताना त्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना विश्वासाने बरोबर घेऊन त्यांची मते जाणून घेत. त्यांच्या बैठकीत आपले विरोधी मत मांडण्याची संधी अधिकाऱ्यांना असे. ते स्वातंत्र्य मला नेहमीच मिळाले. या विचारमंथनातून कामाची बांधणी सर्व शक्यता, धोके, अडचणी लक्षात घेऊन अगदी नीटनेटकी होत असे. बऱ्याच वेळा वरिष्ठ अधिकारी ‘हे करा, ते करा, हे झालेच पाहिजे, ते होता कामा नये.’ अशा सूचना देतात आणि स्वतः मात्र निघून जातात असाच सरकारी कर्मचारी आणि कनिष्ठ अधिका-यांचा अनुभव असतो. पण मॅडम मात्र आमच्या बरोबरीने दहादहा, बाराबारा तास काम करायच्या आणि त्यांनी आमच्या अडगळीत पडलेल्या विभागाला एक स्वतंत्र ओळख आणि ग्लॅमर मिळवून दिलं.खात्यात सळसळता उत्साह आणि नवचैतन्य निर्माण केले.
राज्यात २००७मध्ये अतिवृष्टी झाली होती. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती उद्भवली. त्यावेळी मी कामासाठी औरंगाबादला होते. मला मॅडमचा फोन आला. त्या म्हणाल्या पुराच्या वेळी ‘मदत व पुनर्वसन’ खात्याने चांगली कामगिरी केली आहे. आपण त्या कामाच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवू या. आम्ही लगेच कामाला लागलो. सर्व जिल्हा माहिती कार्यालयातून फोटो मागवले. पुढचे चार दिवस माझ्या दालनात बसून आम्ही फोटोना शीर्षके देत होतो. खूप छान प्रदर्शन झाले त्यातून शासनाने केलेल्या कामाची खरी प्रसिद्धी झाली. माध्यमांनी त्याला भरभरून दाद दिली.
मॅडमची वृत्ती कामसू आहे. त्या स्वतःही काम करतात आणि बरोबरच्या लोकानाही कामाला लावतात. अतिशय फोकस्ड मनोभूमिका असलेल्या मॅडम नेहमी आम्हाला सांगायच्या की स्वप्न पहा पण असं स्वप्न पहा की जे आपण पूर्ण करू शकतो. पुष्कळ वेळा बैठकीमध्ये आमचे वाद व्हायचे. लोकराज्यचा खप लाखाच्यावर जाणार नाही असं माझं मत होत. त्यांचे म्हणणे मात्र होते की तुम्ही मोठे स्वप्न बघा आपण ते करू शकतो ! बघताबघता शासकीय कामाची चौकट किंचित हलवून, उत्साहाचे इंधन भरून, आमचे सगळे जिल्हा माहिती अधिकारी कामाला लागले आणि महाराष्ट्राच्या ‘जनसंपर्क महासंचांलनालया’ने साडेपाच लाख खपाचा टप्पा पार केला! नंतर कळले की आम्ही आमच्या नकळत एक राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले होता !’
म्हैसकरमॅडम त्या आमच्या कार्यालयात आल्यावर त्यांचं आणि माझं जमणार नाही अशी भाकिते अनेकांनी वर्तवली होती. कारण त्यांची आग्रही वृत्ती आणि माझा काहीसा आक्रमक स्वभाव! पण तीन वर्षाच्या कालावधीमध्ये आमचा एकदाही बेबनाव झाला नाहीच उलट आम्ही दोघी एकमेकींच्या अतिशय जवळ आलो! मला काम करायला आवडायचं! त्यांनी मला काम करण्याची मोकळी संधी दिली. खरे तर कुठल्या अधिकाऱ्यांकडून कसं काम करून घ्यायचं याची त्यांना जन्मजातच जाण आहे. त्यांच्याबरोबर काम करणं हा एक आनंदोत्सव असायचा. एक जिद्द, एक उत्साह, एक तरतरी त्यांच्या सहवासामुळे प्राप्त व्हायची. आणि जेव्हा एखादे काम पूर्ण व्हायचं तेव्हा त्या अत्यंत आनंदाने “वेल् डन!” असा मेसेज पाठवायच्या. त्यावेळी आम्हा सगळ्यांनाच भरून पावल्यासारखं व्हायचं.
पुष्कळ वेळा अधिकारी मोठ्यामोठ्या बजेटचे महागडे प्रकल्प आखतात. शासनाचा खूप पैसा खर्च करतात आणि आपण काहीतरी केलं असा डांगोरा पिटतात पण मॅडमबद्दल मला एक आवर्जून सांगायच आहे की त्यांनी आमच्याकडे असताना सरकारकडे एकही नवे पद मागितलं नाही किंवा एक रुपयाचा जास्त निधी मागितला नाही. आहे त्या माणसांकडून आणि आहे त्या साधनसामग्रीमधूनच यशाची कधी नव्हे तेवढी उंच शिखरे पादाक्रांत केली. माणसं तीच असतात पण यशाकडे जाण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा असतो. मोठी स्वप्न बघताना छोटीछोटी पावले टाकतच मोठा प्रवास करता येतो असा जगण्याबद्दलचा नितांत सुंदर कार्यानुभव त्यांनी मला दिला.
मुंबईवर २६ नोव्हेंबरला दहशतवादी हल्ला झाला आणि सारेजण हादरून गेले होते! राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक तपासयंत्रणा कामाला लागल्या. आम्ही वेळोवेळी बातम्या काढत होतो पण त्या पुरेशा नव्हत्या. घडलेल्या सर्व घटनाक्रमावर आणि तपास यंत्रणेच्या कामावर आम्ही ‘लोकराज्य’चा एक विशेषांक काढला. तो इतका मुद्देसूद आणि माहितीपूर्ण झाला की हा अंक म्हणजे या भयानक घटनेवरील एक दस्ताऐवज ठरला!
अत्यंत देखणे व प्रभावशाली व्यक्तिमत्त्व लाभलेल्या मनीषा मॅडमची काम करण्याची पद्धतही अनेकांपेक्षा काकणभर सरसच आहे. आमच्यातल्या सुप्त शक्तीची जाणीव त्यांनीच आम्हाला प्रथम करून दिली. माहिती व जनसंपर्कमधून बदली झाल्यावर त्या महापालिकेत गेल्या. मुंबई महापालिकेच्या कामातही जनगणनेमध्ये त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला. त्यानंतर नगर विकास खात्यामध्ये त्यांनी ‘स्वच्छ भारत’ या कार्यक्रमामध्ये इतकं चांगलं काम केलं की त्यांना राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले! आता त्या पर्यावरण खात्याच्या प्रधान सचिव आहेत. तेथेही त्यांच्या कामाचा ठसा उमटवत आहेत त्या जिथे जातील तिथे त्या नक्कीच चांगलं काम करतील असा विश्वास मला वाटतो.आजही आपल्या अतिव्यस्त दिनक्रमाची सुरुवात त्या पहाटे फिरण्याने करतात. फिरताना रस्त्यात दिसणारी रंगीत फुलेसुद्धा त्यांना खुणावतात. त्यामुळेच कदाचित आपल्यासारख्यांना त्यांच्या फेसबुक पेजवर ताजेतवाने फुलांचे फोटो बघायला मिळतात.
व्यक्तिगत आयुष्यात अनेक गंभीर प्रसंगाचा सामना त्यांनी धेर्याने केला आहे. एकुलत्या एक मुलाचे अकाली निधन झाले. तो धक्का पचवून त्यांनी दोन मुलीना मातृत्व दिले. नियतीवर मात करून आयुष्याला रसरसून भिडणा-या त्यांच्या वृत्तीला सलाम केला पाहिजे!
*******

–श्रद्धा बेलसरे-खारकर
९८६९३५७९११











