मुक्ती संग्राम मराठवाड्याच्या अस्मितेचा लढा
लातूर :
मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूल, लातूरच्या वतीने या लढ्यात ज्या ठिकाणी महत्त्वपूर्ण घटना घडल्या. त्या ठिकाणी भेट देऊन तेथील इतिहास समजून घेऊन स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यासाठी शनिवारी अभिवादन यात्रा काढण्यात आली.
या यात्रेची सुरुवात लातूर शहरातील हुतात्मा स्मारक येथे प्राचार्य कर्नल श्रीनिवासुलू, रजिस्ट्रार प्रवीण शिवनगीकर, यात्रेचे संयोजक विनोद चव्हाण, जयश्री पाटील, देवयानी देशपांडे, डॉ सतीश जाधव, हणमंत थडकर यांच्या उपस्थितीत शहिदांना अभिवादन करून झाली. अभिवादन यात्रा उदगीर किल्ला, कौळखेड, हत्तीबेट या ठिकाणी गेली. उदगीर किल्ला येथे अभिवादन यात्रेस कै बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख अणि इतिहास संशोधक डॉ. अनंत शिंदे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले आणि किल्ल्याचा संपूर्ण परिसर फिरून यात्रेतील सर्व विद्यार्थ्यांना किल्ल्या संदर्भात माहिती दिली.

निजाम आणि मराठे यांच्यात ३ फेब्रुवारी १७६० रोजी येथे युद्ध झाले आणि कांही कालावधीसाठी उदगीरचा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. पानिपतच्या तिसऱ्या लढाईतील मराठ्यांच्या पराभवानंतर दक्षिणेत निजामांनी डोके वर काढले. उदगीरवर हैदराबादच्या निजामाची राजवट रूढ झाली. उदगीर किल्ला प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक ऐतिहासिक काळातील घटनांचा साक्षीदार म्हणून आजतागायत उभा आहे. या ऐतिहासिक वास्तूची वेगवेगळ्या कारणास्तव पडझड झाली आहे. पुरातत्व खात्याअंतर्गत किल्ल्यावर विविध कामे सुरू असल्याने जीवंतपणा आला आहे. या वास्तूची जपणूक सर्वांनी करणे गरजेचे आहे, असे आवाहन डॉ. अनंत शिंदे यानी केले.

उदगीर तालुक्यातील कौळखेड येथे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात तीन हुतात्मे लढले. पुढे किसान दलाची स्थापना झाल्यानंतर अप्पाराव पाटील या संघटनेचे प्रमुख झाले. कौलखेड गावाजवळ रामघाट परिसरात निजामाच्या रझाकरांना सलोखी पलो करून सोडले यात सात लोक शहीद झाले. हत्तीबेटावर किसान दल आणि निजाम यांच्यात झालेल्या लढाईत जवळपास 75 निजामाच्या रझाकारांना ठार मारण्यात आले. या दोन्हीही ठिकाणी जाऊन स्वातंत्र्य सनिकांना अभिवादन करण्यात आले. पत्रकार व्हीएस कुलकर्णी यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना हत्तीबेटावर मार्गदर्शन केले.
निजामाच्या जुलमी राजवटी विरोधात संपूर्ण खेड्यापाड्यात लढलेला मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा हा मराठवाड्याच्या अस्मितेचा लढा असून या लढ्याच्या संदर्भातील इतिहासाची माहिती आधुनिक पिढीला व्हावी आणि लढ्यातील शहिदांचे स्मरण व्हावे यासाठी आम्ही स्कूलच्या वतीने अभिवादन यात्रेचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन विनोद चव्हाण यांनी केले.

